‘शताब्दी वर्षात फाटक हायस्कूलने माजी विद्यार्थ्यांसाठी व्यासपीठ उपलब्ध करावे’

रत्नागिरी : ‘फाटक हायस्कूल शताब्दी पदार्पण करीत असल्याने या शाळेच्या माजी विद्यार्थ्यांची संख्या खूप आहे. सोशल मीडियावरून फाटक हायस्कूलच्या माजी विद्यार्थ्यांनी शाळेविषयी प्रेम करणाऱ्या पोस्ट्स लिहिल्या आहेत, ते मी वाचलं-पाहिलं आहे. हे लक्षात घेऊन फाटक हायस्कूलने माजी विद्यार्थ्यांसाठी शाळेत त्यांच्या आठवणी जागविण्याकरिता एखादी वर्गखोली करावी, त्यांना स्वतंत्र व्यासपीठ उपलब्ध करून द्यावं. त्यामुळे शाळा आणि विद्यार्थी यांचा स्नेहबंध अधिक वाढेल आणि शाळेलाही त्याचा फायदा होईल,’ असे आवाहन रत्नागिरीचे माध्यमिक उपशिक्षणाधिकारी नरेंद्र गावंड यांनी केले. रत्नागिरीच्या दी न्यू एज्युकेशन सोसायटीच्या फाटक हायस्कूलच्या शताब्दी महोत्सवाचा शुभारंभ एक मार्च २०२१ रोजी झाला. त्या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. फाटक हायस्कूलच्या आजवरच्या सर्वांगीण प्रगतीचे कौतुक त्यांनी आपल्या भाषणात केले.

दी न्यू एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष ॲड. बाबासाहेब परुळेकर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. शाळेचे मुख्याध्यापक किशोर लक्ष्मण लेले, संस्थेच्या कार्याध्यक्षा ॲड. सुमिता धनंजय भावे, उपाध्यक्ष विनय आंबुलकर, डॉ. वसंत दिनकर जोशी. उपकार्याध्यक्ष ॲड. सचिन शिंदे, माजी सेक्रेटरी आणि फाटक हायस्कूलचे संस्थापक फाटक गुरुजी यांची नात दाक्षायणी बोपर्डीकर आदी मान्यवर या वेळी उपस्थित होते.
(शाळेचे माजी विद्यार्थी सिद्धेश वैद्य यांनी काढलेले शाळेचे काही फोटो)

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर निवडक लोकांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला. माजी विद्यार्थ्यांसह सर्वांनाच कार्यक्रमांना कार्यक्रम पाहता यावा, यासाठी फेसबुक लाइव्ह करण्यात आले. ‘फेसबुक लाइव्ह’वर शाळेची घंटा वाजवून ‘ती विद्या मिळवू इथे’ ही शाळेची प्रार्थना झाल्यानंतर शाळेचा ९९ वर्षांचा प्रवास उलगडणारी सुंदर चित्रफीत दाखवण्यात आली. त्यानंतर सुरेल ईशस्तवन आणि स्वागतगीताने कार्यक्रमाची पारंपरिक पद्धतीने सुरुवात झाली. सरस्वतीच्या प्रतिमेला संस्थेच्या कार्याध्यक्षा ॲड. सुमिता भावे यांनी, तर शाळेचे संस्थापक कै. फाटक गुरुजींच्या अर्धपुतळ्याला ॲड. बाबासाहेब परुळेकर यांनी पुष्पहार अर्पण केला. मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्ज्वलन करण्यात आले. या वेळी शाळेच्या शताब्दी महोत्सवाच्या लोगोचे अनावरण आधुनिक पद्धतीने करण्यात आले.

एक मार्च १९२२ रोजी फाटक गुरुजींनी मुहूर्तमेढ रोवलेल्या या शाळेच्या भौतिक, शैक्षणिक व सांस्कृतिक प्रगतीचे टप्पे मुख्याध्यापक लेले सरांनी आपल्या प्रास्ताविकातून मांडले. शाळेच्या उज्ज्वल वाटचालीतील शिक्षकांच्या योगदानाचा आढावा त्यांनी घेतला. माजी मुख्याध्यापक प्रकाश सोहोनी यांनी शाळेचे वेगळेपण उद्धृत केले. ‘राष्ट्रीय शिक्षण देणारी शाळा म्हणून नावलौकिक असलेली ही बहुउद्देशीय शाळा संस्कार, प्रयोगशीलता आणि कार्यकुशलतेच्या पायावर उभी आहे. विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास आणि अध्यापन हाच शिक्षकांचा स्वधर्म होता. अशा शिक्षकांच्या योगदानातून शाळेचे वेगळेपण आजवर टिकून आहे,’ असे ते म्हणाले.

माजी विद्यार्थिनी आणि माजी मुख्याध्यापिका अशा दोन्ही भूमिकांतून बोलताना शुभांगी वायकूळ यांनी शाळेबाबतचे आपले अनुभव आणि विचार मांडले. माजी विद्यार्थी ॲड. विनय आंबुलकर यांनी शाळेच्या विविध स्थित्यंतरांचा आढावा आपल्या मनोगतामध्ये घेतला. कै. फाटक गुरुजींची नात आणि शाळेच्या माजी पर्यवेक्षिका दाक्षायणी बोपर्डीकर यांनी त्यांच्या काळातील शिक्षकांच्या आठवणींना उजाळा देतानाच शिक्षकांनी मनावर चांगल्या गोष्टी बिंबवल्याने नोकरीतूनही आनंद मिळाल्याच्या भावना मनोगतातून व्यक्त केल्या.

‘विद्यार्थी शिक्षकांकडून घडवला जातो तसाच मी घडलो. माझ्या आयुष्याच्या इमारतीचा पाया केवळ फाटक हायस्कूलच,’ अशी भावना माजी विद्यार्थी आणि संस्थेचे उपाध्यक्ष डॉ. वसंत दि. जोशी यांनी व्यक्त केली.

या वेळी माजी सेक्रेटरी व पर्यवेक्षिका दाक्षायणी बोपर्डीकर, उपाध्यक्ष डॉ. व. दि. जोशी, बापूसाहेब परुळेकर, श्रीपाद ठाकूरदेसाई, सौ. सरपोतदार आदी देणगीदार, माजी विद्यार्थी आणि प्रमुख पाहुणे उपशिक्षणाधिकारी नरेंद्र गावंड यांचा सत्कार करण्यात आला. कार्याध्यक्षा ॲड. सुमिता भावे यांनी शताब्दी महोत्सवाच्या निमित्ताने आगामी काळात सीनियर कॉलेज व औद्योगिक प्रशिक्षण संस्था सुरू करण्याचा संस्थेचा मनोदय असल्याचे सांगितले. ‘शाळेसाठी काही तरी विधायक कार्य करण्याची मला मिळालेली संधी हीच माझी श्रीमंती,’ अशी भावना त्यांनी व्यक्त केली.

‘आमच्या तीन पिढ्या या शाळेने घडविल्या, त्या शाळेचा अध्यक्ष असल्याबद्दल मी स्वतःला भाग्यवान समजतो,’ अशा शब्दांत कार्यक्रमाचे अध्यक्ष बाबासाहेब परुळेकर यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. सामाजिक भान राखून पटवर्धन हायस्कूलच्या भारत शिक्षण मंडळाच्या वतीने सुनील वणजू यांनी आणि स्वरूपानंद पतपेढीचे अध्यक्ष व माजी विद्यार्थी दीपक पटवर्धन यांनी शताब्दी महोत्सवाला दिलेल्या शुभेच्छांबद्दल परुळेकर यांनी त्यांचे विशेष आभार मानले. शाळेच्या वाटचालीत योगदान असलेल्या सर्वांच्या स्मृतींना वंदन करून त्यांनी सर्वांना शताब्दी महोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या.

उपमुख्याध्यापक श्री. आनंद पाटणकर यांनी उपस्थितांचे आभार मानले. फेसबुकच्या माध्यमातून जगभरातून या कार्यक्रमाचा आस्वाद घेणाऱ्या संस्थेच्या माजी विद्यार्थ्यांचे व हितचिंतकांचेही या वेळी कौतुक करण्यात आले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षिका शिल्पारेखा जोशी यांनी केले. यानंतर ‘वंदे मातरम्’ने कार्यक्रमाची सांगता झाली.

(कार्यक्रमाचे फेसबुक लाइव्ह पाहण्यासाठी, तसंच माजी विद्यार्थ्यांच्या भावना, शिक्षकांच्या भावना वाचण्यासाठी, फोटो पाहण्यासाठी शाळेच्या अधिकृत फेसबुक पेजला भेट द्यावी. त्यासाठी येथे क्लिक करावे.)

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply