रत्नागिरी जिल्ह्यात तूर्त केवळ ४५ वर्षांहून अधिक वयोगटासाठीच लसीकरण होणार

रत्नागिरी : करोनाप्रतिबंधक लसीकरणाचा गोंधळ टाळण्यासाठी रत्नागिरी जिल्ह्याच्या आरोग्य विभागाने आता नियोजन केले असून सध्या केवळ ४५ वर्षांहून अधिक वय असणाऱ्यांना नागरिकांनाच लस दिली जाणार आहे. शहरी भागात ऑनलाइन नोंदणीने, तर ग्रामीण भागात केंद्रावर ऑफलाइन पद्धतीने प्रत्यक्ष नोंदणी करून लस दिली जाणार असल्याचे जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी जारी केलेल्या प्रसिद्धीपत्रकात नमूद करण्यात आले आहे.

पत्रकात म्हटले आहे की, यापूर्वी पंचेचाळीस चाळीस वर्षांहून अधिक वयाचा एक गट आणि १८ ते ४४ वयाचा दुसरा गट अशा दोन भागात लसीकरण केले जात होते. त्यापैकी १८ ते ४४ वयोगटाकरिता राज्य शासनाकडून लसपुरवठा केला जात होता, तर त्याहून अधिक वयाच्या नागरिकांसाठी केंद्र शासनाकडून लस पुरविली जात होती. मात्र लशींचा पुरवठा कमी होत असल्यामुळे सर्वत्र गोंधळाचे वातावरण आणि नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता. त्याचा ताण प्रशासनावरही आला होता. याबाबत जिल्हास्तरावरून शासनाला कळविण्यात आले होते. त्याला शासनाकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला असून आता शासनाच्या निर्देशानुसार पुढील आदेश होईपर्यंत केवळ ४५ वर्षांहून अधिक वयोगटातील नागरिकांचेच लसीकरण केले जाणार आहे. त्यातही दुसरा डोस घेणाऱ्यांना प्राधान्य देण्यात येणार असून लशींचा साठा शिल्लक राहिला, तर त्याच वयोगटातील नागरिकांना पहिला डोस दिला जाणार आहे. हे लसीकरण ग्रामीण भागात ऑफलाइन पद्धतीने म्हणजे नोंदणी केंद्रावर प्रत्यक्ष नोंदणी करून केले जाणार आहे. त्यामुळे आतापर्यंत असलेली संभ्रमावस्था नष्ट होणार असल्याचे पत्रकात म्हटले आहे.

लसीकरणाच्या नियोजनाबाबत जिल्हा प्रशासनातर्फे रोज दुपारी बारा वाजता शहरी आणि ग्रामीण भागातील कोणत्या केंद्रावर किती जणांना लस दिली जाणार आहे, याविषयीची माहिती दिली जाईल. ती प्रसारित झाल्यानंतर नागरिकांनी आपला पहिला किंवा दुसरा डोस घ्यावा, अशी सूचना करण्यात आली आहे. रोज दुपारी बारा वाजता दिल्या जाणार असलेल्या या माहितीपत्रकात केंद्रनिहाय किती डोस उपलब्ध आहेत, त्या कोणत्या वयोगटासाठी आहेत आणि कोणत्या सत्रात दिल्या जातील, याची माहिती शहरी आणि ग्रामीण भाग असे वर्गीकरण करून दिली जाणार आहे. त्यानुसार नागरिकांनी आपला डोस निश्चित करून तो संबंधित केंद्रांतून घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

ग्रामीण भागासाठी ऑनलाइन नोंदणीवर अवलंबून न राहता टोकन पद्धतीचा अवलंब करण्यात येणार आहे. त्याचा मोठा दिलासा ग्रामीण भागातील नागरिकांना मिळणार आहे. प्रत्येक लसीकरण केंद्रावर नागरिकांनी उपलब्ध असलेल्या लशीनुसार आपले टोकन घेऊन जावे आणि गर्दी न करता आपल्या क्रमांकानुसार शांततेने लस घ्यावी, अशी अपेक्षा आहे. शहरी भागासाठी मात्र केवळ ऑनलाइन पद्धतीने नोंदणी करणाऱ्यांनाच लस दिली जाणार आहे. यापुढे लशींचा साठा सुरळित आणि योग्य प्रमाणात होणार असून नागरिकांना त्रास घेऊन लस घेण्याची आवश्यकता नाही. लवकरच सर्व नागरिकांचे लसीकरण करण्यात येणार आहे, हे निश्चित. सर्व नागरिकांनी रोज दुपारी बारा वाजता cowin.gov.in या वेबसाइटवर आपल्या भागाच्या पिनकोडप्रमाणे लशींची उपलब्धता पाहावी, असेही सूचित करण्यात आले आहे.

लसीकरणासाठी आलेल्या नागरिकांनी आपली नोंदणी झाली असेल तरच संबंधित केंद्रावर थांबावे. प्रत्येक केंद्रावर नियोजनानुसार जेवढे डोस उपलब्ध होणार असतील, तेवढेच दिले जाणार आहेत. त्यामुळे नागरिकांनी गर्दी करू नये आणि विनाकारण केंद्रावर थांबून आपल्या वेळेचा अपव्यय करू नये. लसीकरण सुरळीत होण्यासाठी करोनाच्या पार्श्वभूमीवर योग्य ती खबरदारी घेऊन लसीकरण करून घ्यावे. त्यामुळे रत्नागिरी जिल्ह्यातील सर्वांनाच लसीकरण करण्याचा उद्देश लवकरात लवकर पूर्ण होईल. त्यासाठी प्रशासनालाही सहकार्य करावे. लसीकरणासंदर्भात काही शंका असल्यास किंवा माहिती हवी असल्यास (०२३५२) २२१४०३ या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply