वालावल (ता. कुडाळ) : रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील होमिओपॅथीचे प्रचारक आणि येथील रहिवासी अशोक प्रभू (वय ६७) यांचे काल (दि. १३) सायंकाळी कोल्हापूर येथे एका खासगी रुग्णालयात निधन झाले. त्यांना करोनाची बाधा झाली होती.
वालावल (ता. कुडाळ, जि. सिंधुदुर्ग) येथील रहिवासी असलेले अशोक प्रभू यांनी सुरुवातीला दैनिक सकाळचे कुडाळ तालुका बातमीदार म्हणून काम केले. काही काळ मुंबईतील झंडू फार्मसीचे प्रतिनिधी म्हणूनही त्यांनी काम केले. त्यानंतर मुंबईत सामना दैनिकात सुमारे दहा वर्षे पत्रकारिता केली.
होमिओपॅथीच्या शिक्षणाला त्यांनी प्रवेश घेतला. मात्र त्यांचे पदवीचे शिक्षण पूर्ण होऊ शकले नाही. प्राथमिक शिक्षणाच्या आधारावर त्यांनी केलेल्या अभ्यासानंतर त्यांनी होमिओपॅथीच्या प्रचाराला स्वतःला वाहून घेतले होते. त्यासाठी त्यांचा देशभर दौरा असे. विविध होमिपॅथिक डॉक्टरांना ते मार्गदर्शन करत असत. त्यांच्या माध्यमातून त्यांनी अनेक रुग्णांना बरे केल होते. कॅन्सर आणि इतर अनेक असाध्य आजार असलेल्या गरीब रुग्णांना ते मोफत औषधोपचार उपलब्ध करून देत असत.
प्रभू यांचे मूळ गाव असलेल्या वालावल येथील नर्मदाबाई अनंत शिवाजी देसाई माध्यमिक विद्यालय संस्थेचे ते माजी सचिव होते. वालावल गावातील लक्ष्मीनारायण संस्थान, मुंबईतील कुडाळदेशकर संस्थेशी ते निगडित होते. सिंधुदुर्ग जिल्ह्यासह कोकणातील नव्या कलाकारांना नव्या आणि उदयोन्मुख कलाकारांना व्यासपीठ मिळावे म्हणून स्थापन केलेल्या रत्नसिंधू परिवार संस्थेचे ते प्रमुख होते.
काही दिवसांपूर्वी त्यांच्यावर सांगली येथे हृदय शस्त्रक्रिया करण्यात आली होती. त्यानंतर करोनाची बाधा झाल्यामुळे ते कोल्हापूर येथील खासगी रुग्णालयात दाखल झाले होते. याच काळात त्यांना मूत्रपिंडाचा आजारही झाला. त्यावरही उपचार सुरू असतानाच काल सायंकाळी साडेसहा वाजता त्यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात निवृत्त शिक्षिका असलेल्या पत्नी अर्चना, प्रा. अक्षय, डॉ. प्रणव हे दोन पुत्र असा परिवार आहे.

