अशोक प्रभू आता आपल्याबरोबर या जगात नाहीत, या बातमीवर अत्यंत नाइलाजानं विश्वास ठेवावा लागतोय. हे लिहितानाही हात थरथरताहेत. कंठ दाटून आलाय. मनात विचारांचं काहूर माजलं आहे. आठवणींचे अनेक कप्पे उलगडताहेत आणि ते उलगडताना पुन्हा कंठ दाटून येतोय.
…..
आज अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सकाळीच एक अक्षय ठेवा हरपून गेल्याची बातमी मिळाली आणि मन सुन्न झालं. होमिओपॅथीचे प्रचारक अशोक प्रभू यांचं काल (दि. १३) सायंकाळी कोल्हापूरला निधन झाल्याची ती बातमी होती.
वालावल (ता. कुडाळ, जि. सिंधुदुर्ग) हे प्रभूंचं गाव, तर माझं आजोळ. माझ्या लहानपणीच्या त्यांच्याविषयीच्या काही आठवणी नाहीत. कारण जेव्हा मी आजोळी जात होतो, तेव्हा त्यांची माझी भेट झाली नव्हती. नंतर माझं आजोळी जाणंच कमी झालं आणि आजोळही वालावलीला राहिलं नाही. पण प्रभूंची मुंबईत जेव्हा सुमारे ३५ वर्षांपूर्वी भेट झाली, त्यानंतर वालावल हा आम्हा दोघांना एकत्र आणणारा धागा ठरला. नंतर प्रभू या व्यक्तीची अनेक रूपं मी पाहिली. तरीही त्यांच्या स्वभावाची मला पुरती ओळख अखेरपर्यंत झालीच नाही. आता ती फक्त आठवणं तेवढं हाती राहिलं आहे.
प्रभू दैनिक ‘सकाळ’चं काम कुडाळमध्ये करत होते, त्याचवेळी मीही ‘मुंबई सकाळ’मध्ये मुंबईत काम करत होतो. तेव्हाही माझी त्यांच्याशी ओळख नव्हती. पण ते मुंबईत सामना दैनिकात रुजू झाले त्यानंतर त्यांची माझी ओळख झाली. नंतर परिचय झाला. तो दिवसेंदिवस दाट होत गेला. या माणसाने कितीतरी चढ-उतार पाहिले. पत्रकारिता, सामाजिक संस्थांचा प्रसिद्धिपराङ्मुख, निःस्पृह, निःस्वार्थी कार्यकर्ता, आयुर्वेद आणि होमिओपॅथीची कोणतीही पदवी हाती नसताना निव्वळ अभ्यासाच्या जोरावर अनेक रुग्णांचा बनलेला तारणहार, कोकणातल्या आणि प्रामुख्याने सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या विविध कलांच्या जोपासनेसाठी आणि संवर्धनासाठी अनेक स्वप्नं उराशी बाळगणारा आणि त्यादृष्टीने पावलं टाकणारा एक दूरदर्शी कोकणवासी असे त्यांच्या जीवनाचे अनेक पैलू होते. दातृत्व हा तर त्यांचा सर्वांत मोठा गुण होता. ते करताना खरोखरीच या हाताचं त्या हाताला कळणार नाही, इतकी दक्षता ते बाळगत असत. इतकं सारं करूनही कोणत्याही बँकेत कसलंही एकही खातं नसलेला हा माणूस अनेकांचं आयुष्य आरोग्यदृष्ट्या आणि आर्थिकदृष्ट्या प्रचंड समृद्ध करून गेला. तीच त्यांची पुंजी होती आणि त्यातच ते खूपच समाधानी होते.
मुंबईत‘ ते ‘सामना’मध्ये असताना त्यांची आणि माझी रात्रपाळी संपल्यानंतर आम्ही कित्येक तास चर्चा करत होतो. पदाने वरिष्ठ, पण अनुभवशून्य असलेल्या अनेकांशी त्यांचा तेथे वाद होत असे. वयानं, अनुभवानं आणि ज्ञानानं अनुभवसंपन्न असूनसुद्धा केवळ नोकरी टिकविण्यासाठी त्यांनी त्यांच्या सुमार वरिष्ठांचा जाच आणि त्रास मुकाट्यानं सहन केला. त्यांचा वाद प्रामुख्यानं कोकणातली गावं, वाड्या-वस्त्या, त्यांचे प्रश्न, तिथल्या कला-संस्कृती याविषयीच्या बातम्या प्रसिद्ध करण्याच्या बाबतीत असायचा. वरिष्ठांना कोकणाची तशी काहीच माहिती नसायची. विशिष्ट शब्दप्रयोग माहीत नसायचे. प्रथा माहीत नसायच्या. त्यामुळे प्रभू यांनी लिहिलेल्या अनेक बातम्या त्या ‘एडिट’ करून म्हणजे आपल्या परीने त्यात दुरुस्ती करून प्रसिद्ध करत असत. हाच त्यांच्या वादाचा मुद्दा असायचा. वरचं पद मिळण्याची अपेक्षा त्यांनी कधी केली नव्हती आणि त्यांना ते मिळालंही नाही. पण जेव्हा वरिष्ठांचा जाच असह्य झाला तेव्हा त्यांनी मुकाट्याने नोकरी सोडून दिली. त्याचदरम्यान मीही रत्नागिरीत आलो. पण जेव्हा आम्ही दोघे मुंबईत होतो, तेव्हा आमच्या ज्या चर्चा चालत असत, त्यातूनच ‘कोकण पर्यटन मार्गदर्शक’ नावाच्या एका अंक स्वरूपाच्या पुस्तकाची निर्मिती झाली. सावंतवाडी ते डहाणू या कोकणपट्ट्यातल्या पर्यटनस्थळांची माहिती आणि परिचय करून देणारा तो अंक होता. हा अंक तयार करण्यासाठी या संपूर्ण भागात सुमारे पंधरा दिवस आम्ही दोघे सावंतवाडीपासून मुंबईपर्यंत स्कूटरने फिरलो. सावंतवाडी ते मुंबई अंतर पाचशे किलोमीटरचं आहे. पण मुख्य रस्त्यावरून आत जाणं, पुन्हा बाहेर येणं, पुढच्या रस्त्यावर जाऊन पुन्हा महत्त्वाच्या ठिकाणासाठी आत जाणं असं करत करत पाचशे किलोमीटर अंतर असताना आमचा प्रवास सोळाशे किलोमीटरचा झाला. ही १९९२ सालची घटना आहे.
हा सारा प्रवास करत असताना मला स्वतःला त्यांच्याकडून कोकणाविषयीची खूप माहिती मिळाली. बारीक-सारीक घटना कळल्या. इतिहास समजला. भविष्यात काय करायला हवं, हेही त्यांच्या बोलण्यातून येत असे. आम्ही तेव्हा प्रसिद्ध केलेला ‘कोकण पर्यटन मार्गदर्शक’ अशाच एका कल्पनेतून केला होता. त्या काळातही गणपतीपुळे किंवा पावस आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात मालवणचा किल्ला, आंबोली याव्यतिरिक्त कोणत्याच पर्यटनस्थळांचा परिचय कुठे प्रसिद्ध होत नव्हता. माहिती मिळत नव्हती. ती मिळविण्यासाठी आमचा खटाटोप होता. प्रमुख आणि प्रचलित स्थळांची माहिती तर आम्ही घेतलीच पण अगदी छोट्या-छोट्या गावांमध्ये जाऊनही तेव्हाच्या कोकणातल्या चार जिल्ह्यांमधल्या फार प्रसिद्ध नसलेल्या पर्यटनस्थळांची माहिती आम्ही संकलित केली. छायाचित्रं घेतली. त्यातून तयार झालेल्या एकाच अंकाचं दोन वेळा प्रकाशन आम्ही केलं.

पहिल्या वेळेचं प्रकाशन तेव्हाच्या कोकण विकास महामंडळाचे दिनेश देसाई आणि राज्यमंत्री शिशिर धारकर यांच्या हस्ते झालं होतं, तर दुसऱ्या वेळेचं प्रकाशन तेव्हाचे मुख्यमंत्री शरद पवार यांच्या हस्ते त्यांच्याच दालनात करण्यात आलं होतं. दोन टप्प्यात या अंकाच्या दहा हजार प्रती प्रसिद्ध केल्या आणि त्या खरोखरीच हातोहात संपल्या. कारण तोपर्यंत अशा पर्यटनस्थळांची माहिती एकत्रितरीत्या उपलब्ध नव्हती. ती झाली पाहिजे असं प्रभू यांना कित्येक वर्ष वाटत होतं. आम्ही ते प्रत्यक्षात आणलं. नंतर कित्येक वर्षं या पुस्तकातले उतारे जसेच्या तसे अनेक वर्तमानपत्रांमध्ये प्रसिद्ध झाले. पण पर्यटनाच्या वाढीला त्यामुळे नक्कीच चालना मिळाली. हे प्रभू यांच्या द्रष्ट्या पत्रकारितेचं उदाहरण होतं. ते पुस्तक साकारताना आठवड्याच्या सुट्टीच्या दिवशी एसटीचा प्रवास करून आम्ही कोकणात येऊन अनेक ठिकाणांची माहिती दिवसभर मिळवायची आणि पुन्हा रातोरात मुंबईला जायचं, असंही अनेक ठिकाणांच्या बाबतीत आम्ही केलं होतं. त्यातूनच ‘कोकण पर्यटन मार्गदर्शक’ प्रसिद्ध करता आलं. त्यानंतर असे अनेक प्रकल्प तसेच राहून गेले. कोकणातलं प्रत्येक धरण, त्या धरणाखाली येऊ घातलेली शेती, प्रत्यक्षात पिकाखाली आलेली शेती, कोकणातल्या प्रथा आणि परंपरा जपणारी जुनी मंदिरं, मंदिरांच्या जपल्या गेलेल्या देवराया, प्रत्येक नदीचा उगम आणि समुद्राशी झालेल्या संगम, या सर्व ठिकाणी होऊ घातलेले, निर्माण होऊ शकणारे रोजगार हे प्रभू यांच्या चर्चेचे त्या काळातले विषय होते. विशेष म्हणजे या प्रश्नांवर आजही स्वतंत्रपणे कुणीही लिहिलेलं नाही. मंत्री, लोकप्रतिनिधी जे सांगतात, तेवढंच लिहून घ्यायचं असं करून चालणार नाही. आपण त्यापलीकडे जाऊन अनेक गोष्टींचा शोध घेतला पाहिजे, असं प्रभू यांच्यातल्या पत्रकाराला वाटत होतं. पण ते आणि मी दोघेही नोकरी करत होतो. त्यामुळे नोकरीसाठी जे नेमून दिलं आहे, तेवढंच आम्हाला नाइलाजाने करावं लागत होतं.
नंतर मी रत्नागिरीला आलो. त्यानंतर काही काळातच वरिष्ठांच्या जाचाला कंटाळून प्रभू यांनी पत्रकारितेला रामराम ठोकला. आमचे जुने आणि ज्येष्ठ सहकारी ज्येष्ठ पत्रकार भाऊ तोरसेकर यांनी अलीकडेच त्यांच्या ‘प्रतिपक्ष’ या यूट्यूब चॅनेलवरून वर्तमानपत्रांसाठी आणि नियतकालिकांसाठी लिहायचं सोडून देणार असल्याचं जाहीर केलं आहे. सध्याच्या प्रचलित पत्रकारितेला रामराम ठोकल्याचं त्यांनी म्हटलं आहे. पत्रकारांकडून योग्य प्रश्नांची दखल घेतली जात नाही, उकल करून घेतली जात नाही, प्रश्नांच्या, समस्यांच्या मुळाशी जाण्याची पत्रकारांची प्रवृत्ती नष्ट झाली आहे, असं श्री. तोरसेकर यांना वाटू लागलं. म्हणून त्यांनी वृत्तपत्रीय पत्रकारितेला रामराम ठोकला. अशोक प्रभू यांनीही पंचवीस वर्षांपूर्वी याच पद्धतीनं पत्रकारितेला रामराम ठोकला.
होमिओपॅथीच्या अभ्यासक्रमासाठी त्यांनी प्रवेश घेतला होता. पण त्यांना कौटुंबिक अडचणींमुळे ते शिक्षण पूर्ण करता आलं नाही. नंतर काही काळ त्यांनी मुंबईत झंडू फार्मास्युटिकल्स कंपनीत विक्री प्रतिनिधी म्हणून काम केलं. या दोन्हीचा अनुभव गाठीशी घेऊन होमिओपॅथीचं मर्म समजून घेऊन त्यांनी औषधोपचार सुचवायला सुरुवात केली. नंतर स्वतःच सगळी सामग्री स्वतःकडे ठेवली आणि मोठमोठ्या बॅगा घेऊन ते वेगवेगळ्या शहरांमध्ये जाऊ लागले. पदरी पदवी नसल्यामुळे डॉक्टर म्हणून ते स्वतः कोणावरही उपचार करू शकत नव्हते. ही मर्यादा त्यांना माहीत होती. म्हणून त्यांनी ठिकठिकाणच्या होमिओपॅथीच्या पदवीधारकांना मार्गदर्शनाचं काम सुरू केलं. त्यांच्या दवाखान्यांमध्ये जाऊन त्यांच्याकडे येणाऱ्या रुग्णांच्या उपचारांसाठी त्यांनी त्या त्या डॉक्टरांना मदत केली. असे अनेक डॉक्टर आता महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागांमध्ये विखुरलेले आहेत आणि यशस्वी पद्धतीनं आपल्या उपचार पद्धतीचा अवलंब रुग्णांवर करून रुग्णांना आराम मिळवून देत आहेत. त्या त्या डॉक्टरांकडे येणाऱ्या रुग्णांना या रामबाण औषधोपचारांच्या मागे प्रभू यांचं ज्ञान असल्याचं माहीत होतं. म्हणूनच त्यांच्या दृष्टीने अशोक प्रभू म्हणजे त्यांच्या आरोग्याचा प्रभू ठरला होता. प्रभू जेव्हा वेगवेगळ्या शहरांमधल्या त्यांच्या शिष्यांच्या दवाखान्यात हजर असत, तेव्हा दिवस-रात्र रुग्णांची अक्षरशः रांग लागलेली असे. ही गर्दी म्हणजे प्रभू यांच्या दृष्टीनं लोकप्रियता नव्हती, तर या रुग्णांमध्ये ते त्यांच्या स्वतःच्या प्रभूला म्हणजे दत्तप्रभूला पाहत असत.परमेश्वर आपली परीक्षा घ्यायला रुग्णाच्या रूपानं आपल्यासमोर आला आहे. त्याला संतुष्ट करायला हवं, अशी त्यांची धारणा असे. म्हणूनच त्यांच्या हाताला यश होतं. मुंबईत आशा भोसलेंसारखी गायिकाही त्यांच्याकडे रुग्ण म्हणून येत असे.
पत्रकारिता सोडल्यानंतर होमिओपॅथीच्या प्रचारासाठी आणि प्रसारासाठी त्यांनी अक्षरश: देशभर पायाला चाकं लावून दौरे केले. पूर्वी एसटीचा प्रवास सहजपणे त्यांनी ज्या पद्धतीनं केला, तितक्या सहजतेनं अतिजलद रेल्वे गाड्या आणि अलीकडच्या काळात तर ते विमान प्रवासही करत असत. प्रवासात घालवायचा वेळ कमी करून रुग्णांना अधिकाधिक वेळ देता यावा, हा त्यातला उद्देश असे. या दौऱ्यातही पहाटेची आन्हिकं उरकल्याशिवाय ते कामाला बसत नसत. पुरुषसूक्त, श्रीसूक्त म्हणत त्यांची आंघोळ होत असे. रुद्राध्याय आणि पवमानाची आवृत्ती अंघोळीनंतर न चुकता त्यांच्या तोंडून म्हटली जात असे. त्यात अखेरपर्यंत खंड पडला नसणार, अशी मला तरी खात्री आहे. एखाद्या पारंगत वेदाध्यायीप्रमाणे स्पष्ट शब्दोच्चार हेही त्यांच्या वाणीचं वैशिष्ट्य होतं. तसे ते धार्मिक वृत्तीचे होते. माणगावचे वासुदेवानंद टेंबे स्वामी महाराज आणि नृसिंहवाडीतील दत्त महाराज ही त्यांची आराध्य दैवतं होती. साधा ताप आला तर त्यांचं स्वतःचं त्यावरचं औषध अत्यंत रामबाण होतं. ते कोणाला सांगितलं तर पटणारही नाही. आजारपण आलं, तर कुठूनही नृसिंहवाडी गाठणं आणि गुरुचरित्राचं पारायण करणं हा त्यांचा त्यावरचा उपाय होता. पण लक्षात घ्या, गुरुचरित्राच्या ५२ अध्यायांचं टप्प्याटप्प्यानं आठवडाभर पारायण करण्याची पद्धत आहे. प्रभू मात्र एका दिवसात गुरुचरित्राचे सर्व ५२ अध्याय वाचायचे. असं सलग सात दिवस करायचं, ही त्यांची गुरुचरित्र पारायणाची पद्धत होती. ही त्यांची दत्तगुरूंवरची निष्ठा होती. अधिकांश काळ ते नृसिंहवाडीला असत. आपली अखेरही याच भूमीत व्हावी, असं त्यांना वाटत असे. अखेरच्या त्यांच्या आजारपणात आपला मृत्यू कुठेही झाला, तरी आपले अंत्यसंस्कार मात्र नृसिंहवाडीलाच व्हावेत, असं त्यांनी जवळच्या नातलगांना सांगून ठेवलं होतं. (दुर्दैवानं ती त्यांची इच्छा पूर्ण होऊ शकली नाही.)
रुग्णांवरच्या उपचारांच्या निमित्तानं देशभर फिरत असतानाच त्यांचं आपल्या जिल्ह्याकडे, आपल्या गावाकडेही लक्ष होतं. वालावलचा लक्ष्मीनारायण हे त्यांचं ग्रामदैवत. तिथले अनेक कार्यक्रम कालौघात बंद पडले होते किंवा अगदी मोजक्या लोकांच्या उपस्थितीत ते होत असत. हे बदलायचं त्यांनी ठरवलं. आषाढी एकादशीला रुद्रावर्तनं त्यांनी सुरू केली. किमान तीन वर्षं हा उपक्रम त्यांनी राबवला. मंदिरात त्यादिवशी मोठी गर्दी होऊ लागली. याच मंदिराच्या आवारात मनोरंजनाचे आणि प्रबोधनपर कार्यक्रम पूर्वी एकादशीला होत असत. त्या ठिकाणी स्वरसिंधुरत्न परिवार ही त्यांनीच सुरू केलेली संस्था वेगवेगळे गायनाचे आविष्कार घडवू लागली. त्यासाठी जिल्ह्यातल्या प्रत्येक तालुक्यात त्यांनी आधी नव्या कलाकारांना व्यासपीठ मिळावं, म्हणून स्पर्धा आयोजित केल्या. प्रत्येक तालुक्यातून प्रथम येणाऱ्या तीन कलाकारांमधून जिल्हा स्तरावरची स्पर्धा घेतली. त्यातून विजयी झालेल्या कलाकारांचा आविष्कार लक्ष्मीनारायण मंदिराच्या व्यासपीठावर घडवून आणला. कलेची जोपासना आणि उपासना एकत्र आणण्याचा त्यांचा हा प्रयत्न होता. यातूनच पुढे आलेल्या काही कलाकारांचा मुंबईची नाट्यपंढरी समजल्या जाणाऱ्या शिवाजी मंदिरात कार्यक्रम त्यांनी घडवून आणला. त्यालाही उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या संपूर्णपणे मोफत कार्यक्रमाचा संपूर्ण खर्च प्रभू यांनीच केला होता. आशा भोसलेंशी असलेल्या ओळखीचा त्यांनी या ठिकाणी फायदा करून घेतला. तो म्हणजे या कलाकारांना त्यांचे आशीर्वाद मिळवून दिले. आशा भोसले त्या कार्यक्रमाला उपस्थित राहू शकल्य नाहीत. पण त्यांनी शक्य ते सर्व सहकार्य नवोदित कलाकारांना करायचं आश्वासन त्यांना दिलं. आपल्या भागातली कला, आपल्या भागातले कलाकार राज्य पातळीपर्यंत पोहोचावेत, त्यापुढे त्यांची आपोआप प्रगती होईल, असं त्यांचं गृहीतक होतं. दशावतारी कलाकारांची सूची, गायक, वादक आणि इतर सर्व कलाकारांची सूची तयार करण्याचं मोठं स्वप्न त्यांनी पाहिलं होतं. ते अपूर्णच राहिलं.

करायचं तर ते दणक्यात, असाच त्यांचा खाक्या होता. रत्नसिंधू परिवाराचा मुंबईतला कार्यक्रम जसा त्यांनी दणक्यात केला, त्याच पद्धतीनं ‘कोकण मीडिया’ या आमच्या साप्ताहिकाच्या दिवाळी अंकाच्या स्पर्धेचं पारितोषिक वितरणही वेगळ्या स्वरूपात त्यांनीच घडवून आणलं. हा कार्यक्रम गेल्या वर्षी २९ फेब्रुवारीला म्हणजे चार वर्षांतून येणाऱ्या दिवशी केला. हेही वेगळेपण होतं. गेल्या वर्षीप्रमाणे या वर्षीही घेतलेल्या स्पर्धेचं पारितोषिक वितरण भव्य समारंभात करू या, असं त्यांनी सांगितलं होतं. त्यासाठी जुळवाजुळव करायला सांगितलं होतं. पण करोनाचं संकट यावर्षीही आलं आणि ते अपूर्णच राहिलं. (कार्यक्रमातल्या त्यांच्या मनोगताचा व्हिडिओ शेवटी दिला आहे.)
सचिन तेंडुलकरचे गुरू रमाकांत आचरेकर यांना राजापूर तालुक्यातल्या एका छोट्याशा क्रिकेट स्पर्धेसाठी त्यांनी मुद्दामहून आणलं होतं. आचरेकर सरांशी असलेल्या ओळखीचा त्यांनी हा असा उपयोग करून घेतला होता. मुलाच्या क्रिकेटच्या प्रेमाखातर त्यांनी आचरेकर सरांना आणलं असलं आणि स्पर्धा छोटीशी असली तरी अशी एखादी मोठी व्यक्ती गावात आली की गावातल्या क्रीडापटूंनाही प्रोत्साहन मिळतं, हा त्यांचा त्यातला हेतू होता. वालावलच्या रत्नसिंधू परिवाराच्या कार्यक्रमाच्या निमित्तानंही त्यांनी काही दिग्गज कलाकारांना निमंत्रित केलं होतं. अनेक मोठ्या व्यक्तींशी त्यांचा संपर्क होता आणि ते प्रभू यांच्यासाठी काहीही करायला तयार असायचे. पण योग्य त्या ठिकाणी आणि समाजासाठीच त्यांचा उपयोग करून घ्यायचा, हे प्रभू यांनी ठरवून टाकलं होतं. वैयक्तिक कोणत्याच कामासाठी त्यांनी मोठ्या व्यक्तीच्या ओळखीचा फायदा करून घेतला नाही. अन्यथा मुंबईसारख्या ठिकाणी स्वतःच्या मालकीचं घर म्हणजे एखादा फ्लॅट मिळवणं त्यांना मुळीच कठीण नव्हतं. पण अशा लौकिक गोष्टींबद्दल त्यांना कधीच आसक्ती नव्हती.
अशोक प्रभू नावाचा हा असा माणूस रित्या हातांना भरपूर मदत करत गेला. स्वतःचे खिसे रिकामेच ठेवत गेला. प्रसिद्धीपासून नेहमीच अलिप्त राहिला. मदत करण्याचं त्यांचं तत्त्वही ऐकण्यासारखं होतं. दाभोली मठातल्या स्वामींवर त्यांची खूपच निष्ठा होती. ते जे काही सांगतील, ते करायचंच हे त्यांचं व्रत होतं. त्यांनीच सांगितलं होतं की प्रत्येक महिन्याच्या शुद्ध प्रतिपदेपासून जे मिळत जाईल, ते अमावास्येला संपवून टाकायचं. शिल्लक ठेवायचं नाही. ते व्रत प्रभूंनी अखेरपर्यंत निभावलं. अमावास्येच्या रात्री एकही पैसा शिल्लक ठेवायचा नाही. त्यादिवशी गरज असलेली एखादी व्यक्ती किंवा एखादी संस्था समोर आली, तर तिला असलेले नसलेले सगळे पैसे देऊन टाकायचे. हे त्यांनी ठरवलं होतं. तसं ते करत असत. हे मी स्वतः पाहिलेलं आहे. दुसऱ्या दिवशी पुन्हा नव्यानं पैसे मिळत जातील, पण त्याचाही संग्रह करायचा नाही. असंग्रह तत्त्व त्यांनी जोपासलं होतं. कोणत्याच गोष्टीचा संग्रह करायचा नाही असं ठरवल्यामुळे त्यांचे हात त्यादृष्टीने रिकामेच राहिले, पण जगाचा निरोप घेताना मात्र हा माणूस रिकाम्या हातांनी नक्कीच गेला नाही. असंख्य लोकांच्या डोक्यावर मदतीचा हात ठेवून पंचत्वात विलीन झाला. आणखी एका गोष्टीचं वाईट वाटलं. आधुनिक उपचार पद्धतीच्या चौकटीनं कितीही अमान्य केलं, तरी होमिओपॅथीनं करोनासारखा दुर्धर आजार बरा होऊ शकतो, हे प्रभू यांनी सिद्ध केलं होतं. शेकडो रुग्णांना या व्याधीतून सुखरूप बाहेर काढलं होतं. मात्र त्याच व्याधीनं त्यांचा बळी घेतला.
मोठा भाऊ गेल्याचं दुःख काय असू शकतं, ते मी स्वतः आज अनुभवत आहे. माझ्याप्रमाणेच अनेक बंधू-भगिनींना दुःखसागरात लोटून प्रभू अज्ञाताच्या प्रवासाला निघून गेले. त्या सर्वांच्या वतीनं परमेश्वराला प्रार्थना करतो की त्यांच्यासारख्या निस्सीम दत्तभक्ताला तू सद्गती देशीलच, पण त्यांच्यावर पती म्हणून पूर्ण श्रद्धा असलेल्या प्रभू वहिनी आणि अक्षय तसंच प्रणव या दोघा पुत्रांना त्यांच्या जाण्याचं दुःख पचविण्याची शक्ती दे. त्यांना श्रद्धास्थान मानणाऱ्या सर्वांनाच मानसिक बळ दे आणि असेच अनेक प्रभू पुन्हा एकदा जन्माला येऊ देत.
- – प्रमोद कोनकर
- (९४२२३८२६२१)

