तौते चक्रीवादळ रविवारी, १६ मे रोजी रत्नागिरी जिल्ह्यात

रत्नागिरी : अरबी समुद्रात सुरू झालेले तौते चक्रीवादळ रविवारी, १६ मे रोजी रत्नागिरी जिल्ह्यातील पाच तालुक्यांच्या जवळून समुद्रातून गुजरातच्या दिशेने जाणार आहे. त्यामुळे या तालुक्यांमध्ये आवश्यक ती सर्व खबरदारी घेण्यात आली असून वादळाच्या स्थितीचा सामना करण्यासाठी प्रशासन सज्ज असल्याची माहिती जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी आज ऑनलाइन पत्रकार परिषदेत दिली.

श्री. मिश्रा म्हणाले, वादळाची दिशा आणि वेग सातत्याने बदलत आहे. मात्र आज सायंकाळी साडेचार वाजता मिळालेल्या माहितीनुसार हे चक्रीवादळ राजापूर तालुक्यातील आंबोळगड, साखरीनाटे परिसरात सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास रत्नागिरी जिल्ह्याच्या समुद्रात येईल. पूर्णगडमध्ये एक वाजता, तर रत्नागिरीला चार वाजता आणि मालगुंड-गणपतीपुळे परिसरात संध्याकाळी सहा वाजता ते पोहोचेल. रात्री अकरा वाजल्यानंतर गुहागर तालुक्यात वादळ पोहोचणार असून सोमवारी पहाटे चार वाजता ते दापोली आणि मंडणगड तालुक्यांकडे जाईल. राजापूर तालुक्यातील सागवे, साखरी नाटे, रत्नागिरी तालुक्यातील गणेशगुळे, पावस, मिरकरवाडा, जयगड तसेच संपूर्ण गुहागर, दापोली आणि मंडणगड तालुक्यांच्या किनारपट्टीवरील गावांना वादळाचा दणका बसण्याची शक्यता आहे. साधारणपणे वादळाचा वेग सध्या ताशी ६० किलोमीटर असून तो कमी-जास्त होऊ शकतो. काही ठिकाणी हा वेग ताशी ९० किलोमीटरपर्यंतही पोहोचू शकतो. या दरम्यान येणाऱ्या चक्रीय स्थितीमुळे किनारपट्टीवरील कच्च्या घरांचे नुकसान होऊ शकते. त्यामुळे किनारपट्टीवरील गावांमधील कच्ची घरे, पत्रे आणि कौलारू घरांमधील नागरिकांना स्थलांतरित करण्याची प्रक्रिया सुरू आहे. रत्नागिरी जिल्ह्यात नोंदणीकृत असलेल्या ४७९ मच्छीमारी नौका दुपारपर्यंत किनाऱ्यावर पोहोचल्या आहेत. कोणतीही नौका समुद्रात नाही. इतर राज्यांच्या काही मच्छीमारी नौका तात्पुरत्या स्वरूपात रत्नागिरी जिल्ह्याच्या किनाऱ्यावर नांगरण्यात आल्या आहेत. जनावरे तसेच समुद्रात ठेवलेल्या नौका बांधून ठेवण्याची सूचना करण्यात आली आहे.

श्री. मिश्रा म्हणाले, चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर वादळ ज्या भागात असेल, त्यानुसार राजापूर, रत्नागिरी, गुहागर, दापोली आणि मंडणगड या तालुक्यांमध्ये संपूर्ण संचारबंदी लागू करण्यात आली आहे. सर्व शासकीय यंत्रणा चक्रीवादळाचा सामना करण्यासाठी सज्ज असतील. करोनाच्या पार्श्वभूमीवर रुग्ण दाखल असलेल्या हॉस्पिटलमध्ये वीजपुरवठा खंडित होऊ नये आणि झाल्यास पर्यायी व्यवस्था करण्यात आली आहे. रुग्णांसाठी आवश्यक असलेल्या ऑक्सिजनपेक्षा २० टन अधिक साठा जिल्ह्यात उपलब्ध आहे. सर्व कोविड रुग्णालये तालुक्यांच्या ठिकाणी असून ती किनारपट्टीपासून दूर असल्यामुळे त्यांना कोणताही धोका पोहोचण्याची शक्यता नाही, असे जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. या वादळात विजेचे आणि दूरध्वनीचे खांब कोसळण्याची तसेच दूरध्वनी केंद्रांना केला जाणारा वीजपुरवठा खंडित झाल्यामुळे मोबाइलचे नेटवर्क बंद पडण्याची शक्यता आहे. गेल्या वर्षी झालेल्या निसर्ग चक्रीवादळाच्या तुलनेत यावर्षीच्या चक्रीवादळाचा वेग सुमारे पन्नास टक्क्यांहून कमी आहे. हे वादळ किनारपट्टीवरून जमिनीवर येणार नाही, तर समुद्रातून पुढे जाणार असल्यामुळे हानीची शक्यता कमी आहे. मात्र वादळाचा वेग आणि दिशा सतत बदलत असल्यामुळे सातत्याने परिस्थितीवर लक्ष ठेवावे लागणार आहे. त्यासाठी शासकीय यंत्रणा सज्ज आहे.

महावितरण कंपनीची ४४ पथके सज्जा आहेत. समाजसेवी संस्थांचे सहकार्यही प्रत्येक तालुक्यात घेण्यात येणार आहे. राज्य आपत्ती निवारण कक्षाची मदत घेतली जाणार आहे. त्याशिवाय अनेक नागरिकांना पोहण्यासह इतर गरजेच्या गोष्टींचे प्रशिक्षण देण्यात आले आहे. या वादळात पूरपरिस्थिती निर्माण होण्याची शक्यता नसली तरी काही नौका पर्याय म्हणून सज्ज ठेवण्यात आल्या आहेत. नागरिकांनीही वादळाच्या दृष्टीने पुरेशी काळजी घ्यावी. प्रशासनाने दिलेल्या विविध सूचनांचे पालन करावे. शक्यतोवर शासनाच्या विविध संकेतस्थळांवर वादळाची माहिती घेऊन त्यानुसार सज्जता बाळगावी, असे आवाहनही श्री. मिश्रा यांनी केले आहे.

नियंत्रण कक्षाचे क्रमांक

Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply