सिंधुदुर्ग जिल्ह्यात रविवारी पहाटे चार वाजल्यापासून तौते चक्रीवादळ

सिंधुदुर्गनगरी : अरबी समुद्रात निर्माण झालेले तौते चक्रीवादळ जिल्ह्याच्या समुद्रात रविवारी, १६ मे रोजी दाखल होत आहे. पहाटे ४ वाजता ते जिल्ह्याच्या समुद्रात दाखल होणार असून दुपारी २ वाजल्यानंतर ते जिल्ह्यातून पुढे जाईल. या काळात नागरिकांनी अधिक दक्ष राहावे, असे आवाहन जिल्हाधिकारी के. मंजूलक्ष्मी यांनी केले आहे.

तौक्ते चक्रीवादळामुळे जिल्ह्यात आज काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता प्रादेशिक हवामान विभागाने वर्तवली होती. तिचा अनुभव लोकांनी घेतला. वादळाच्या प्रभावाने महाराष्ट्र आणि गोवा किनारपट्टीवर ताशी ५० ते ७० कि.मी. वेगाने काही ठिकाणी वारे वाहत होते. उद्या, रविवारी ताशी ६० ते ८० कि.मी. वेगाने वारे वाहणार आहेत. समुद्र खवळलेला राहणार आहे. या कालावधीत मच्छिमारांनी तसेच नागरिकांनी समुद्रात जाऊ नये, असा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे.

चक्रीवादळ कालावधीत विजा चमकणार असल्याने या कालावधीत दक्षता घेणे आवश्यक आहे. विजा चमकत असताना संगणक, टीव्ही इत्यादी विद्युत उपकरणे बंद ठेवून स्रोतांपासून अलग करून ठेवावीत. दूरध्वनी, भ्रमणध्वनीचा वापर टाळावा. नागरिकांनी घराबाहेर पडू नये. घराबाहेर असल्यास सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्यावा. विजेच्या खांबांपासून लांब राहावे. उंच झाडाखाली आश्रयास थांबू नये. एखाद्या मोकळया परिसरात असल्यास, गुडघ्यामध्ये डोके घालून वाकून बसावे. धातूच्या वस्तू दूर ठेवाव्यात.
चक्रीवादळ कालावधीत वाहणारा सोसाट्याचा वारा आणि मुसळधार पर्जन्यवृष्टी लक्षात घेऊन नागरिकांनी सावधगिरी बाळगावी. मुसळधार पावसात आणि सोसाट्याच्या वाऱ्यात आवश्यकता नसल्यास घराबाहेर पडणे टाळावे. घराबाहेर अथवा असुरक्षित ठिकाणी असल्यास पाऊस व वारा थांबेपर्यत सुरक्षित ठिकाणी आसरा घ्यावा. अतिमुसळधार व अतिवृष्टीच्या परिस्थितीत व सोसाट्याचा वारा वाहत असताना सुरक्षित ठिकाणी राहावे व पायी अथवा वाहनाने प्रवास करू नये. पाऊस पडत असताना विजा चमकत असल्यास झाडाखाली उभे राहू नये. मोबाइलवर संभाषण करू नये आणि इलेक्ट्रिक वस्तूंपासून दूर राहावे. अशा परिस्थितीत पक्के घर किंवा इमारतीत आसरा घ्यावा.

नियंत्रण कक्षाचे दूरध्वनी क्रमांक
मुसळधार पावसामुळे उद्भवलेल्या कुठल्याही प्रकारच्या आपत्कालीन परिस्थितीमध्ये मदतीसाठी जिल्हा नियंत्र कक्ष-02362-228847 किंवा टोल फ्री – 1077 ला संपर्क करावा. तालुका नियंत्रण कक्ष दोडामार्ग तालुक्यासाठी – 02363-256518, सावंतवाडी तालुक्यासाठी – 02363-272028, वेंगुर्ले तालुक्यासाठी – 02366-262053, कुडाळ तालुक्यासाठी – 02362-222525, मालवण तालुक्यासाठी – 02365-252045, कणकवली तालुक्यासाठी – 02367-232025, देवगड तालुक्यासाठी- 02364- 262204, वैभववाडी तालुक्यासाठी – 02367-237239, या दूरध्वनी क्रमांवर संपर्क करावा. हवामानाची माहिती भारतीय हवामान खात्याच्या http://www.imd.gov.in या संकेतस्थळावरुन घ्यावी. तसेच टीव्ही, रेडिओ इत्यादीवरून प्रसारित होणाऱ्या बातम्यांवर लक्ष ठेवावे.

कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये. अफवा पसरवू नयेत. कोणत्याही बातमीची खात्री अधिकृत सूत्रांकडून करून घ्यावी किंवा जिल्हा नियंत्रण कक्ष 02362 – 228847 किंवा टोलफ्री क्रमांक – 1077 या क्रमांवर संपर्क साधून बातमीची खातरजमा करावी. जुन्या, मोडकळीस आलेल्या इमारती, पूल इत्यादी ठिकाणी जाण्याचे टाळावे. हवामान विभागाकडून, जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आलेल्या सूचनांचे पालन करुन जीवित व मालमत्तेची काळजी घ्यवी, असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे.

Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply