रत्नागिरीत इन्फिगो आय केअरमध्ये २८, २९ मे रोजी होणार विशेष तपासणी
रत्नागिरी : काचबिंदू आजारामुळे दृष्टीला असणारा गंभीर धोका लक्षात घेऊन रत्नागिरीतील इन्फिगो आय केअर हॉस्पिटलमध्ये येथे सुसज्ज काचबिंदू निदान विभाग सुरू करण्यात आला आहे. याद्वारे येत्या २८ आणि २९ मे रोजी रुग्णांची तपासणी करण्यात येणार आहे, अशी माहिती हॉस्पिटलचे संचालक डॉ. श्रीधर ठाकूर यांनी दिली.
काचबिंदूविषयी अधिक माहिती देताना डॉ. ठाकूर म्हणाले, दृष्टीला घातक असणारी ही व्याधी आहे. सर्वसामान्य लोकांना जशी मोतीबिंदूची माहिती असते, तशी काचबिंदूविषयी नसते. प्रत्येक १०० जणांपैकी ३ ते ४ जणांना काचबिंदू असल्याचे सर्वेक्षणातून लक्षात आले आहे. भारतातील १३ टक्के अंध काचबिंदूमुळे झाले आहेत.
काचबिंदू हा डोळ्यांचा अत्यंत धोकादायक आजार असून त्याच्या शेवटच्या अवस्थेमध्ये तो संपूर्ण दृष्टिनाश घडवून आणू शकतो. अनेकदा या आजाराचे निदान तो एका विशिष्ट अवस्थेत पोहचेपर्यंत निदान झालेले नसते. ठराविक प्रमाणात दृष्टी नष्ट झाल्यावरच तो लक्षात आल्याने अशी व्यक्ती डॉक्टरांकडे जाते व काचबिंदूचे निदान होते. तोपर्यंत काही प्रमाणात नष्ट झालेली दृष्टी परत कधीही येत नाही.
ग्लुकोमा किंवा काचबिंदू यात सर्वसामान्य लक्षणांमध्ये डोळे सतत लाल होणे, बाजूची दृष्टी नष्ट होणे किंवा
अस्पष्ट दिसणे, गाडी चालवताना बाजूचे न दिसणे, दिसणारे दृश्य अरुंद असणे ही लक्षणे असतात. काचबिंदू स्त्रियांमध्ये जास्त आढळून येतो. मुख्यतः संध्याकाळी कमी प्रकाशात अथवा थिएटरमधून सिनेमा बघून बाहेर आल्यावर डोकेदुखी उद्भवणे, उलट्या, मळमळणे, बल्बच्या उजेडाचा प्रकाश फाटल्यासारखा दिसणे, क्वचित प्रसंगी अचानक नजर कमी होणे आणि थोड्या वेळानंतर पूर्ववत होणे ही लक्षणे दिसून येतात.
काचबिंदू होण्याच्या कारणांमध्ये आनुवंशिकता किंवा आई-वडिलांपैकी कुटुंबामध्ये काचबिंदू असणे, डोळ्यांतील द्रव्याचा दाब वाढणे यासारखी कारणे आढळतात. ज्यांना बर्याोच वर्षांपासून मधुमेह आहे किंवा डोळ्यांचे काही विशिष्ट आजार आहेत, त्यांनासुद्धा काचबिंदू होण्याची शक्यता असते.
काचबिंदूमध्ये डोळ्यांची स्थिती ओळखण्यासाठी डोळ्यांची नियमित तपासणी करणे आवश्यक असते. यामध्ये डोळ्यांचे प्रेशर तपासले जाते. डोळ्याचा दाब किंवा प्रेशर तपासण्यासाठी टोनोमेट्रो नावाची तपासणी केली जाते. गौण दृष्टी नष्ट होत आहे का, हे तपासण्यासाठी व्हिजुअल फील्ड चाचणी केली जाते.
काचबिंदूचे निदान होण्याआधी गेलेली दृष्टी परत आणणे अशक्य असते. परंतु उपचाराने दृष्टीचे बिघडणे थांबवता येते. उपचार काचबिंदूच्या प्रकारावर अवलंबून असतो. काचबिंदू सर्व वयोगटांमध्ये आढळू शकतो. काचबिंदूचे विशेष प्रशिक्षण घेतलेले तज्ञ्च डॉक्टर सर्वत्र उपलब्ध नसतात.
रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात काचबिंदू या विषयातील सुपर स्पेशालिस्ट तज्ज्ञ डॉक्टर्स आणि सुविधा उपलब्ध नाही. हे लक्षात घेऊन रत्नागिरीत इन्फिगो आय केअर हॉस्पिटलमध्ये हा विभाग सुरू करण्यात आला आहे. भुवनेश्वर येथील एल. व्ही. प्रसाद आय इन्स्टिट्यूटमध्ये डॉ. अविक रॉय या विख्यात काचबिंदू तज्ज्ञाच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षित डॉ. लिसिका गावस तपासणी करणार आहेत. येत्या २८ आणि २९ मे रोजी सकाळी १० ते सायंकाळी ७ या वेळेत काचबिंदूची तपासणी होईल.
नावनोंदणीसाठी संपर्क
तपासणीकरिता नावनोंदणी करणे आवश्यक आहे. त्याकरिता ९३७२७६६५०४ या क्रमांकावर संपर्क साधून वेळ घेणे आवश्यक आहे. सध्याच्या करोना काळात प्रवासासाठी अडचण असल्याने नावनोंदणी केल्यावर प्रत्येकाला आवश्यक असल्यास प्रवासासाठी पत्र दिले जाईल. जिल्ह्यात काचबिंदू रुग्णांची संख्या लक्षणीय आहे. अशा लोकांनी या संधीचा फायदा घेऊन नेत्रतपासणी करावी, असे आवाहन डॉ. ठाकूर यांनी केले आहे.

