माजी सरपंच, शेतीनिष्ठ शेतकरी वसंतदादा गुण्ये यांचे निधन

रत्नागिरी : मठ (ता. लांजा) येथील माजी सरपंच आणि शेतीनिष्ठ शेतकरी वसंत जगन्नाथ गुण्ये (वय ७८) यांचे आज सकाळी अल्प आजाराने निधन झाले.

वसंतदादा गुण्ये सलग दहा वर्षे मठ गावाचे सरपंच होते. आपल्या कार्यकाळात गावात शेतीविषयक सुधारणा घडविण्याचा त्यांनी चांगला प्रयत्न केला. पशुपालन वाढीला लागावे, यासाठीही ते सतत प्रयत्नशील होते. गावातील प्राथमिक शाळेच्या सुवर्ण महोत्सवानिमित्ताने निधी उभारण्यात त्यांचा मोठा हातभार होता. सरपंचपदानंतरही त्यांनी गावात मोठे समाजकार्य केले. गावातील विविध सोयीसुविधा उभारण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले. काही दूध संस्थांची निर्मिती केली. ते काँग्रेसचे निष्ठावंत कार्यकर्ते होते. माजी आमदार शिवाजीराव सावंत, छोटूभाई देसाई इत्यादींच्या बरोबरीने त्यांनी काम केले. शेतीविषयक सुधारणांसाठी त्यांना वसंतराव नाईक यांच्या पुसद (जिल्हा यवतमाळ) या गावी पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले होते.

दिलदार आणि उमदे व्यक्तिमत्त्व म्हणून ओळख असलेल्या दादांना नाट्य क्षेत्राची आवड आणि जाण होती. गावात होणाऱ्या नाट्यप्रयोगांसाठी ते सर्व तऱ्हेची मदत करत असत. प्रसंगी पदरमोड करून अर्थसाह्यही करत असत. एका नाटकासाठी तर त्यांनी थेट कोल्हापूरला जाऊन कपडेपट स्वखर्चाने आणला होता. नाटकात काम करणे तसेच नाटक बसविण्याचे कामही त्यांनी केले होते.

अलीकडे त्यांनी गोरखनाथ मंगल कार्यालय सुरू केले होते. तेथे अनेक गरजू आणि गरिबांसाठी त्यांनी अल्पशा खर्चात किंवा अगदी मोफतही विवाह संस्कार केले. मठ येथे आठ वर्षांपूर्वी स्थापन झालेल्या पल्लीनाथ मंदिराच्या उभारणीलाही त्यांनी आवश्यक ते सर्व तऱ्हेचे सहकार्य केले होते.

गुण्ये यांच्यावर हृदयशस्त्रक्रिया झाली होती. त्यानंतर त्यांची तब्येत सुधारली होती. पण गेल्या चार दिवसांपासून प्रकृतिअस्वास्थ्यामुळे त्यांना रत्नागिरीतील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेथे त्यांचे आज सकाळी सात वाजता निधन झाले.

त्यांच्या पश्चात पाच विवाहित कन्या, नातवंडे, बंधू शशिकांत आणि त्यांचा परिवार आहे.

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply