करोना मृत्यूमुळे अनाथ झालेल्या बालकांच्या संगोपनासाठी तीन संस्था

रत्नागिरी : करोनाच्या संसर्गामुळे आईवडील दोघांचेही निधन झाल्यावर त्यांच्यावर अवलंबून असलेल्या बालकांच्या जीवनावर गंभीर परिणाम होत असल्याने अशा बालकांची काळजी आणि संरक्षणासाठी जिल्हास्तरीय कृतीदल (Task Force) स्थापन करण्यात आले आहे. या कृतीदलाने तीन संस्थांची नावे निश्चित केली आहेत.

जिल्हाधिकारी या कृती दलाचे अध्यक्ष असून जिल्हा महिला आणि बाल विकास अधिकारी सदस्य सचिव, तर जिल्हा बाल संरक्षण अधिकारी समन्वयक म्हणून काम पाहणार आहेत.

करोना प्रादुर्भावाच्या काळात जिल्ह्यातील बालकांची काळजी आणि संरक्षणाचे काम करणाऱ्या संस्थांमधील बालकांना तसेच कोविडमुळे दोन्ही पालक गमावलेल्या बालकांना त्यांचे न्याय आणि हक्क मिळवून देऊन त्यांचे यथायोग्य संगोपन होण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्यासाठी जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. कोविडमुळे दोन्ही पालक गमावलेल्या बालकांना सर्वतोपरी संरक्षण उपलब्ध करून देण्यात यावे, तसेच बालकाला त्याचे कायदेशीर हक्क मिळवून देण्याबाबत आवश्यक ती कार्यवाही करण्यात यावी, असे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत.

करोनामुळे अनाथ झालेल्या बालकांकरिता जिल्ह्यातील ० ते १८ वयोगटातील मुलांकरिता कै. ना. प. अभ्यंकर निरीक्षणगृह-बालगृह (रत्नागिरी), ० ते १८ वयोगटातील मुलींकरिता कै. जानकीबाई आक्का तेंडुलकर महिलाश्रम संचालित मुलींचे निरीक्षणगृह-बालगृह (लांजा) आणि ० ते ६ वयोगटातील मुलांकरिता भारतीय समाज सेवा केंद्राचे शिशुगृह (चिपळूण) या ३ संस्था घोषित करण्यात आल्या आहेत.

करोनामुळे बालकाला संरक्षणाची कुठलीही गरज भासत असल्यास चाइल्ड हेल्पलाईन १०९८, सेव्ह द चिल्ड्रन्स-७४५३०१५५१८, ८३०८९९२२२, अध्यक्ष, बालकल्याण समिती- ९८२२९८३६२०, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी -९२२५८९२३२५, जिल्हा महिला आणि बाल विकास अधिकारी कार्यालय – (०२३५२) २२०४६१ या क्रमांकावर संपर्क साधावा, असेही आवाहन करण्यात आले आहे.

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply