रत्नागिरीतील मानसोपचारतज्ज्ञांचे मोफत मार्गदर्शन
सध्या सर्वत्र करोना महामारीमुळे तणावाची परिस्थिती आहे. सर्वसाधारण लोकांपासून आरोग्य यंत्रणा, पोलीस यंत्रणा तसेच इतर अत्यावश्यक सेवेमध्ये काम करणाऱ्या व्यक्ती खूप तणावात असून त्यांचे मानसिक आरोग्य धोक्यात आहे. त्यासोबत करोना होईल का? झाला तर कसे? अशा तणावात सर्वसामान्य लोक आहेत. ज्यांना करोना होऊन गेला आहे, त्यांना त्यामुळे मानसिक त्रास होत असून त्यासोबतच त्यांना गावात आणि आजूबाजूच्या लोकांकडून मिळणाऱ्या वागणुकीत फरक पडत आहे. चिंता, काळजी, भीती, नैराश्य, चिडचीड अशा भावना लोकांमध्ये निर्माण होत आहेत. लोकांसमोर अनेक भावनिक आव्हाने उभी आहेत. काहीजणांमध्ये या नॉर्मल भावना आहेत, तर काहींमध्ये त्या टोकाच्या आहेत. काहींच्या बाबतीत या भावनांचे रूपांतर मानसिक आजारात होत आहे.
या सर्व गोष्टींचा विचार करून रत्नागिरी असोसिएशन ऑफ मेंटल प्रोफेशनल्स “सुकून” हा कार्यक्रम राबवत आहे.
काय आहे प्रोजेक्ट ‘सुकून’ ?
कोविड काळात मानसिक अनारोग्याची त्सुनामी आली आहे. त्याला भिडण्यासाठी आपण एकत्रित प्रयत्न केले पाहिजेत. गरजूंचे मनोबल वाढवण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे झाले आहे. वैद्यकीय क्षेत्रातील डॉक्टर, नर्स, अॅटेंडंट असे सर्व फ्रंटलाइन वर्कर्स सध्या अटीतटीची लढाई लढत आहेत. टोकाचा ताण, नैराश्य आणि चिंता अनुभवत आहेत. तसेच त्यांना धीर दिला, तर आधीच तुटपुंजी आरोग्य व्यवस्था कोलमडण्यापासून वाचविता येऊ शकेल, हा या प्रकल्पाचा उद्देश आहे. मानसिक आरोग्याबद्दल जाणीव जागृती वाढवणे, कोविडमुळे होणारे सामाजिक, आर्थिक पडसाद आणि मानसिक आरोग्यावरचे परिणाम ओळखण्यास मदत करणे आणि उपचार सुचवणे, मानसिक आरोग्य जोपासण्यासाठी प्रयत्न करणे अशा स्वरूपाचे काम ‘सुकून’ करत आहे.
कोण आहेत ‘सुकून’ प्रकल्पात?
रत्नागिरीतील मनोविकारतज्ज्ञ डॉ. शाश्वत शेरे, डॉ. कृष्णा पेवेकर, डॉ. श्रुतिका कोतकुंडे, डॉ. अतुल ढगे, डॉ. स्नेहल तोडकर, डॉ. रामदास रनसिंग, मानसतज्ज्ञ सचिन सारोळकर, दीपिका आगवेकर, विद्या मोहिरे, सानिका कुंभवडेकर, श्रुती भिंगार्डे, आश्लेषा प्रभू, प्रीती आसगावकर, समुपदेशक स्नेहा साडविलकर, गौरी कमलाकर, प्रांजल गुंजोटे, मृदुला पेंडसे ही मंडळी या प्रकल्पात कार्यरत आहेत.

प्रकल्प कोणासाठी आहे?
डॉक्टर, नर्स, रुग्णालयातील इतर कर्मचारी, इतर आवश्यक सेवेतील कर्मचारी, रुग्ण, रुग्णांचे नातेवाईक, इतर सर्वसामान्य लोक (ज्यांना करोनामुळे मानसिक ताणतणाव जाणवत आहे) या साऱ्यांसाठी हा प्रकल्प आहे.
प्रकल्पात काय केले जाईल?
याअंतर्गत लोकांसाठी वेबिनार घेणे, सोशल मीडिया आणि प्रिंट मीडियामधून जनजागृती करणे, गरजू व्यक्तींना हेल्पलाइनद्वारे मदत करणे, गरजेनुसार सुरुवातीला अत्यावश्यक समुपदेशन करणे आणि गरजेनुसार उपचार करणे या गोष्टी केल्या जाणार आहेत. या सर्व सेवा पूर्णपणे मोफत असणार आहेत.
कधी संपर्क कराल?
» करोना झाल्यावर किंवा होण्यापूर्वी करोनाची भीती, चिंता वाटत असेल तर.
» करोनामधून बाहेर पडल्यानंतर विचार अस्वस्थ करत असतील तर
» दडपण वाटत असेल, शरीराबरोबर मनही खचत असेल तर.
» नुसतेच बसून असल्यामुळे काळजी वाटते, टेन्शन वाटते, एकटे वाटत असेल तर
» करोनामुळे गावात गैरसमज आहेत. त्याचा मानसिक त्रास होत असेल तर.
» गावातील, घराजवळची माणसे वेगळी वागणूक देत असतील तर.
» करोनामुळे धंदा गेला, नोकरी गेली आणि लोक मदत करत नसल्याने मानसिक त्रास होत असेल तर.
» जगावेसे वाटत नसेल, मरणाचे विचार मनात येत असतील, घरातील, नात्यातील व्यक्ती करोनामुळे दगावल्याने मानसिक त्रास होत असेल तर.
» परिस्थितीचा, राजकारणाचा, करोनाचा राग येऊन त्याचा मानसिक त्रास होत असेल तर.
संपर्क करण्यासाठी हेल्पलाइन नं. : 9028233622
आरोग्य विभागातील डॉक्टर्स तसेच इतर स्टाफ, करोनायोद्धे, करोनाबाधित व्यक्ती, त्यांचे कुटुंबीय तसेच समाजातील सर्व घटकांसाठी या आव्हानात्मक परिस्थितीत स्वतःचे मानसिक आरोग्य स्वास्थ्य टिकवण्यासाठी हा एक प्रयत्न आहे. मानसिक तणावाखाली असलेल्या व्यक्तींनी संपर्क करून याचा फायदा घ्यावा, असे संघटनेचे आवाहन आहे. सर्वत्र दाटून आलेला अंधार आणि नकारात्मकता मनाला निराश करत आहे.
अशा स्थितीत चला मैत्रीचा हात पुढे करू या आणि या वेदनेच्या ढगात सोनेरी किनार शोधू या. हा प्रवास आपल्या सर्वांनाच समृद्ध करणारा ठरेल.
काय म्हणतात सहभागी तज्ज्ञ?
»« – डॉ शाश्वत शेरे, अध्यक्ष
करोनाच्या दुसऱ्या लाटेची तीव्रता अधिक आहे. त्यामुळे रुग्णांच्या मानसिक आरोग्याच्या तक्रारी तर वाढत आहेतच. शिवाय या घडीला या साथीशी लढणारे आरोग्य क्षेत्रातील कार्यकर्ते मानसिक ताणाखाली वावरत आहेत.
रत्नागिरी जिल्ह्यातील मानसिक आरोग्य क्षेत्रातील तज्ज्ञ व्यक्ती एकमेकांच्या संपर्कात असतात. या कठीण काळात प्रत्येकाने आपापल्या परीने कार्य करण्याबरोबरच एकत्रित कार्य केले तर अधिक चांगले काम करता येईल असे सर्वांना वाटले. त्यातून सुकून या कार्यक्रमाची सुरुवात झाली.
……….
»« – डॉ कृष्णा पेवेकर, उपाध्यक्ष
सामाजिक, मानसिक आरोग्यमान सुदृढ ठेवण्याचा मुख्य हेतू यामागे आहे. सर्व घटकांचे मानसिक आरोग्य जोपासण्याचे प्रयत्न केले जाणार आहेत. यात करोनाग्रस्त, करोनापश्चात मानसिक समस्याग्रस्त, रुग्णांचे नातेवाईक, फ्रंटलाईन वर्कर्स इत्यादींचा समावेश असेल. सगळ्यांना सहजतेने मानसिक साह्य मिळावे म्हणून संपूर्ण जिल्ह्यात हा प्रकल्प राबविण्यात येईल. जनजागृती, संशोधन करून भविष्यात अतिशीघ्र, अधिक प्रभावी प्रतिबंधात्मक प्रणाली विकसित करणे ही उद्दिष्टे समोर ठेवून प्रकल्प सुरू करीत आहोत.
……….
»« – डॉ. श्रुतिका कोतकुंडे, सेक्रेटरी
सध्या चिपळूण, देवरूख आणि रत्नागिरी या तीन ठिकाणी प्रामुख्याने काम सुरू झाले आहे. प्रत्यक्ष तसेच फोनच्या माध्यमातून आघाडीचा वैद्यकीय स्टाफ तसेच रुग्णांचे समुपदेशन सुरू केले आहे. स्थानिक शासकीय तसेच सामाजिक संस्थांबरोबर आपत्ती व्यवस्थापन पथकांना वेळोवेळी मार्गदर्शन केले जात आहे. स्थानिक तसेच शेजारच्या तालुक्यात प्रत्यक्ष भेटीतून तसेच फोनच्या माध्यमातून समुपदेशन तसेच जनजागृती करीत आहोत.
………..
»« – डॉ. अतुल ढगे, ट्रेझरर
सोशल मीडिया, भित्तिपत्रके, माहितीपुस्तिका, हेल्पलाइनद्वारे मानसिक आरोग्य जनजागृती करण्यात येईल. अनिश्चिततेचा काळ असल्यामुळे आपल्याला वाटणारी भीती, नैराश्य या भावना नॉर्मल आहेत, हे लोकांना कळाले, तर ५० टक्के लोकांची समस्या दूर होईल. राहिलेल्या लोकांना मार्गदर्शन करण्याचे आणि सल्ला देण्याचे काम हेल्पलाइनद्वारे किंवा प्रत्यक्षात भेटीद्वारे करण्यात येणार आहे. मानसिक समस्यांवर योग्य मार्गदर्शन करण्यासाठी मानसिक आरोग्य शिक्षण देऊन मनुष्यबळ तयार करण्याचा प्रयत्न केला जाईल, जेणेकरून बहुतांशी लोकांना त्याचा फायदा होईल.
……..

