शास्त्रज्ञ-शेतकरी कार्यशाळेतून सुपारी पिकाविषयी विचारमंथन

रत्नागिरी : कृषी विद्यापीठातील शास्त्रज्ञ आणि सुपारी बागायतदारांचा मेळावा रावारी (ता लांजा) येथे झाला. त्यातून सुपारी बागेचे व्यवस्थापन आणि उत्पादनात होणारी घट थांबविण्याच्या दृष्टीने व्यापक विचारमंथन झाले.

रत्नागिरी जिल्ह्यातील लांजा आणि राजापूर तालुक्यातील बहुतांश सुपारी उत्पादक शेतकरी सुपारी फळगळीच्या रोगाने त्रस्त असून गेली काही वर्षे सातत्याने उत्पादन घटीचा सामना करत आहेत. याबाबत शासन स्तरावर तसेच कोकण कृषी विद्यापीठाच्या विस्तार शिक्षण परिषदेच्या बैठकीत सातत्याने या विषयाचा पाठपुरावा सुरू आहे. त्याचाच एक भाग म्हणून शेतकरी आणि विद्यापीठ शास्त्रज्ञ यांच्यामध्ये संवाद घडवून सुपारी उत्पादन टिकवण्यासाठी सुपारी बाग व्यवस्थापन कार्यशाळा आयोजित करण्यात आली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सुदेश चव्हाण यांनी केले. कार्यक्रमाची सुरुवात सुपारीच्या झाडाला पाणी घालून करण्यात आली.

सुपारीच्या रोपाला पाणी घालून कार्यशाळेला प्रारंभ

कार्यशाळेच्या आवश्यकतेविषयी डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या विस्तार शिक्षण परिषदेचे सदस्य प्रसन्न रामकृष्ण दीक्षित यांनी माहिती दिली. गेली तीनचार वर्षे सातत्याने करत असलेल्या पाठपुराव्याला कुलगुरू डॉ. संजय सावंत यांनी पाठबळ दिल्याने हा कार्यक्रम होत असल्याचे त्यांनी सांगितले. सुपारी पिकाच्या उत्पादनघटीचा सामना करावा लागत असल्याने शेतकऱ्यांचे नुकसान होत असून याबाबत ठोस पावले उचलण्याची गरज आहे, हे त्यांनी निदर्शनास आणून दिले.

कार्यशाळेत कोकण कृषी विद्यापीठाचे वनस्पती रोग विभागाचे सहयोगी प्रा. डॉ. प्रमोद बोरकर यांनी सुपारी बागेच्या व्यवस्थापनात करावयाच्या कामांविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. मे महिन्याच्या अखेरीस बागेची साफसफाई, सुपारी झाडाला विद्यापीठाने शिफारस केल्यानुसार खते देणे, बागेतील आर्द्रतेवर लक्ष ठेवून त्यानुसार उपाययोजना करणे, फळगळ रोगाला कारणीभूत बुरशीची माहिती, तिचा प्रसार कसा आटोक्यात आणता येईल, विद्यापीठाने शिफारस केल्यानुसार एलिएट ब्रिकेटचा वापर याविषयी त्यांनी सखोल मार्गदर्शन केले. तसेच उपस्थित शेतकऱ्यांनी उपस्थित केलेल्या शंकांचे निरसन केले. एक अतिशय चांगला संवाद शास्त्रज्ञ आणि शेतकऱ्यांच्या दरम्यान यावेळी घडला. कार्यक्रमाच्या शेवटी सुपारीच्या झाडाला किती अंतरावर आणि कशा प्रकारे ब्रिकेटचा वापर करावा, याचे प्रात्यक्षिक डॉ. बोरकर यांनी सर्व करून दाखवले.

कार्यक्रमाला तालुका कृषी अधिकारी श्री. धोंडे, पर्यवेक्षक श्री. कदम, कृषी सहायक श्री. भोसले, श्री. चव्हाण, लांज्याच्या कृषी विज्ञान केंद्राचे प्रमुख डॉ. आनंद हनुमंते, विषय विशेषज्ञ डॉ. पाटील, डॉ. महाले, श्री. साळवी, उपस्थित होते कार्यशाळेला लांजा आणि राजापूर परिसरातील सुपारी उत्पादक शेतकरी उपस्थित होते.

संपर्कासाठी :

सुपारी बागायतदार कार्यशाळेविषयी अधिक माहितीसाठी संपर्क :

  • प्रसन्न दीक्षित, रावारी, पो. जावडे, ता. लांजा, जि. रत्नागिरी
    (फोन 9209150650, व्हॉटस्अॅप 9422631134)
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply