सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज, २ जून रोजी दुपारी १२ वाजेपर्यंतच्या २४ तासांत नवे ५७७ करोनाबाधित आढळले, तर त्याहून शंभराहून अधिक म्हणजे ६४२ रुग्ण करोनामुक्त झाल्याने घरी गेले. त्यामध्ये सहव्याधीग्रस्त ६४ वर्षीय व्यापाऱ्याचा समावेश आहे. (त्याची प्रतिक्रिया सोबत दिली आहे.)
दुसऱ्यांदा तपासणी केलेल्या १३ जणांसह जिल्ह्यात आज एकूण ५७७ व्यक्तींचा करोना तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यामुळे एकूण बाधितांची संख्या २७ हजार ६४६ झाली आहे, अशी माहिती जिल्हा रुग्णालयाचे प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील यांनी दिली.
आज बरे होऊन गेलेल्या ६४२ रुग्णांसह जिल्ह्यात आतापर्यंत २१ हजार १०४ जण करोनामुक्त झाले आहेत.
आजच्या नव्या रुग्णांचा तालुकानिहाय तपशील असा – देवगड – ७८, दोडामार्ग – ३२, कणकवली – १०६, कुडाळ – १०३, मालवण – १२१, सावंतवाडी – ७४, वैभववाडी – १६, वेंगुर्ले – ३४.
सध्या जिल्ह्यात ५ हजार ८३१ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. सक्रिय रुग्णांची तालुकानिहाय संख्या अशी – देवगड ७९६, दोडामार्ग ३४२, कणकवली ९२१, कुडाळ ११७१, मालवण ९४३, सावंतवाडी ९४३, वैभववाडी २१६, वेंगुर्ले ४७८, जिल्ह्याबाहेरील रुग्ण २१. सक्रिय रुग्णांपैकी ३६१ रुग्ण ऑक्सिजनवर तर ५१ रुग्ण व्हेंटिलेटरवर आहेत.
आज जिल्ह्यात आधीचे ३ आणि आजच्या ८ जणांचा मृत्यू नोंदविला गेला. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण मृतांची संख्या ७०५ झाली आहे. आज नोंद झालेल्या मृतांचा तपशील असा – दोडामार्ग २, कुडाळ ३, मालवण ५, सावंतवाडी १.
जिल्ह्यातील आजपर्यंतच्या मृत्यूची तालुकानिहाय एकूण संख्या अशी – देवगड ९३, दोडामार्ग – २२, कणकवली – १४६, कुडाळ – १०४, मालवण – ११३, सावंतवाडी – ११६, वैभववाडी – ४८, वेंगुर्ले – ६१, जिल्ह्याबाहेरील रुग्ण – २.
दिलासादायक वृत्त
सहव्याधीग्रस्त ६४ किराणा व्यापाऱ्याची करोनावर मात
मधुमेह, उच्च रक्तदाब यासारखी सहव्याधींचा सामना करण्यासाठी दररोज ११ गोळ्या घ्याव्या लागत होत्या. अशातच करोनाची लागण झाली. मोठ्या प्रमाणावर ताप आणि डायरिया यामुळे प्रकृती नाजूक झाली होती. पण सिंधुदुर्ग जिल्हा रुग्णालयातील डॉक्टर्स, नर्स आणि कर्मचाऱ्यांनी केलेल्या उपचारामुळे करोनावर मात करू शकलो, अशा भावना व्यक्त केल्या आहेत, मालवण येथील ६४ वर्षीय किराणा व्यापाऱ्याने.
करोनाचे निदान झाल्यानंतर सुरुवातीस त्यांना दोन दिवस गृह अलगीकरणात ठेवण्यात आले होते. पण त्यांची प्रकृती बिघडली. डायरिया थांबत नव्हता. त्यामुळे त्यांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मधुमेह आणि उच्च रक्तदाब असल्यामुळे त्यांना अधिक लक्षपूर्वक निरीक्षणाखाली ठेवून औषधोपचारांची गरज होती. इतर आजारांमुळे त्यांचे मानसिक मनोबलही कमी झाले होते. या सर्वांचा विचार करून त्यांच्या प्रकृतीकडे विशेष लक्ष देण्यात आले. त्यांच्या नियमित औषधांसोबतच करोनावरील उपचारही सुरू करण्यात आले. वेळोवेळी रक्ततपासणीसह इतर तपासण्या करून औषधांमध्ये बदल करण्याविषयी निर्णय घेतले जात होते. तसेच त्यांचे मानसिक समुपदेशनही करण्यात येत होते. त्याचबरोबर त्यांच्या आहाराचे नियोजनही तितकेच महत्त्वाचे होते. विशेष म्हणजे त्यांच्या प्रकृतीविषयी त्यांच्या कुटुंबीयांना रोजच्या रोज दूरध्वनीवरून माहिती दिली जात होती.
करोनावर मात केल्यानंतर घरी परतताना त्यांना घरी घेऊन जायला आलेला त्यांचा मुलगा म्हणाला, योग्य औषधोपचार, मानसिक समुपदेशन आणि आहाराचे योग्य नियोजन यामुळेच आमच्या वडिलांना आज दुसरा जन्म मिळाला आहे. जिल्हा रुग्णालयातील डॉक्टर्स, नर्स आणि कर्मचाऱ्यांनी केलेल्या या कार्याबद्दल त्यांचे मानावे तेवढे आभार कमीच आहेत. सरकारी रुग्णालयात जाण्याची आमची ही पहिलीच वेळ होती. तिथे कसे उपचार होतील, व्यवस्था कशी असेल याविषयी मनात शंका होती. रुग्णालयातील सोयींबाबत आम्हाला फारशी अपेक्षा नव्हती. पण ज्या प्रकारच्या सुविधा, जेवण आमच्या रुग्णाला तेथे मिळाले ते पाहून आमचा ग्रह पूर्ण पालटला. उत्तम प्रकारचे उपचार आणि सोयींसह सर्वांचे चांगले सहकार्य लाभले. मधुमेह, उच्च रक्तदाब, कॅन्सर असे इतर आजार असलेल्या करोनाबाधित रुग्णांनी घरीच उपचार न घेता रुग्णालयामध्ये जाऊनच उपचार घ्यावेत. जिल्हा रुग्णालयामध्ये उत्तम प्रकारचे उपचार केले जात आहेत. डॉक्टर्स आणि नर्स घरच्याप्रमाणे रुग्णांची काळजी घेत आहेत. प्रत्येक रुग्णाला त्यांच्या प्रकृतीप्रमाणे उपचार केले जात आहेत. त्यामुळे करोनावर मात करण्यासाठी इतर आजार असणाऱ्यांनी घरी उपचार न घेता जिल्हा रुग्णालयामध्ये उपचार घ्यावेत, असे आवाहनही त्यांनी केले.
Follow Kokan Media on Social Media Follow Kokan Media on Social Media
