Site icon साप्ताहिक कोकण मीडिया

रत्नागिरी : श्रीलंकेच्या पाहुण्यांचे मुंबईतील पाहुण्यांना कोकणात दर्शन

Advertisements

रत्नागिरी : श्रीलंकेतून कोकणात आलेल्या ‘ओडिकेफ’ पक्ष्याचे रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण आणि गुहागर परिसरात आलेलेल्या मुंबईतील पक्षीप्रेमींना दर्शन घडले.

ओडिकेफ हा एक सुंदर पक्षी मे महिन्याच्या दरम्यान श्रीलंकेतून कोकणात येतो. त्यानंतर चार महिने या पक्ष्याचे वास्तव्य कोकणात असते, तो घनदाट जंगलात वास्तव्य करतो. हा पक्षी शिकार करतो, तेव्हा त्याची छबी टिपण्यासाठी देशभरातील पक्षिप्रेमी आणि फोटोग्राफर कोकणात भटकंती करतात. अशा या पाहुण्या ओडिफेक पक्ष्याच्या दुर्मिळ अदांचे चित्रीकरण मुंबईतील वाइल्ड फोटोग्राफर प्रीतम गुरव आणि प्राजक्ता गुरव या दांपत्याने चिपळूण आणि गुहागर तालुक्यातील आबलोलीनजीकच्या जंगलात तब्बल ४८ तास थांबून केले.

ओडिकेफ पक्षी पावसाच्या सुरुवातीला महाराष्ट्राच्या कोकण किनारपट्टीत आढळतो. पाल, साप, सुरवंट, छोटे खेकडे, कोळी, बेडूक हे त्याचे आवडते खाद्य. जेथे वाहते पाणी आणि भुसभुशीत जमीन असेल, तेथे एक मीटर लांबीचे घरटे तयार करून त्यामध्ये एका विणीच्या मोसमात तीन-चार अंडी घालतात. पिल्लू अंड्यातून बाहेर आल्यानंतर वीस दिवसांत घरट्याबाहेर येते. तोपर्यंत त्यांची काळजी घेतली जाते. भूतान, श्रीलंका इत्यादी देशांमधून दोन ते तीन महिन्यांसाठी हा पक्षी स्थलांतरित होऊन कोकणात येतो. पावसाच्या सुरुवातीला आलेले हे पक्षी ऑगस्ट, सप्टेंबरमध्ये परतीच्या प्रवासाला निघतात. नर-मादी एकमेकांना शीळ घालून साद देतात. जोडी जमल्यावर एखाद्या ओहोळात किंवा ओहोळाशेजारी मातीच्या कड्यात नर-मादी बीळ करून घरटे करतात.

निसर्गाचा वरदहस्त लाभलेल्या कोकणात अनेक परदेशी पाहुणे येतात. अनेक वर्षांपासून देश-परदेशातील या पाहुण्यांना आपल्या कॅमेऱ्यात टिपण्यासाठी राज्यभरातील नामांकित वाइल्ड फोटोग्राफर कोकणच्या दिशेने येतात आणि कित्येक तास जंगलात भटकंती करून या पक्ष्यांची अदाकारी टिपून आपली वेगळी ओळख निर्माण करतात. आता पर्यटकांबरोबरच नामांकित वाइल्ड फोटोग्राफरना कोकणातील पश्चिम घाट आकर्षणाचे ठिकाण ठरत आहे.

Follow Kokan Media on Social Media
Exit mobile version