पालघरच्या किनारपट्टीवर कलहंसाचा मुक्त विहार

पालघर (नीता चौरे) : वातावरणातील वेगाने होणारे बदल आणि कमीजास्त प्रमाणात पडणारी थंडी अशी स्थिती असूनही पालघरच्या समुद्रकिनाऱ्यावर अनेक परदेशी पक्षी वास्तव्याला आले आहेत. त्यापैकी कलहंस नावाच्या पक्ष्याचा विहार पाहायला अनेक पक्षीप्रेमी आणि पर्यटक पालघरच्या किनारपट्टीवर येऊ लागले आहेत.

पालघर जिल्ह्याला निसर्गत: समुद्रकिनाऱ्यांचे वैभव लाभले आहे. जिल्ह्याची पश्चिम किनारपट्टी सौंदर्याने नटलेली आहे. या किनारपट्टी भागात अनेक ठिकाणे सुशोभित असून पिकनिक पॉइंट आणि पर्यटनस्थळांनी सजलेली आहेत. काही ठिकाणी ही किनारपट्टी गजबजलेली असली तरीदेखील त्यातील काही ठिकाणे अशी आहेत की, ती शांत आणि गर्द झाडाझुडपांनी विस्तारलेली आहेत. त्यामुळे अशा भागात विविध जातीचे स्थलांतरित पक्षी येऊन वास्तव्य आणि विहार करत असतात. सध्या अशाच काही स्थलांतरित परदेशी पक्ष्यांचा मुक्त विहार चिंचणी, वाढवण, तारापूर किनाऱ्यालगतच्या पाणथळ भागात पाहायला मिळत आहे.

गुलाबी थंडी सुरू झाली की या भागात स्थलांतरित परदेशी पक्ष्यांचे आगमन होऊ लागते. त्यातलाच एक पक्षी म्हणजे कलहंस. याला इंग्रजी भाषेत GREYLAG GOOSE असे म्हणतात. याच परदेशी पाहुण्यांच्या थव्यांनी सध्या तारापूर, चिंचणी, कलोवली या भागातल्या पाणथळ भागांत हजेरी लावली आहे.

कलहंस हा पक्षी मध्यम आकाराच्या पाळीव हंसाएवढा असतो. हा हिवाळी पाहुणा रंगरूपाने आणि आकाराने धूसर रंगाच्या पाळीव हंसाप्रमाणे दिसतो. याचा शेपटीकडील भाग करड्या रंगाचा आणि चोच मांसल गुलाबी असते. हा हिवाळी पाहुणा पाकिस्तान ते मणिपूर, चिलका सरोवर, ओरिसा या भागात मोठ्या प्रमाणात आढळतो. हा पक्षी मध्य प्रदेशात आणि महाराष्ट्रात तसा दुर्मिळ असतो. तसेच दक्षिणकडे हा सहसा आढळून येत नाही. हा पक्षी नद्या, सरोवरे, भातशेती आणि गवती कुरणे अशा भागात आढळतो.

सध्या कलहंस पक्षी पालघर जिल्ह्यातील तारापूर, चिंचणी आणि कलोवली या भागातल्या पाणथळ भागांत आले आहेत. त्यामुळे पक्षीमित्र या स्थलांतरित पक्ष्यांना कॅमेऱ्यात कैद करण्यासाठी उत्सुक किनाऱ्यांवर फेरफटका मारत आहेत. चिंचणीमधील पक्षीतज्ज्ञ आशीष बाबरे, पक्षिनिरीक्षक प्रवीण बाबरे, भावेश बाबरे यांनी या पक्ष्यांची चित्रे आपल्या कॅमेऱ्यात टिपली आहेत. केवळ पालघर जिल्ह्यातीलच पक्षिमित्र नव्हे तर या पक्ष्यांना पाहण्यासाठी दूरदूरवरचे पक्षिमित्रदेखील या भागात हजेरी लावत आहेत.

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply