मराठी शब्दाला जागणारा माणूस

शब्द ही भाषेची रत्ने. मराठी भाषेतील ही रत्ने निरखून पारखून त्याचे मोल जाणून ती सरस्वतीच्या खजिन्यात सुबकतेने मांडण्याचे काम एका ब्रिटिश अधिकाऱ्याने केले. जेम्स थॉमस मोल्सवर्थ हे त्याचे नाव. मराठी भाषेचा पहिला शब्दकोशकर्ता. आज १३ जुलै २०२१ रोजी जेम्स यांचा दीडशेवा स्मृतिदिन. त्यानिमित्ताने त्याच्याविषयी.

……………………………….

पेशवाई अस्ताला जात असतानाच्या काळात इंग्लंडमधून १६ वर्षांचा किशोरवयीन मुलगा सैनिक म्हणून महाराष्ट्रात आला. या धामधुमीच्या काळात रणभूमीवर त्याने नेमकी कोणती भूमिका बजावली, त्याची कोठेही नोंद नाही. पण याच काळात त्याने हाती घेतलेले एक काम मराठी भाषेसाठी-मराठी माणसांसाठी अत्यंत मोलाचे ठरले. आपली भाषा ही समृद्ध-स्वतंत्र भाषा असल्याच्या वास्तवाला भाषा शास्त्रीय आधार मिळाला. पण मराठी भाषकांसाठी जगाची कवाडे उघडणार्याा आणि मराठी भाषेतील समृद्ध शब्दसंपदा विश्वासाठी खुली करणार्याध या माणसाची स्मृती जपणार्यात खुणा त्याच्या मायभूमीतही कोठे सापडत नाहीत. त्याच्या दीडशेव्या स्मृतिदिनानिमित्त त्या शोधण्याचा हा प्रयत्न.

इंग्रज राज्यकर्ते म्हणून आले पण काही इंग्रज अधिकारी अशा चांगल्या गोष्टींचे ‘कर्ते ‘बनले. जेम्स थॉमस मोल्सवर्थ त्यापैकीच एक. मराठी माणसांच्या अनेक पिढ्यांनी प्रमाण मानलेल्या शब्दकोशाचा जनक. शब्दांनाच शस्त्र मानणारा हा सैनिक १८१६ साली सोलापुरात आला आणि मराठी माणसासाठी शब्दकोशाचे शस्त्रागारच खुले करून गेला. वीस वर्षांचा घाऱ्या डोळ्यांचा तरुण तडफदार, गोरा जेम्स, ईस्ट इंडिया कंपनीत अधिकारी म्हणून नोकरीसाठी भारतात आला. जेथे जायचे, तेथे नवनवीन शिकायचे, हा जेम्सचा मूळ स्वभाव. भारतात आल्यावर तो हिंदी शिकला. पण मराठीबद्दल त्याला विशेष आपुलकी वाटली. त्याने मराठी आत्मसात केली. इतकी चांगली भाषा असूनही तिला शब्दकोश नाही, म्हणून तो अस्वस्थ झाला. तोवर मराठी म्हणजे ७-८ हजार शब्दांची बोलभाषा असाच समज असणार्यांाच्या हाती त्याने १८३१ साली ४० हजार शब्दांचा महाराष्ट्र भाषेचा कोश या नावाचा शब्दकोशच ठेवला. १८५७ साली त्याची दुसरी आवृत्ती आली, तेव्हा त्यात आणखी २० हजार शब्दांची भर पडली होती.

राज्यातील विद्वानांना त्याने या कामात सहभागी करून घेतले. शब्दकोश तयार करणे हे मोठे कष्टाचे, जिकिरीचे आणि वेळखाऊ काम. पण जेम्सने मराठीला आपली मायबोली मानले होते. त्यामुळे हे काम त्याला सहज साध्य करता आले. जेम्सचे मराठी इतके साधे सोपे होते की आजूबाजूचे लोकही त्यांना मोलेशास्त्री असे म्हणत. जेम्सने संशोधनातून संवादातून पन्नास हजाराहून अधिक शब्द संकलित, संपादित केले. मराठीत कोणते शब्द कोठून आले, त्याचा इतिहास आणि नोंदी घेऊन पहिला मराठी शब्दकोश पूर्ण केला. भाषा जिवंत ठेवायची असेल तर ती नुसती बोलून चालत नाही, तर इतर भाषेतील लोकांना बोलता यावी म्हणून अद्ययावतही करावी लागते. या विचाराने पुढे त्यांनी मराठी-इंग्रजी शब्दकोशची निर्मितीही केली. आजही त्यांचे शब्दकोश ग्राह्य मानले जातात.

मित्रहो, भाषेची श्रीमंती वाढवायची असेल तर तिची शब्दसंपत्ती वाढली पाहिजे. इंग्रजी भाषेने अन्य भाषांमधील शब्द सामावून घेतले, म्हणूनच ती वैभवसंपन्न झाली. अनेक भाषातज्ज्ञांचे तसे मत आहे. मराठी भाषेने इंग्रजी, उर्दू, फारसी, तुर्की शब्द आपल्या भाषेत मोठ्या प्रमाणावर घेतलेले नाहीत. गुजराती आणि कन्नड या शेजारच्या भाषांमधूनही जेवढे शब्द घेतले पाहिजेत, तेवढे घेतलेले नाहीत. प्रा. अनंत काणेकर एका ठिकाणी म्हणाले होते, बायको हा शब्द तुर्की आहे. पण आज बायको घराघरात रुळली आहे. आज ते काम मराठी मायबोली असणाऱ्या हातांनी केले पाहिजे.

‘आमची मायबोली’ या कवितेत माधव जूलियन आम्हाला मार्गदर्शन करत असतात.

हिचे पुत्र आम्ही हिचे पांग फेडू
असे आमुच्या मात्र हृदयमंदिरी
जगन्मान्यता हीस अर्पू प्रतापे
हिला बैसवून वैभवाच्या शिरी

जेम्सने तर दोन शतकांपूर्वीच स्वतःला मराठी मायबोलीचा पुत्र समजून हे पांग कधीच फेडले आहे.

या मोलेसरशास्त्रीच्या निधनानाला आज, १३ जुलै रोजी दीडशे वर्षे झाली, पण शब्द, म्हणी, वाक्प्रचार, भाषाशास्त्रीय कसोट्यांवर पारखून घेत सुरू झालेले त्याचे काम आज डिजिटल युगातही सुरू आहे. जेम्सच्या शब्दकोशाच्या सुरुवातील एक वाक्य आहे. “भाषा हे मानवी मनाचे शस्त्रागार आहे. त्यात भविष्याच्या विजयाची शस्त्रे सामावलेली असतात.”

मोल्सवर्थ यांच्या स्मृतींना उजाळा देण्याचा प्रयत्न पुण्यात विश्वकर्मा विद्यापीठाच्या जनसंवाद विभागाने केला. मानद प्रा. डॉ. किरण ठाकूर यांचा यावरचा प्रासंगिक शोधनिबंध प्रकाशित झाला आहे.

ब्रिटिश सैन्यात असूनही मराठी शब्दशस्त्रांना धार देणाऱ्या, मराठीचे भवितव्य तळपत ठेवणाऱ्या जेम्सला विनम्र अभिवादन.

  • सुरेश ठाकूर
  • आचरे, ता. मालवण
  • (94212 63665)
(छायाचित्र सौजन्य : आकाशवाणी, पुणे)
Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply