तळेरेचे सुपुत्र ऑक्सिमॅन विशाल कडणे यांचे आंतरराष्ट्रीय स्तरावर कौतुक

तळेरे (निकेत पावसकर) : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तळेरे गावचे सुपुत्र मुंबई स्थित भांडुपमधील तरुण विशाल कडणे स्वतःच्या पदरचे पैसे मोडून रुग्णांसाठी गेली २ वर्षे मोफत मास्क, ऑक्सिमीटरचे वाटप करत आहेत. त्यांच्या कार्याची दखल लंडनच्या वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड्सकडून घेतली गेली आहे.

विशाल कडणे यांनी स्वतःच्या उच्च शिक्षणासाठी ठेवलेले पैसे फुंकून कोविड रुग्णांसाठी मोफत ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटरचे वाटप केले. गेल्या २ वर्षांत त्यांनी १०० हून अधिक कोविड रुग्णांना जीवनदान दिले आहे.

त्यांच्या याच निःस्वार्थी कार्याची दखल वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड्सने घेतली. लंडनच्या वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड्सचे युरोपचे प्रमुख विल्हेम जेझलर यांनी विशाल कडणे यांना नुकतेच सर्टिफिकेट ऑफ कमिटमेंट प्रदान करून त्यांच्या कार्याचा सन्मान केला आहे.

आंतरराष्ट्रीय स्तरावर दखल घेतले गेलेले विशाल कडणे यांचे लंडन येथील विम्ब्लये ब्रेंट महापालिकेचे महापौर भगवान चौहान यांनी स्वतः फोन करून अभिनंदन केले. सिव्हिल इंजिनिअर असलेले विशाल कडणे गेले १ वर्ष सातत्याने कोविड रुग्णांची सेवा करत आहेत. अनेक गरजू रुग्णांना त्यांनी ऑक्सिजन कमतरता असताना त्यांनी स्वखर्चाने ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर उपलब्ध करून दिले. त्यांच्या या कार्याबद्दल मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर, स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी कौतुक केले होते.

समाजाच्या सर्व घटकांनी एकत्र येऊन करोनाच्या महामारीचा सामना करायला हवा, असे विशाल कडणे यांनी सांगितले. यथाशक्ती प्रत्येकाने रुग्णांची सेवा करायला हवी आणि सुरुवात स्वतःपासून करायला हवी, या तत्त्वानेच मोफत ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटरची सेवा सुरू असल्याचे सांगितले. आजपर्यंत कडणे यांनी मुंबई, सिंधुदुर्ग, सातारा, कराड, विटा इत्यादी ठिकाणी स्वखर्चाने या मशीन पोहोचवल्या आहेत.

या सत्कार्यात विशाल यांचे सर्व कुटुंब सहभागी असून त्यांचे आईवडील सौ. जयश्री आणि विजय कडणे यांची प्रेरणा असल्याचे त्यांनी सांगितले. त्यांचे सहकारी डॉ. प्रमोद जाधव, वैभव भुर्के, गौरव पोतदार, चेतन वैद्य, पंकज चावरे आणि इतर सर्वांची त्यांना मोलाची मदत होत आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर वर्ल्ड बुक्स ऑफ रेकॉर्ड्सतर्फे सन्मान झाल्याने समाजाच्या सर्व स्तरातून विशाल यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply