पावसाचे पाणी साठवून केली महापुराच्या चिखलाची साफसफाई

अतिवृष्टीमुळे महापूर आला हे खरेच, पण त्याच पावसाचे पाणी साठवून महापुरामुळे महाड शहरात घराघरांत झालेला चिखल स्वच्छ करायला मदत झाली. महापुराला पाऊस कारणीभूत असला, तरी पावसाचे पाणी साठविल्यास किती उपयुक्त ठरू शकते, याचेच हे उदाहरण आहे.
……….

गेल्या २२ जुलै २०२१ रोजी महाड शहरात महापुराने थैमान घातले आणि नागरिकांचे अतोनात नुकसान झाले. हा महापूर ओसरल्यानंतर संपूर्ण महाड शहर चिखलाने आणि कचऱ्याने व्यापून गेले. सगळ्या घरांत कानाकोपऱ्यात चिखल आणि त्याबरोबर कचरा पसरला होता. पाणी ओसरल्यानंतर सर्वांचे काम असते ते घरातील, दुकानातील हा चिखल काढून घर, दुकान स्वच्छ करणे. यासाठी खूप पाण्याची आवश्यकता होती. पण या महापुराने पाणीपुरवठा व्यवस्थाही बाधित झाली असल्याने ती पूर्ववत करण्यात संबंधित यंत्रणेला अर्थातच काही कालावधी लागला. तरीही या यंत्रणेने हा पाणीपुरवठा खूपच तातडीने सुरू करून दिला. पण घरातील, दुकानातील चिखलाचे साम्राज्य लक्षात घेता हे मिळणारे पाणी अपुरे पडत होते आणि साठवून ठेवले तरी सगळ्याचे पंप, मोटर्स महापुरात नादुरुस्त झाल्याने पाणी वरच्या टाकीत घेता येत नव्हते. त्यामुळे प्रेशरने पाणी मारून चिखल साफ करणे, इतर सामान साफ करणे खूप त्रासदायक झाले होते.

माझे मोठे भाऊ महाड येथे जवाहर कॉलनीमध्ये राहतात. त्यांचा तळ मजला पूर्ण पाण्यात जावून पहिल्या मजल्यावर बाल्कनीत पुराचे पाणी आले होते. माझ्या बंधूंनी नेहमीचा अनुभव लक्षात घेवून पुर ओसरल्यानंतर घर स्वच्छ करण्यासाठी पाणी कमी पडू नये यासाठी दुस-या मजल्यावरील पत्र्याच्या छप्पराचे पावसाचे पडणारे पाणी टेरेसवरील पाण्याच्या टाकीत जमा होण्यासाठी उपलब्ध साहित्याचा वापर करून तात्पुरती व्यवस्था केली. त्यामुळे घर स्वच्छ करण्यासाठी मुबलक पाणी अडचणीच्या काळात उपलब्ध होऊ शकले. हे संकलन इमारतीच्या थेट वरच्या टाकीत केले असल्याने तळ मजल्यावरील नळाला चांगल्या दाबाने पाणी मिळाले. त्यामुळे हे पाणी अंघोळ, शौचालय ,कपडे धुणे, भांडी घासणे, पुराने माखलेले सामान स्वच्छ करणे यासाठी वापरणे शक्य झाले. महापुरानंतरच्या पावसाचे पाणी साठविण्याचा या अडचणीच्या काळात खूप मोठा फायदा झाला.

कठीण काळातील पाऊस पाणी संकलनाच्या या अनुभवावरून असे सुचवावेसे वाटते की, प्रत्येकाने आपल्या छपरावरचे पावसाचे पाणी घरावरील मुख्य साठवण टाकीत साठवण्यासाठी कायमस्वरूपी व्यवस्था करून ठेवावी. तशी व्यवस्था अशा प्रकारच्या अनेक संकटांत खूप उपयुक्त ठरेल. तसेच नियमित पाणीपुरवठा करण्यामध्ये कधी अडचण आल्याने पाणीपुरवठा कमी होत असेल किंवा पाणीपुरवठा बंद असेल, तर हे पाणी वापरता येईल. एरव्ही गरज नसताना हे पाणी वापरायचे नसल्यास तशी व्यवस्था करता येऊ शकेल. ही व्यवस्था करण्यासाठी फार विशेष खर्चही येणार नाही. त्यामुळे अशा प्रकारे पाऊसपाणी संकलन करण्यासाठी सर्व नागरिकांनी अशी व्यवस्था भविष्यात करून घ्यावी, अशी अपेक्षा आहे.

  • अभियंता विजय गोरेगावकर, पनवेल
  • (संपर्क – ९८९२७५०४६०)
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply