पुढच्या पावसाळ्यापूर्वी बांधा संरक्षक भिंती

कोणे एके काळी एक राजा होता. त्याला कबूतर आवडायचे. एक कबूतर त्याच्या बागेत दररोज येऊन बसायचे. राजा त्याच्याकडे पाहत राहायचा. एकदा काय झाले, कबूतर बागेत आलेच नाही. तीन-चार दिवस तसेच गेले. पाचव्या दिवशी ते कबूतर आले. राजाला आनंद झाला. राजाने हुकूम सोडला, आता हे कबूतर कुठेही उडून जाता कामा नये. लगेच बागेला कुंपण घाला. राजाची आज्ञाच ती! हुकमाची तामिली लगेच झाली. बागेला उंचच उंच कुंपण घातले गेले. तेवढा वेळ कबूतर बागेतच बसलेले होते. सायंकाळ झाली आणि कबूतर त्या उंचचउंच कुंपणावरून उडून निघून गेले. कुंपणावरून कबूतर उडून जाईल याची कल्पनाच त्या निर्बुद्ध राजाला आली नव्हती.

ही बालकथा लहानपणी कधी तरी वाचली होती. ती आता आठवण्याचे कारण म्हणजे महापुराचे दुष्परिणाम रोखण्यासाठी जगबुडी नदीला कायमस्वरूपी बंधारा घालण्याची मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी केलेली घोषणा. खेड तालुक्यातील जगबुडी नदीच्या पुराचे पाणी ज्या ठिकाणाहून खेड बाजारपेठेत शिरते, तेथे संरक्षक भिंत बांधण्यासाठी आवश्यक निधी तातडीने देण्यात येईल, अशी घोषणा त्यांनी आपल्या दौऱ्यात केली. संरक्षक भिंतीचा प्रस्ताव आमदार योगेश कदम यांनी तत्काळ आपल्याकडे सादर करावा, त्यांना शासनाकडून तत्काळ मंजुरी देण्यात येईल, असे वडेट्टीवार यांनी सांगितले. एकूण शासकीय कारभार पाहता हा प्रस्ताव कधी सादर होईल हे सांगता येणार नाही. पण कदाचित तो त्वरित सादर होईलही. कारण हा बंधारा उपयुक्ततेपेक्षा उपद्रवकारकच ठरण्याची शक्यता अधिक आहे. अयोग्य ठिकाणी शासकीय निधी खर्च करणे हे तर शासनाचे आद्यकर्तव्य समजावे, अशी स्थिती आहे. अन्यथा त्या गोष्टीतल्या राजासारखी निर्बुद्ध विधाने मंत्र्यांनी केली नसती. श्री. वडेट्टीवार मदत आणि पुनर्वसन खात्याचे मंत्री आहेत. त्यामुळे त्यांना वेगवेगळ्या प्रकारची आपत्ती नेमकी कशी येऊ शकते, याची किमान माहिती असायला हवी. कोकणातील पाऊस, त्यातही वाढलेला पाऊस, डोंगरउतारांवरच्या पश्चिमवाहिनी नद्यांच्या पाण्याचा वेग, वर्षानुवर्षे त्यात होणारी वाढ याचा अभ्यास त्यांनी केला असला पाहिजे, हे गृहीतच धरायला हवे. पण तो त्यांनी केलेलाच नाही, हे संरक्षक भिंतीची घोषणा त्यांनी केली, त्यावरूनच लक्षात आले.

कोकणातील डोंगरांची आणि जमिनीची होणारी धूप हे कोकणातील महापुराचे आणि असा महापूर येणारी ठिकाणे वाढण्याचे महत्त्वाचे कारण आहे. मोठ्या प्रमाणावर धूप झाल्याने नद्यांमध्ये प्रचंड प्रमाणात गाळ साचतो. तो वेळच्या वेळी कधीच काढला गेला नाही, हे महापुराचे सगळ्यात मोठे कारण आहे. त्यामुळे गाळ काढण्यासाठी युद्धपातळीवर आणि कालबद्ध कार्यक्रम जाहीर करणे गरजेचे होते. पण ते राहिले बाजूलाच, संरक्षक भिंतीची घोषणा मंत्र्यांनी केली. अशा प्रकारच्या भिंती कोकणात आणखी कोठे कोठे बांधल्या जाणार आहेत? राजापूर आणि चिपळूण शहरात दरवर्षी पूर येतो. तो रोखण्यासाठी हे आधीच का नाही केले? भिंती बांधल्या तर नदीला मिळणाऱ्या ओढ्यांचे आणि उपनद्यांचे काय होणार? त्यांचे पाणी पुढे जाण्यासाठी एकदिशा व्हॉल्व्ह बसवणार का? याच पद्धतीने कोकणाच्या ७२० किलोमीटर लांबीच्या संपूर्ण किनारपट्टीवर भिंत बांधता येईल का? असेही अनेक प्रश्न निर्माण होतात. या भिंतींचे बांधकाम किती टिकणार, हा प्रश्न तसा विचारात घेण्यासारखा नाही. कारण मूळ कारणापेक्षा देखभाल-दुरुस्तीसाठी तरतूद करणे खूप सोपे असते. पूरग्रस्त भागाची मूळ कारणे शोधून दूर करण्यासाठी कोणती तरतूद करण्यापेक्षा मदत आणि पुनर्वसनासाठी निधी तातडीने मंजूर झाला, यावरूनच हे स्पष्ट व्हावे. पुढच्या पावसाळ्यापूर्वी अशा संरक्षक भिंती तातडीने बांधल्या जाव्यात. पुनर्वसनाचे नंतर बघता येईल!

  • प्रमोद कोनकर
    (संपादकीय, साप्ताहिक कोकण मीडिया, ६ ऑगस्ट २०२१)

    (साप्ताहिक कोकण मीडियाचा ६ ऑगस्टचा अंक डाउनलोड करण्यासाठी, तसेच मागील संग्राह्य अंक वाचण्यासाठी ई-मॅगझिन विभागाला भेट द्या. त्यासाठी येथे क्लिक करा.)
Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply