रत्नागिरी जिल्ह्याचे सुपुत्र आयुर्वेदाचार्य बालाजी तांबे यांचे निधन

रत्नागिरी : ज्येष्ठ आयुर्वेदाचार्य बालाजी तांबे (वय ८१) यांचे आज पुण्यात खासगी रुग्णालयात निधन झाले. त्यांच्या निधनाने रत्नागिरी जिल्हा एका ज्येष्ठ आयुर्वेदाचार्याला मुकला आहे.

भालचंद्र वासुदेव तांबे असे बालाजी तांबे यांचे मूळ नाव आहे. बालाजी या नावाने ते प्रसिद्ध झाले. रत्नागिरी जिल्ह्यातील निवसर रेल्वे स्थानकानजीक खेडकुळी हे बालाजी तांबे यांचे मूळ गाव आहे. त्यांचे वडील बडोदा येथे गेले. तेथेच २८ जून १९४० रोजी बालाजींचा जन्म झाला. तेथेच त्यांचे शिक्षण झाले. बालाजींना लहानपणापासूनच वडिलांनी आयुर्वेद शिकविला. पुढे बालाजींनी आयुर्वेदातील आणि अभियांत्रिकीमधील पदवी एकाच वर्षी मिळविली. आयुर्वेद, योग आणि संगीतोपचार या विषयांचा त्यांचा व्यासंग होता. पुणे जिल्ह्यातील लोणावळ्याजवळील कार्ले येथे त्यांनी आत्मसंतुलन व्हिलेज स्थापन केले. या प्रकल्पाच्या माध्यमातून त्यांनी आयुर्वेदाबद्दल जनजागृती केली. त्यानिमित्ताने राजकीय, अभिनेते, संगीत, साहित्य, कला अशा विविध क्षेत्रांतील मान्यवर या आश्रमाला भेटी देत असत. परदेशातील नागरिकही त्यांचे मार्गदर्शन घेण्यासाठी आवर्जून कार्ल्यात जात असत.

आयुर्वेदाचा प्रसार त्यांनी जर्मनीतही केला होता. आयुर्वेदाचा अभ्यास करू इच्छिणारे आणि आयुर्वेद जाणून घेऊ इच्छिणारे जर्मनीतील अनेक अनुयायी त्यांच्यासोबत खेडकुळी येथे येत असत. मंदिराच्या उत्सवाच्या काळात पार पडणाऱ्या विविध पारंपरिक कार्यक्रमांमध्ये हे ही मंडळी आवर्जून सहभागी होत असे त्यानिमित्ताने कोकणातील प्रथा आणि परंपरांचा अभ्यासही काही काहींनी केला.

बालाजी तांबे हे आयुर्वेद, योग आणि संगीतोपचार या विषयांतील तज्ज्ञ होते. त्यांनी आयुर्वेदिक औषधी शास्त्र आणि आयुर्वेदिक फिजिओथेरपीवर संशोधन केले. सुदृढ नवीन पिढीसाठी त्यांनी लिहिलेले ‘आयुर्वेदीय गर्भसंस्कार’ हे त्यांचे पुस्तक बरेच गाजले होते. इंग्रजीसह सहा भाषांमध्ये या पुस्तकाचे भाषांतर झाले आहे. त्यांच्या इतरही पुस्तकांना मोठी मागणी होती. आरोग्यविषयक घडामोडींवर अत्यंत जागरूकपणे त्यांनी अनेक दशके काम केले. त्यांनी विविध विषयांवर शेकडो लेख लिहिले. नागरिकांमध्ये आयुर्वेदाबद्दल जिज्ञासा निर्माण करण्यात त्यांचे मोठे योगदान होते. शास्त्रशुद्ध आणि गुणत्तापूर्ण आयुर्वेदीय औषधांचे संशोधन आणि निर्मिती करून ती सामान्यांपर्यंत पोहोचविण्याचे कार्य त्यांनी केले. त्यातून विविध समाजघटकांना आयुर्वेदाशी जोडले. आयुर्वेद हे केवळ भारतापुरते मर्यादित न ठेवता त्याचा प्रसार केला आणि त्याचे महत्त्व परदेशातील नागरिकांनाही आपल्या ओघवत्या शैलीतून पटवून दिले. ‘साम’ वाहिनीवर श्रीमत भगवद्त गीतेचे निरूपण ते करत होते. त्याला मोठा प्रेक्षकवर्ग होता. विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून आयुर्वेदाचे महत्त्व त्यांनी लोकांपर्यंत पोहोचविले.

खेडकुळी (ता. रत्नागिरी) येथील गणपती मंदिराचे प्रवेशद्वार

आयुर्वेदाच्या माध्यमातून महाराष्ट्रात महाराष्ट्राबाहेर तसेच जर्मनी पर्यंत आयुर्वेदातील विविध उपक्रम राबवत असतानाच आपले खेडकुळी हे गाव आणि निस्सीम भक्ती असलेल्या गणपती या आराध्य दैवताकडे त्यांनी लक्ष पुरविले. गावातील नवसाला पावणाऱ्या गणपती मंदिराचा जीर्णोद्धार त्यांनी केला. गेली सुमारे वीस वर्षे ते दरवर्षी माघ महिन्यात गणेश जयंतीला आपल्या मूळ गावी येत असत.

गणपती मंदिराचा जीर्णोद्धार करताना मूळचा गाभारा तसाच ठेवण्यात आला आहे.

गेल्या आठवड्यात त्यांची प्रकृती खालावली. त्यांना उपचारासाठी पुण्याच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचार सुरू असताना त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनाने रत्नागिरी जिल्ह्याचे नाव सर्वदूर पोहोचविणाऱ्या एका ज्येष्ठ आयुर्वेद तज्ज्ञाला आयुर्वेदाचार्याला रत्नागिरी जिल्हा मुकल्याची भावना अनेकांनी व्यक्त केली.

बालाजी तांबे यांच्या पश्चात पत्नी वीणा तांबे, मुलगा सुनील, संजय, सुना आणि नातवंडे असा परिवार आहे.

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply