अजातशत्रू व्यक्तिमत्त्व चंद्रकांत श्रीधर खामकर

काही माणसांचे नाव उच्चारताक्षणी आपोआप नकळतपणे त्यांच्याविषयी आदरभाव जागृत होतो, तो वाढीस लागतो ही त्यांच्या कर्तृत्वाची निशाणी असते. स्वकर्तृत्वाने मुंबई महापालिकेत उच्च पदावरून सेवानिवृत्त झाल्यानंतर सामाजिक कार्यात झोकून देऊन जनमानसात आदराचे स्थान निर्माण करणारे व्यक्तिमत्त्व म्हणजे लांजा तालुक्यातील आरगावचे सुपुत्र, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते चंद्रकांत ऊर्फ दादा श्रीधर खामकर. १४ ऑगस्ट हा त्यांचा जन्मदिवस, त्यानिमित्ताने आज वयाच्या ६८ व्या वर्षात पदार्पण करणाऱ्या चंद्रकांत दादा खामकर यांच्या कार्याचा आढावा.

…………………………..

आरगाव (ता. लांजा) येथे १४ ऑगस्ट १९५४ रोजी जन्मलेल्या चंद्रकांत दादांचे बालपण आरगावातच गेल्याने कोकणच्या लाल मातीचा सुगंध आणि निसर्गाचा सहवास त्यांच्या आयुष्याच्या जडणघडणीत महत्त्वाचा होता. दादांचे वडील स्वर्गीय श्रीधर जयराम खामकर हे त्यावेळचे मोठे सामाजिक कार्यकर्ते होते. लांजा तालुक्यातील विविध सामाजिक संस्था तसेच आरगावातील विविध संस्थांमध्ये त्यांनी नि:स्पृहपणे कार्य केल्याने चंद्रकांत खामकर यांना कुटुंबातच सामाजिक सेवेचे बाळकडू मिळाले. जिल्हा परिषद शाळा आरगाव क्र. १ येथे पाचवीपर्यंत शिक्षण घेऊन दादांनी मुंबईची वाट धरली. सहावी-सातवीचे शिक्षण पवईतील महापालिकेच्या शाळेत घेऊन नंतर ठाण्यात न्यू इंग्लिश स्कूलमध्ये अकरावीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले.

पुढे ऑल इंडिया लोकल सेल्फ गव्हर्नमेंट पब्लिक हेल्थ अँड सॅनिटेशनचा डिप्लोमा यशस्वीपणे पूर्ण करून बृहन्मुंबई महापालिकेच्या आरोग्य विभागात स्वच्छता निरीक्षक पदावर ते रुजू झाले. लाघवी स्वभाव, मृदू वक्तृत्व, प्रशासनावर पकड, प्रभावी संभाषणकौशल्य तसेच मधुर, आर्जवी स्वभावामुळे महापालिकेत ते सर्वांच्या गळ्यातील ताईत बनले. देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत पन्नास लाखाहून अधिक माणसे झोपडपट्ट्यांमध्ये राहतात. परिणामी आरोग्याच्या अनेक जटील समस्या तेथे असतात. त्यामुळेच मुंबईला एक ‘स्वास्थ्यपूर्ण शहर’ बनवण्यासाठी आरोग्य विभागाची भूमिका महत्त्वाची ठरते. चंद्रकांत खामकर यांनी आरोग्य निरीक्षक पदावर तब्बल ३९ वर्षे सेवा बजावताना ही बाब नेहमीच लक्षात ठेवली. स्वच्छता निरीक्षक या पदाला प्रामाणिकपणे न्याय देण्याचा प्रयत्न केला. सन १९९१ मध्ये त्यांनी कुर्ला येथे विभागीय जनगणना अधिकारी म्हणून उत्कृष्ट काम केले. पुढे २००१ आणि २०११ च्या जनगणनेतही त्यांनी केलेल्या उत्कृष्ट कामाची दखल घेऊन महापालिकेने त्यांचा यथोचित सन्मान केला. देशातील आघाडीच्या ‘टाइम्स ऑफ इंडिया’ या वर्तमानपत्रात ते मानाने झळकले. दूरदर्शनने त्यांची मुलाखत घेऊन त्यांनी झोकून देऊन केलेले जनगणनेचे कार्य लोकांसमोर आणले. पुढे ३१ मे २०१२ रोजी सॅनिटरी इन्स्पेक्टर पदावरून सेवानिवृत्त झाल्यानंतर ग्रामीण भागाच्या विकासासाठी कार्यरत राहण्याचा त्यांनी निर्णय घेतला.

चंद्रकांत दादा आज सत्तरीकडे वाटचाल करीत आहेत. परंतु त्यांच्या नसानसात भिनलेला समाजसेवक अस्वस्थ असल्याने सेवानिवृत्तीनंतर त्यांनी आपल्या कार्यकक्षा रुंदावल्या. जास्तीत जास्त वेळ गावाकडे राहणे त्यांनी पसंत केले. त्यामुळे ग्रामस्थांच्या सरकारी काम करण्यात येणाऱ्या अडचणी सोडवून देण्यासाठी ते वेळ देऊ लागले. आरगाव सर्वोदय जनता संघ, मुंबई, श्री गांगेश्वर सेवा मंडळ, आरगाव, दत्तक पालक संघ, रिंगणे-डगाव, लांजा-राजापूर-संगमेश्वर तालुका उत्कर्ष मंडळ या संस्थांच्या माध्यमातून शैक्षणिक, सामाजिक आरोग्य आणि धार्मिक क्षेत्रात त्यांनी विविध उपक्रम राबवले.

“एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंथ” या संत वचनाप्रमाणे वर्तणूक असणारे चंद्रकांत दादा नावेरी परिसरातील व्हेळ, रिंगणे, कोंडगे येथील तिन्ही हायस्कूलच्या दहावीच्या विद्यार्थ्यांकरिता शिक्षण तज्ज्ञांच्या व्याख्यानांचे आयोजन २०१६ पासून स्वखर्चाने करीत आहेत. बोर्ड परीक्षेत या विद्यार्थ्यांना धवल यश मिळावे, यासाठी दादा त्यांना सराव प्रश्नसंचाचे मोफत वितरण करतात. यामुळे आदर्श उत्तरपत्रिका कशी लिहावी, याचे उचित मार्गदर्शन ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना झाले आहे. आरगाव येथील अंगणवाडी क्रमांक ५ शासनाच्या नियमाप्रमाणे डिजिटल करण्याकरिता त्यांनी स्वतः पुढाकार घेऊन लोकवर्गणीतून ती पूर्ण केली. व्हेळ येथील रुक्मिणी भास्कर विद्यालयाला एक प्रोजेक्टर संच भेट देऊन या विद्यालयाला डिजिटल बनविण्यात सहकार्य केले. आरगावातील जिल्हा परिषदेच्या तीन प्राथमिक शाळा आणि दोन अंगणवाड्यातील स्वयंपाकगृह ‘धूरमुक्त’ करण्यासाठी त्यांनी पुढाकार घेतला. लोकवर्गणी जमवून भारत गॅस कंपनीचे पाच संच या प्रशालांना त्यांनी मिळवून दिले. आरगाव परिसरातील आर्थिक दुर्बल घटकातील अनेक कुटुंबांना उज्ज्वला योजनेमार्फत मोफत गॅस कनेक्शन त्यांनी मिळवून दिले. ”धूरमुक्त भारत” योजनेच्या पूर्तीसाठी आपल्या परीने खारीचा वाटा उचलला. गावातील जिल्हा परिषद शाळांची गुणवत्ता वाढवण्यासाठी त्यांनी तळमळीने कार्य केले. हे करताना चंद्रकांत दादांनी स्वतःच्या खिशात सर्वप्रथम हात घातला. नंतरच त्यांनी इतरांना आवाहन केले. दादांनी स्वतःचा मोठेपणा किंवा सन्मानासाठी कधीच कुठलेही काम केले नाही. श्रद्धा ज्ञान देते, नम्रता मान देते आणि योग्यता स्थान देते, पण तिन्ही मिळाले तर त्या व्यक्तीला समाज सन्मान देतो.

राजापूर, लांजा तालुक्यातील सर्वांत जुनी सामाजिक संस्था म्हणून मिरविणाऱ्या राजापूर लांजा तालुका नागरिक संघाने चंद्रकांत दादांच्या अनुभवाचा फायदा समाजाला व्हावा, याकरिता त्यांना संघाच्या कार्यात सक्रिय होण्याची विनंती केली. चंद्रकांत दादांनी ती नम्रतेने स्वीकारली. संघातर्फे राबवल्या जाणाऱ्या विविध उपक्रमांमध्ये आणि ग्रामीण साहित्य संमेलनांमध्ये ते आवर्जून सहभागी होतात. मातृभाषेचे भरण-पोषण करण्यासाठी, ग्रामीण भागातील साहित्यिकांना व्यासपीठ मिळवून देण्यासाठी ही साहित्य संमेलने आवश्यक आहेत, असे मत ते व्यक्त करतात. ती राबविणाऱ्या सुभाष लाड आणि त्यांच्या सहकाऱ्यांचे मोकळ्या मनाने कौतुक करतात.

वैश्विक संकटात करोनाच्या संसर्गाची टांगती तलवार आसपास असतानाही चंद्रकांत खामकर यांनी राजापूर लांजा तालुका नागरिक संघातर्फे राबविल्या गेलेल्या मदत कार्यात सक्रिय सहभाग घेतला. नावेरी परिसर, पाचल-रायपाटण या भागातील नागरिकांना मास्क, सॅनिटायझर्सचे वाटप करणे, त्या भागातील करोना रुग्णांचे सर्वेक्षण करणाऱ्या आशा सेविकांना रेनकोट वाटप करणे आदी विविध उपक्रम संघाच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांसोबत त्यांनी यशस्वी केले. यावेळी तरुणांना लाजवेल असे काम त्यांनी केले. त्यांच्या कार्याचा गौरव म्हणून संघाने त्यांना २४ जानेवारी २०२१ रोजी विशेष समारंभात करोना योद्धा म्हणून सन्मानित केले.

चंद्रकांत दादांच्या व्यक्तिमत्त्वामध्ये सामाजिक कार्यकर्त्यासोबतच एक सच्चा पर्यावरणप्रेमी लपला आहे. स्वर्गभूमी कोकणातील निसर्गाची गेल्या काही दशकांपासून होत असलेली लयलूट एक ना एक दिवस येथील स्थानिक कोकणी माणसाच्या मुळावर उठेल असे सांगत, ते वृक्षारोपणाचा जोरदार आग्रह धरतात. त्यांचे पर्यावरणप्रेम पाहून राजापूर लांजा तालुका नागरिक संघाने त्यांना पर्यावरण संवर्धन समितीचे अध्यक्ष बनवले. याचा फायदा घेत आगामी काळात लांजा, राजापूर तालुक्यात मोठ्या प्रमाणावर लक्षावधी वृक्षलागवड करण्याचा संकल्प त्यांनी केला आहे.

सामाजिक क्षेत्रात अग्रेसर असताना कुटुंबवत्सल चंद्रकांत दादांनी घराकडेही तेवढेच लक्ष दिले. त्यांचे सुपुत्र दीपक आणि कन्या सौ. योगिनी दोघेही उच्चशिक्षित असून विधिज्ञ आहेत. बंधू सुहास खामकर देखील बृहन्मुंबई महापालिकेत उच्च पदावर अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. दादांना त्यांच्या वाटचालीत अर्धांगिनी सौ. तेजस्वीताई यांची लाभलेली साथ खूप महत्त्वपूर्ण आहे. “सुख में भी, औौर दुख में भी साथ मै निभाऊंगी” या उक्तीप्रमाणे त्यांनी दादांना सदैव सहकार्य केले आहे.

आपल्या कार्यातून सन्मानास पात्र असलेल्या दादांना कोल्हापूरच्या जनकल्याण सामाजिक संस्थेने राज्यस्तरीय समाजभूषण पुरस्कार देऊन सन्मानित केले आहे.

सद्विचारांची बैठक, वाडवडिलांकडून आलेला संपन्न वारसा आणि सत्कर्माची ओढ यामुळेच सेवानिवृत्तीनंतरही जनकल्याणाचे व्रत सुरू ठेवलेले चंद्रकांत दादा आज ६८ व्या वर्षात पदार्पण करीत आहेत. दादांच्या कृतार्थ जीवनाचा पुढचा प्रवास आनंददायी होवो आणि त्यांचा अमृतमय सहवास लांजा तालुक्यातील विविध संस्थांना यापुढेही लाभो, हीच प्रभुचरणी प्रार्थना.

विजय हटकर, लांजा

(८८०६६३५०१७)

(चंद्रकांत दादा खामकर यांचा संपर्क क्रमांक – 98192 59253)

Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply