सावंतवाडी : येथील पंचद्रवीड सहकारी पतसंस्थेच्या ८७ वर्षांपूर्वीच्या स्थापनेमागे वेदमूर्ती कै. रामचंद्र शंकर सप्ते यांचे द्रष्टेपण होते. त्यावेळी संस्था स्थापना करणे हीसुद्धा समाजासाठी नवीन काही तरी करावे, अशी निखळ प्रेरणादायक कृती होती. यामुळे त्यांना आदरपूर्वक अभिवादन करतो, अशी कृतज्ञता संस्थेचे अध्यक्ष रवींद्र ओगले यांनी व्यक्त केली.
सावंतवाडीतील संस्थेच्या सभागृहाचे ‘वेदमूर्ती कै रामचंद्र शंकर सप्ते सभागृह’ असे नामकरण आणि कै. सप्ते यांच्या प्रतिमेचे अनावरण करण्यात आले. त्यावेळी आयोजित कार्यक्रमात ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते. ते पुढे म्हणाले, संस्थेचा वेलविस्तार तितक्याच विशुद्ध भावनेने करण्याची जबाबदारी आपणा सर्व पुढील पिढ्यांची आहे. कै. सप्ते यांचे तत्कालीन सहकारी कै. श्रीकृष्ण साधले, कै. शंकर पणशीकर या मंडळींनीही त्यावेळी संस्थेच्या वाटचालीसाठी निःस्वार्थ भावनेने काम केले. या मंडळींच्या प्रामाणिक, स्वच्छ कार्याची प्रेरक आठवण यापुढेही सर्व संचालक मंडळाला राहावी, यासाठी नामकरणाचा उपक्रम राबविण्यात आला आहे. त्यांनी संस्थेच्या वाटचालीची घोडदौड स्पष्ट केली.

कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून सावंतवाडीच्या वेदपाठशाळा संस्थेचे अध्यक्ष सुरेश पुराणिक गुरुजी उपस्थित होते. त्यांनी आपल्या भाषणात वेदमूर्ती कै. रामचंद्र शंकर सप्ते यांच्या १२७ व्या जयंतीच्या आदल्या दिवशी केलेल्या नामकरणाच्या औचित्याबद्दल समाधान व्यक्त केले. कै. सप्ते यांच्या बहुआयामी व्यक्तिमत्त्वाचे पैलू, त्यांची वेदशास्त्रातील पारंगतता आदी बाबींची माहिती त्यांनी दिली.

सप्ते कुटुंबाचे प्रतिनिधी आणि संस्थेचे निवृत्त सचिव गुरुप्रकाश सप्ते यांनी आपल्या आजोबांचे नाव सभागृहाला दिल्याबद्दल समाधान व्यक्त केले आणि संचालक मंडळाचे आभार मानले. शिस्त आणि संस्कार या महत्त्वाच्या गुणांमुळे वेदमूर्ती कै. रामचंद्र शंकर सप्ते यांच्याकडून या आर्थिक सहकारी संस्थेचे मोठे कार्य उभे राहिले, असे सांगून त्यांनी वेदमूर्ती कै. सप्ते यांच्या कार्याच्या आठवणींना उजाळा दिला.
व्यासपीठावर उपस्थित सिंधुदुर्ग महाराष्ट्र ब्राह्मण मंडळाचे अध्यक्ष राजाराम चिपळूणकर, सिंधुदुर्ग कऱ्हाडे ब्राह्मण संघाचे अध्यक्ष प्रदीप जोशी, तसेच सौ. मृणालिनी कशाळीकर यांनीही मनोगत व्यक्त केले. संस्थेचे प्रभारी सचिव योगेश पाटणकर हेही यावेळी व्यासपीठावर उपस्थित होते.
प्रारंभी वेदमूर्ती भूषण केळकर यांच्या वेदपठणात दीपप्रज्वलन करण्यात आले. संस्थेचे तज्ज्ञ संचालक मेजर गिरसागर यांनी स्वागत केले. प्रास्ताविक आणि कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संचालक विवेक मुतालिक यांनी केले. संस्थेचे अल्पबचत प्रतिनिधी अतुल माईणकर आणि गुरुनाथ दामले यांचा त्यांच्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल शाल आणि श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. संस्थेच्या संचालक सदस्या सौ. नेहा पुराणिक यांनी आभार मानले.

