दिवाळी अंक म्हणजे लेखकाच्या जडणघडणीची प्रयोगशाळा – अॅड. विलास पाटणे

साप्ताहिक बलवंतच्या दिवाळी अंकाचे रत्नागिरीत प्रकाशन

रत्नागिरी : दिवाळी अंक म्हणजे मराठी भाषेची साहित्यिक ठेव आहे. ती लेखकाच्या जडणघडणीची प्रयोगशाळा आहे. मराठीमध्ये दिवाळी अंकांची अतिशय समृद्ध परंपरा आहे. इतर कुठल्याही भारतीय भाषेमध्ये इतक्या मोठ्या प्रमाणावर  दिवाळी अंक प्रकाशित होत नाहीत. शतक महोत्सवी वर्षात पदार्पण करताना साप्ताहिक बलवंतच्या दिवाळी अंकाचे महत्त्व रत्नागिरीवासीयांसाठी अधिक आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक, कोकणचे अभ्यासक विधिज्ञ विलास पाटणे यांनी केले.

साप्ताहिक बलवंतच्या दीपावली अंकाचे प्रकाशन हॉटेल मथुरा येथे आज त्यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. ते पुढे म्हणाले की, बालकवी, गडकरी, कुसुमाग्रज, पु. ल. देशपांडे, पु. भा. भावे, व्यंकटेश माडगूळकर आदी लेखकांनी दिवाळी अंकापासून आपल्या लेखनाचा श्रीगणेशा केला .”आवाज” दिवाळी अंकाचे मुखपृष्ठ पहिली तीन वर्षे बाळासाहेव ठाकरे करीत असत. १९०९ साली मराठीतला पहिला दिवाळी अंक मासिक मनोरंजनचे संपादक काशिनाथ रघुनाथ आजगावकर ऊर्फ का. र. मित्र यांनी प्रकाशित केला. सध्या साधारणपणे ४०० च्या आसपास  दिवाळी अंक प्रकाशित होतात.

श्री. पाटणे म्हणाले की, मी बलवंतमध्ये पहिला लेख लिहिला होता. आज त्याला ५० वर्षे झाली आहेत. आजच्या डिजिटल युगात प्रिंट मीडियाचे दिवस संपले, असे म्हणतात, पण ते चुकीचे आहे. असे अस्तित्व संपणार नाही. सर्व माध्यमात आता क्राइम विषयाला जास्त महत्त्व दिले जाते. परंतु जपानमध्ये पहिल्या पानावर अर्ध्या ओळीचीसुद्धा क्राइमची बातमी नसते, नवीन काय, शोध, प्रयोग आदीला तेथे जास्त महत्त्व दिले जाते. त्याप्रमाणे सकारात्मक लिखाण केले पाहिजे. बाळ माने यांनी नव्या क्षेत्रात दमदार पाऊल टाकले आहे. हा चांगला मार्ग आहे, डिजिटल माध्यमातही त्यांनी मुशाफीरी करावी, असे आवाहन विलास पाटणे यांनी केले.

प्रास्ताविकात बाळ माने म्हणाले, करोनामुळे सर्व जग त्रस्त होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि देशातील शास्त्रज्ञांनी लस शोधून नवी पहाट आणली. बाळशास्त्री जांभेकर यांनी मराठीत दर्पण हे पहिले वृत्तपत्र सुरू केले. त्यांचा वारसा साप्ताहिक बलवंतने पुढे चालविला आहे. कै गजानन पटवर्धन यांनी बाळ गंगाधर टिळकांच्या नावाने बलवंत १९२३ मध्ये सुरू केले. स्वातंत्र्ययुद्धात बलवंतला दंड झाला होता. त्याकाळी झालेला चार हजार रुपयांचा दंड ब्रिटिश सरकारला सर्व लोकांनी जमा करून भरला, एवढा जाज्वल्य इतिहास आहे.

बलवंतचे स्वातंत्र्यसंग्रामाच्या काळातील योगदान महत्त्वाचे आहे. स्वातंत्र्य युद्ध, संयुक्त महाराष्ट्र आणि पुढे आणीबाणी या सर्व लढ्यात बलवंतचे योगदान आहे. स्पर्धा, अनेक आव्हाने होती. आता शतकाकडे वाटचाल करणारे साप्ताहिक आहे. वेबसाइट, यूट्यूब चॅनेल असे डिजिटल रूप केले. अॅमेझॉनवर इ पब्लिकेशन उपलब्ध आहे. वाचन संस्कृतीचे जतन करण्यासाठी ही धडपड सुरू आहे. बलवंतला आता ग्लोबल प्लॅटफॉर्म मिळाला आहे. बलवंतचे आता इंग्रजी आणि हिंदी भाषेत प्रकाशन करण्याचा मानस आहे. ज्येष्ठ पत्रकार आणि आमचे मार्गदर्शक अरविंद कोकजे यांनी बलवंतच्या इतिहासाचे सदर सुरू केले आहे, त्याचे पुस्तक करून प्रकाशन २६ जानेवारीला करण्याचा मानस बाळ माने यांनी व्यक्त केला.

लेखक अनिल दांडेकर म्हणाले की, पूर्वीच्या काळात दिवाळी अंकासाठी नंबर लावावा लागे, अंक वाचायला उड्या पडायच्या. हा पूर्वीचा काळ गेला. आज मला बलवंतमध्ये लिहायला मिळाले, त्यानिमित्ताने नवीन लेखन झाले. छापणारे आहेत म्हणून लिहिणाऱ्याच्या शब्दाला किंमत आहे. आज रंगभूमी दिन आहे. रंगमंच सजवणारे आहेत म्हणून अभिनय करणाऱ्यांना किंमत आहे. तशीच वृत्तपत्रांची स्थिती आहे.

ज्येष्ठ साहित्यिक प्रा. सुजन शेंडये यांनी सांगितले की बलवंतच्या दिवाळी अंकात प्रथमच माझा लेख प्रसिद्ध झाला आहे.

कार्यक्रमाला बलवंतच्या कार्यकारी संपादक सौ. माधवी माने, ज्येष्ठ पत्रकार अरविंद कोकजे उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. मानसी मुळ्ये यांनी केले. रत्नागिरी शहरातील पत्रकार, ज्येष्ठ लेखक, मान्यवर मंडळी कार्यक्रमाला उपस्थित होती.

अंकाविषयी थोडेसे …

शताब्दीकडे वाटचाल करणाऱ्या ‘बलवंत’ साप्ताहिकाचा यंदाचा दिवाळी अंक वैशिष्ट्यपूर्ण आणि संग्राह्य आहे. या अंकात ज्येष्ठ पत्रकार अरविंद कोकजे यांनी ‘मी बलवंत बोलतोय’ या लेखातून साप्ताहिकाच्या ९९ वर्षांच्या वाटचालीचा लेखाजोखा मांडला आहे. लोकनेता ते विश्वनेता हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरील अप्रतिम लेख अॅडव्होकेट विलास पाटणे यांनी लिहिला आहे. केंद्रीय उद्योगमंत्री नारायणराव राणे यांची मुलाखत तर या अंकाचं वैशिष्ट्य! सोबत नवी दिल्लीतील तीन ज्येष्ठ पत्रकार, व्यंकटेश केसरी, अनंत बागाईतकर आणि सुनील चावके यांचे विचारप्रवर्तक लेख या अंकात आहेत. नाट्यलेखक अनिल दांडेकर, नाट्यलेखक डॉ. श्रीकृष्ण जोशी, द्वारकानाथ संझगिरी, आशुतोष बापट, डॉ. आशुतोष जावडेकर, मंगलाताई गोडबोले यांच्यासह अनेक मान्यवर लेखकांचं लेखन या दिवाळी अंकात वाचायला मिळणार आहे.

केवळ १९९ रुपयांचा हा दिवाळी अंक महाराष्ट्रासह नवी दिल्ली, बडोदा, इंदोर, पणजी, बेळगाव या ठिकाणी उपलब्ध आहे. तुम्ही अंकाचे संपादक बाळ माने यांना (9545195333) क्रमांकावर गुगल पे द्वारे १९९ रुपये पाठवावेत किंवा ‘साप्ताहिक बलवंत’च्या खात्यात १९९ रुपये भरावेत. हा अंक मोफत पोस्टेज-कुरीअर सेवेद्वारे तुम्हाला घरपोच मिळेल.

Account Name – Saptahik balwant.
Bank Name – Bank of Maharashtra
Branch Name – R. P gogate college Ratnagiri.
A/c No – 60125447553
IFSC Code – MAHB0001284

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड


Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply