रत्नागिरी : रत्नागिरीचा माजी विद्यार्थी चिन्मय मोघे ऊर्फ कवी समर याने अवघ्या सोळाव्या वर्षी लिहिलेल्या ‘शिवप्रताप’ या काव्यमय ग्रंथाची पहिली आवृत्ती प्रकाशित झाली आहे.
पुण्यातील पुरंदरे प्रकाशनाने प्रसिद्ध केलेले ६५० पृष्ठांचे हे महाकाव्य म्हणजे छत्रपती श्री शिवाजी महाराजांचे काव्यमय चरित्र आहे. ‘महाकाव्य शिवप्रताप’ हे मराठी भाषेतील १९ वृत्तांमधील हे पहिले वृत्तबद्ध महाकाव्य आहे. अगदी सोप्या मराठी भाषेत ३००० श्लोक १० पर्व आणि १०० सर्गात रचनाबद्ध केले आहेत. वृत्तबद्ध असल्याने गेय, लयबद्ध आणि प्रमाणबद्ध काव्य आहे. पोवाडे, शिवरायांच्या आयुष्यातील प्रेरणादायी प्रसंगांचे काव्यात्मक वर्णन हे या महाकाव्याचे वैशिष्ट्य आहे. पद्मविभूषण बाबासाहेब पुरंदरे यांची प्रस्तावना या महाकाव्याला लाभली आहे. कै. दीनानाथ दलाल यांच्या चित्रांचा ग्रंथात समावेश करण्यात आला आहे.
हे महाकाव्य साकारणारा चिन्मय किरण मोघे ऊर्फ कवी समर रत्नागिरीच्या रा. भा. शिर्के प्रशालेचा माजी विद्यार्थी आहे. कवी समर यांनी ‘संगीत चंद्रप्रिया’ या नाटकाद्वारे मराठी साहित्यविश्वात पदार्पण केले. आता ‘पुरंदरे प्रकाशन’ हे महाकाव्य प्रकाशित करत आहे. याशिवाय ‘तथागत बुद्ध’ आणि ‘उर्मिला’ या दोन कादंबऱ्यांचे लेखनही पूर्ण झाले आहे. चिन्मयचे वडील किरण मोघे पुण्याचे जिल्हा माहिती अधिकारी आहेत.
आता प्रसिद्ध झालेले ‘शिवप्रताप’ महाकाव्य चिन्मय मोघे याने ‘कवी समर’ हे नाव घेऊन वयाच्या सोळाव्या वर्षी लिहिले. संपूर्ण महाकाव्य केवळ ५० दिवसांत लिहून त्याने पूर्ण केले. पुरंदरे प्रकाशनाशी ९०९६०८३६८५ किंवा ९०९६०८३६८७ या क्रमांकावरही संपर्क साधता येईल.
पुरंदरे प्रकाशनाच्या http://surl.li/apzbn या संकेतस्थळावरून या पुस्तकाची ऑनलाइन खरेदी करता येईल.