कवयित्री सरिता पवार यांना राज्यस्तरीय क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कार

कणकवली : राष्ट्रीय बंधुता साहित्य परिषदेतर्फे दिला जाणारा राज्यस्तरीय क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कार सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आघाडीच्या कवयित्री, कथाकार सरिता पवार यांना जाहीर झाला आहे. येत्या २७ नोव्हेंबर रोजी पुणे येथे पुरस्कार वितरण सोहळा होणार आहे. याशिवाय पहिलाच राष्ट्रीय सावित्रीजोती पुरस्कार कवयित्री ललिता सबनीस आणि ज्येष्ठ साहित्यिक डॉ. श्रीपाल सबनीस यांना जाहीर झाला आहे.

कणकवलीच्या सरिता पवार गेली २२ वर्षे साहित्यलेखन करत आहेत. त्यांचे साहित्य राज्यातील अनेक प्रस्थापित मासिके तसेच दिवाळी अंकात प्रसिद्ध झालेले आहे. त्यांच्या अनेक कविता आणि कथांना राज्यस्तरीय, आंतरराज्यस्तरीय पुरस्कार प्राप्त झाले आहेत. पेशाने प्राथमिक शिक्षिका असलेल्या सरिता पवार यांच्या शैक्षणिक क्षेत्रातील अनुकरणीय कामगिरीची दखल घेत कुठल्याही प्रस्तावाशिवाय विविध संस्थांनी राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्काराने त्यांना सन्मानित केले आले आहे. अद्वैत फाउंडेशनच्या माध्यमातून साने गुरुजींनी स्थापन केलेल्या राष्ट्रसेवादलाच्या माध्यमातून व्यक्तिमत्त्व विकास आणि संस्कार शिबिर त्या सिंधुदुर्गात त्या आयोजित करतात. सिंधुदुर्गातील अलीकडच्या साहित्य चळवळीत महत्त्वाचे योगदान असलेल्या समाज साहित्य संघटनेच्या त्या सचिव आहेत. सदाशिव पवार गुरुजी स्मृती प्रतिष्ठानच्या माध्यमातून शैक्षणिक, सामाजिक कार्यात त्या नेहमी अग्रेसर असतात. विविध सामाजिक संस्थांशी त्या सक्रियपणे जोडल्या गेलेल्या आहेत.

श्रीमती पवार यांच्या साहित्य, शैक्षणिक, सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याची दखल घेत पुण्यातील राष्ट्रीय बंधुता साहित्य परिषद आणि औंध येथील रयत शिक्षण संस्थेच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयाच्या सहयोगाने त्यांना राज्यस्तरीय क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे. सन्मानचिन्ह, मानपत्र आणि रोख रक्कम असे पुरस्काराचे स्वरूप आहे.

पुरस्कार वितरण महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुण्यतिथीनिमित्त येत्या २७ नोव्हेंबर रोजी पुण्यातील श्रमिक पत्रकार भवनात होणार आहे. यावेळी सरिता पवार यांच्यासह राज्यभरातील विविध क्षेत्रातील कर्तव्यसंपन्न १५ महिलांना राज्यस्तरीय क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. त्यामध्ये मंदाकिनी रोकडे (पुणे), वैशाली मोहिते (पुणे), मधुराणी बनसोड (वाशीम), शिल्पा परुळेकर पै (वसई), अक्षदा देशपांडे (मुंबई), दीपिका सुतार (सिंधुदुर्ग), चंदना सोमाणी (पुणे), माधुरी चौधरी (औरंगाबाद), शरयु पवार (पुणे), जयश्री पाटकर (अमरावती), डॉ. नीलम जेजुरकर (राजगुरूनगर), डॉ. सुनीता खेडकर (पुणे), पौर्णिमा खांबेटे (पुणे), मनीषा शिंदे पाटील (पलूस, सांगली) यांचा समावेश आहे.

माजी विभागीय आयुक्त चंद्रकांत दळवी यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान केले जाणार आहेत, अशी माहिती साहित्य परिषदेचे संस्थापक अध्यक्ष बंधुताचार्य प्रकाश रोकडे यांनी दिली. यावेळी डॉ. विजय ताम्हाणे, कवी चंद्रकांत वानखेडे, प्राचार्य डॉ. अरुण आंधळे, प्रा. डॉ. संजय नगरकर, प्रा. प्रशांत रोकडे उपस्थित राहणार आहेत.

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply