रत्नागिरी : येथील इन्फिगो आय केअर हॉस्पिटलने २५ जानेवारी ते १० फेब्रुवारी २०२२ पर्यंत निष्णात आणि अनुभवी सर्जनकडून पडद्याचे आजार आणि मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्याचे ठरवले आहे.
मार्च २०२० मध्ये करोनाची पहिली लाट आल्यानंतर सर्वसामान्यांमध्ये, खासकरून ज्येष्ठ नागरिकांमध्ये काळजीचे वातावरण तयार झाले. या काळजीपोटी विशेषकरून ज्येष्ठ नागरिकांनी अनावश्यक गोष्टींसाठी घराबाहेर जाणे टाळले. यामुळे तातडीचे उपचार असणाऱ्या आजारांव्यतिरिक्त आरोग्याच्या इतर समस्यांकडे तितकेसे लक्ष दिले गेले नाही. खासकरून दातांचे, डोळ्यांचे आजार किंवा त्यांची नियमित करावी लागणारी तपासणी यामध्ये खंड पडला. कोव्हिड १९ च्या गेल्या दोन वर्षांच्या कालावधीत एका पाहणीअंती असे आढळून आले की विशेषतः ज्येष्ठ नागरिकांमध्ये ज्यांना नियमित नेत्रतपासणी आवश्यक होती, त्यांनी ती करून घेतली नसल्याने किंवा करोनाच्या भीतीने डॉक्टरांकडे जाण्याचे टाळल्याने मधुमेहामुळे होणारे डोळ्यांचे पडद्याचे आजार किंवा आधीच अस्तित्वात असलेला मोतीबिंदू बराच कालावधी गेल्याने अत्यंत कडक होणे व प्रसंगी दृष्टीला धोका निर्माण होणे यासारखे गंभीर निरीक्षण नोंदविले गेले.
एकंदरीतच हा काळ अत्यंत ताणतणावाचा असल्याने त्याचा विपरीत परिणाम आरोग्यावर सार्वत्रिकरीत्या झाला. खासकरून मधुमेही व्यक्तींमध्ये किडनी, हृदयरोग किंवा डोळ्यांच्या पडद्याचे आजार होण्याचे प्रमाण वाढले. याचे मुख्य कारण रक्तातील अनियंत्रित साखर आणि करोनामुळे डॉक्टरांकडे न गेल्याने आलेली उपचारातील अनियमितपणा हे होते.
डोळ्यांमधील मोतीबिंदूबद्दलसुद्धा असे निरीक्षण नोंदवण्यात आले. करोना साथीपूर्वीची आकडेवारी आणि साथीदरम्यान आणि सध्याचा एकंदरीत कल पाहता प्रत्येक १०० लोकसंख्येमागे ९ ते ११ लोकांना मोतीबिंदू झाला असेल तर या काळामध्ये डॉक्टरांकडे न गेल्याने किंवा वेळीच शस्त्रक्रिया न केल्याने मोतीबिंदू कठीण किंवा कडक होण्याचे प्रमाण त्या ११ पैकी ४ व्यक्तींमध्ये आढळले. मोतीबिंदू कडक झाल्याने तो काढताना असणाऱ्या धोक्याचे प्रमाण वाढते. इतकेच नव्हे तर दृष्टीला अपाय होण्याची शक्यता वाढते. अशावेळी मधुमेह असलेल्यांनी आपल्या डोळ्यांचा पडदा नेत्र तज्ज्ञांकडून सहा महिन्यांतून एकदा तरी तपासायला हवा. ज्या व्यक्तींना मोतीबिंदू आहे त्यांनी तो अधिक वाट न बघता अत्याधुनिक मायक्रो, फेको, इमल्सिफिकेशन या अत्यंत सूक्ष्म शस्त्रक्रियेद्वारे वेळेतच काढून घ्यावा. मोतीबिंदूच्या प्रकारानुसार त्या शस्त्रक्रियेची कठीणता कमीजास्त होत असते. अशा रुग्णांना अत्यंत कुशल डॉक्टरांकडून शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला दिला जातो.
डोळे हा अत्यंत महत्त्वाचा अवयव असल्याने मोतीबिंदू, मधुमेह आणि इतर आजार असलेल्या व्यक्तींच्या डोळ्यांच्या पडद्याच्या तपासणी व अवघड झालेल्या मोतीबिंदूची शस्त्रक्रिया अत्यंत कुशल सर्जनकडून व्हावी व त्यावेळी रेटिना सर्जन म्हणजेच पडद्याचे तज्ज्ञ डॉक्टर उपस्थित असावेत, या उद्देशाने हा पंधरवडा आयोजित करण्यात आला आहे.
या उपक्रमाचा ज्यांना लाभ घ्यायचा आहे त्यांनी पूर्वनोंदणी करून नेत्र तपासणी करून घ्यावी असे आवाहन इन्फिगोचे डॉ. श्रीधर ठाकूर यांनी केले आहे. मोतीबिंदू शस्त्रक्रिया हे प्रख्यात नेत्र तज्ज्ञ डॉ. अरिंदम भट्टाचार्य करणार असून ते भूल किंवा इंजेक्शन न देता व बिनटाक्याच्या सूक्ष्म शस्त्रक्रिया करणार आहेत. या शस्त्रक्रिया झाल्यावर अर्धा तासात त्या व्यक्तीला घरी जाता येईल तसेच मधुमेहामुळे होणारे पडद्याचे आजार व पडद्याच्या गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया राष्ट्रीय पातळीवरील प्रख्यात रेटिना सर्जन डॉ. प्रसाद कामत करणार आहेत.
तपासणीचा लाभ घेण्यासाठी ९३७२७६६५०४ या क्रमांकावर संपर्क साधून नावनोंदणी करावी, असे आवाहन व्यवस्थापकीय संचालक डॉ. श्रीधर ठाकूर यांनी केले आहे.
