सावंतवाडी : येथील वैद्य मुरलीधर पुरुषोत्तम प्रभुदेसाई यांची नवी दिल्ली येथील राष्ट्रीय आयुर्वेद विद्यापीठाचे राष्ट्रीय गुरू म्हणून सलग दुसऱ्या वर्षी निवड झाली आहे.
राष्ट्रीय आयुर्वेद विद्यापीठ ही भारत सरकारच्या आयुष मंत्रालयाच्या अंतर्गत एक स्वायत्त संस्था आहे. आयुष मंत्रालयाच्या देखरेखीखाली इतर अनेक राष्ट्रीय संस्था कार्यरत आहेत. त्यापैकीच ही एक महत्त्वाची स्वायत्त संस्था आहे. आयुर्वेदाचे ज्ञान आणि अभ्यासाच्या उद्देशाने या विद्यापीठाची स्थापना ११ फेब्रुवारी १९८८ रोजी करण्यात आली, तर १९९१ साली विद्यापीठाचे कामकाज सुरू झाले.
आयुर्वेदाच्या अभ्यासकांकडून तरुण वैद्यांकडे आयुर्वेदाचे ज्ञान हस्तांतरित करण्याची व्यवस्था करण्यासाठी विद्यापीठाने आरएव्ही सदस्य (एमआरएव्ही) अभ्यासक्रम सुरू केला. हा अभ्यासक्रम प्राचीन भारतात प्रचलित असलेल्या गुरु-शिष्य (गुरुकुल) पद्धतीने चालविला जातो. सध्या उपलब्ध असलेले चरक संहिता, सुश्रुत संहिता, अष्टांग हृदय इत्यादी आयुर्वेद शास्त्रीय ग्रंथ गुरुकुल शिक्षणाचाच परिणाम असल्याचे मानले जाते. आधुनिक आयुर्वेद शिक्षण संस्थांमध्ये तशा प्रकारचे केंद्रित आणि प्रत्येक विद्यार्थ्याकडे लक्ष दिले जाणारे शिक्षण दिले जात नाही. त्याची कमतरता जाणवते. वैयक्तिक प्रशिक्षणाऐवजी सर्वसामान्य प्रशिक्षणावर लक्ष केंद्रित केले जात आहे.
अशा स्थितीत वैद्यांनी अभ्यास करून मिळविलेल्या निदान, व्यवस्थापन आणि सूत्रे अशा विशेष नैदानिक कौशल्यांचे जतन आणि प्रसार करण्याच्या उद्देशाने राष्ट्रीय विद्यापीठाने १९९९ साली ‘आरएव्ही प्रमाणपत्र’ हा एक वर्षाचा अभ्यासक्रम सुरू केला. कार्यरत असलेल्या वैद्यांनी त्यांची खास पद्धती आणि कौशल्ये नवपदवीधरांना द्यावी, अशा अपेक्षेने हा अभ्यासक्रम तयार करण्यात आला आहे. आयुर्वेदाची परिश्रमपूर्वक विकसित केलेली कौशल्ये आणि तंत्रे नव्या पिढीकडे हस्तांतरित होऊ शकतील, हा त्यामागचा उद्देश आहे.
अशी कौशल्ये आत्मसात केलेल्या वैद्यांना राष्ट्रीय गुरू म्हणून विद्यापीठातर्फे मान्यता दिली जाते. तशी मान्यता वैद्य प्रभुदेसाई यांना गेल्या वर्षी मिळाली होती. या काळात गुजरात आणि केरळ येथील दोन स्नातकोत्तर विद्यार्थ्यांनी त्यांच्याकडे शिक्षण घेतले. राष्ट्रीय आयुर्वेद विद्यापीठाने या विद्यार्थ्यांना डॉ. प्रभुदेसाई यांच्याकडे पदव्युत्तर शिक्षण घ्यायला सुचविले होते. त्यांचा एक वर्षाचा अभ्यासक्रम आता पूर्ण झाला आहे.
याच पद्धतीने पुढच्या वर्षासाठीही डॉ. प्रभुदेसाई यांची राष्ट्रीय गुरू म्हणून निवड झाली आहे.
वैद्य प्रभुदेसाई यांनी १९७७ ते १९८६ अशी दहा वर्षे मुंबईत वरळी येथील पोदार आयुर्वेदिक महाविद्यालय आणि शीव येथील आयुर्वेद महाविद्यालयात अध्यापन केले. त्यानंतर २००९ ते २०१४ या काळात सावंतवाडीतील भाईसाहेब सावंत आयुर्वेद महाविद्यालयात बीएएमएसच्या विद्यार्थ्यांसाठी अध्यापन, टिळक महाराष्ट्र विद्यापीठाच्या आयुर्वेद विभागात AVP (आयुर्विद्या-पारंगत) या पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी अध्यापन, तसेच पीएचडीसाठी मान्यताप्राप्त गाइड म्हणून काम केले आहे. राष्ट्रीय आयुर्वेद विद्यापीठाचे राष्ट्रीय गुरू म्हणून त्यांनी वर्षभर उत्तम कामगिरी बजावली आहे.
Follow Kokan Media on Social Media Follow Kokan Media on Social Media