लोकराजा सुधीर बाबी कलिंगण यांचे निधन

कुडाळ : कलेश्वर दशावतार नाट्य मंडळाचे संचालक तथा लोकराजा दशावतारी नटसम्राट शिवराम ऊर्फ सुधीर कलिंगण (वय ५२) यांचे आज, सोमवार, ७ फेब्रुवारी रोजी पहाटे ३ वाजता निधन झाले. त्यांनी गोव्यातील खासगी रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दशावतारी परंपरा जिवंत ठेवण्याचे काम त्यांनी केले होते. कलिंगण म्हणजे दशावतारातील हिरा होते. त्यांच्या जाण्याने दशावतार पोरके झाले आहे, अशी प्रतिक्रिया दशावतारी कलावंत व्यक्त करत आहेत.

सुधीर कलिंगण हे प्रसिद्ध दशावतारी कलाकार बाबी कलिंगण यांचे पुत्र होते. बाबी कलिंगण यांनी दशावतारी कला नुसतीच जिवंत ठेवली नाही, तर समृद्ध केली. त्यांनी १९८३ मध्ये स्वतंत्र कलेश्वर दशावतार नाट्य कंपनी सुरू केली होती. त्यापूर्वी १९८४-८५ मध्ये त्यांनी खानोलकर दशावतार कंपनी चालवण्यास घेतली होती. त्यात सुधीर कलिंगण आणि त्यांचा भाऊही काम करायचा. कधी कधी सुधीर स्त्री पात्रही रंगवायचे. वडिलांनी जिवंत ठेवलेली ही कला सुधीर यांनी पुढे नेली. दिवसभर एसटी विभागात चालक म्हणून काम करायचे आणि रात्री दशावतारी नाट्य प्रयोग करायचे, अशी तारेवरची कसरत त्यांनी केली होती.

सुधीर यांची वनराज नाटकातील बाल वनराजाच्या भूमिकेपासून रंगभूमीवर सुरुवात झाली. त्यानंतर त्यांनी चिलया बाळ, रोहिदास आदी भूमिकाही केल्या. नवोदित कलाकारांना सातत्याने प्रोत्साहन देण्याचे काम त्यांनी केले. सुधीर यांनी ही कला केवळ कोकणापुरती मर्यादित ठेवली नाही. तर सिंधुदुर्ग, मुंबईसह महाराष्ट्रातील महत्त्वाची शहरे आणि गोव्यात दशावतारी प्रयोग करून रसिकांची मने जिंकली. प्रत्येक सिंधुदुर्गवासीयाच्या ओठी सुधीर कलिंगण यांचे नाव होते, इतके ते प्रसिद्ध होते. ते लोकराजा आणि नटसम्राट म्हणून लोकप्रिय होते. सुधीर कलिंगण यांनी अनेक भूमिका अजरामर केल्या. त्या आजही रसिकांच्या मनात घर करून आहेत.

सुधीर कलिंगण काही दिवस गोवा येथील व्हिजन हॉस्पिटल येथे उपचार घेत होते. मात्र अनेक वर्षे रात्र रात्र जागवून रसिकांच्या मनात आपले वेगळे स्थान निर्माण केलेल्या सुधीर कलिंगण यांनी जगाच्या रंगमचावरून अचानक निरोप घेतला. दशावतारी रंगमंच गाजवणारा रसिकांच्या हृदयातील अनमोल हिरा लोकराजा नटसम्राट सुधीर कलिंगण यांच्या अकाली जाण्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

सुधीर कलिंगण गेल्या काही दिवसांपासून आजारी होते. त्यांच्यावर गोव्यातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. आज त्यांची प्राणज्योत मालवली.

ते सिंधुदुर्ग दशावतारी चालक मालक संघाचे सहसचिव, तर मुंबईतील सांस्कृतिक संचालनालयाच्या लोककला समितीचे सदस्य होते.

नटवर्य बाबी कलिंगण यांच्यानंतर कलिंगण कुटुंबाचा दशावतारी कलेचा वारसा पुढे नेत अनेक नवीन दशावतारी कलाकार घडविणाऱ्या या नटसम्राटाच्या पश्चात पत्नी, मुले, भाऊ, पुतणे यांच्या सोबत मोठा चाहता वर्ग आहे.

Follow Kokan Media on Social Media

Something went wrong. Please refresh the page and/or try again.

Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply