संगमेश्वरच्या कलांगणची स्वरभास्कर-देवगंधर्व संगीत मैफल २० फेब्रुवारीला

संगमेश्वर : भारतरत्न पंडित भीमसेन जोशी यांच्या जन्मशताब्दी वर्ष आणि पंडित भास्करबुवा बखले यांच्या स्मृतिशताब्दीचे औचित्य साधून येथील कलांगण परिवाराने येत्या रविवारी (दि. २० फेब्रुवारी) संगीत मैफिलीचे आयोजन केले आहे. नवोदित गायक चैतन्य परब व सौ. प्रेरणा दामले-वझे मैफिल रंगवणार आहेत. २० फेब्रुवारीला सायंकाळी ५ वाजता धामणी येथील ड्राइव्ह इन लॉन येथे ही मैफिल होईल.

पं. भास्करबुवा बखले हे आत्म्याचे संगीत गाणारे थोर गायक आहेत.पण विशेष म्हणजे, त्यांनी स्वतःबरोबरच श्रोत्यांचा आणि शिष्यांचाही आत्मा जागवला आहे, हे उद्गार लोकमान्य टिळकांनी गायकवाडवाड्यात पंडितजींचा सत्कार करताना काढले होते. ग्वाल्हेर, आग्रा आणि जयपूर या तीन घराण्यांची तालीम घेणारे एकमेव गायक म्हणजे देवगंधर्व भास्करबुवा बखले. बुवांचं चरित्र म्हणजे स्वरांच्या सिद्धीसाठी केलेल्या तपश्चर्येचा इतिहास आहे, असे पु.ल. देशपांडे म्हणत असत. अशा भास्करबुवांचे हे स्मृतिशताब्दी वर्ष आहे.

पुढील काळात देवगंधर्वांची गायकी आत्मसात करणारे भारतरत्न पं. भीमसेन जोशी. कलाकाराची खरी परीक्षा दोन सुरेल तंबोऱ्यांमध्ये गाऊन चार गुणी श्रोत्यांकडून यशाची पावती घेण्यातच असते, हे देवगंधर्वांचे उद्गार यथार्थ करणारे स्वरभास्कर पंडितजी म्हणजे अभिजात भारतीय संगीतासाठीच परमेश्वराने जन्माला घातलेले ईश्वराचे देणे होय. सवाई गंधर्व ते देवगंधर्व अशा संगीतातील अनेकांकडून ज्ञानकण वेचत समृद्ध झालेल्या पंडितजींनी पुलंच्या भाषेत हवाई गंधर्व व्हावे, ही रसिकांची पावतीच होती. त्यांचेही जन्मशताब्दी वर्ष साजरे करण्यासाठी कलांगणने कार्यक्रम आयोजित केला आहे.

कार्यक्रमाचे निवेदन सौ. पूर्वा पेठे आणि प्रसिद्ध निवेदक निबंध कानिटकर करणार आहेत. तबलासाथ हेरंब जोगळेकर, ऑर्गनची साथ चैतन्य पटवर्धन करणार आहेत. कार्यक्रमाला उपस्थित राहावे, असे आवाहन कलांगणचे श्रीनिवास पेंडसे यांनी केले आहे.

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply