रत्नागिरी : रामटेकच्या कविकुलगुरू कालिदास संस्कृत विश्वविद्यालयाच्या रत्नागिरी उपकेंद्राचे भारतरत्न डॉ. पांडुरंग वामन काणे अध्ययन केंद्र असे नामकरण आज राज्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी केले.

या केंद्राच्या ताब्यातील ३५० आसनक्षमतेच्या सभागृहाच्या नूतनीकरणासाठी ८० लाख रुपये मंजूर केले जातील. या सभागृहात अद्ययावत यंत्रणा बसवून, तसेच येथील रंगमंचाला नटवर्य शंकर घाणेकर रंगमंच असे नाव दिले जाईल. त्यामुळे त्यांचीही स्मृती चिरकाळ राहील. हे मिनी नाट्यगृह अल्पदरामध्ये रंगकर्मींना नाटकाच्या तालमीसाठी आणि छोट्या कार्यक्रमांसाठी दिले जाईल, अशी घोषणा मंत्री उदय सामंत यांनी उद्घाटनप्रसंगी केली.
रत्नागिरीच्या एसटी बसस्थानकासमोरील अरिहंत मॉल येथील या उपकेंद्राच्या नामकरण समारंभात ते बोलत होते. व्यासपीठावर कुलगुरू डॉ. मधुसूदन पेन्ना, उपकेंद्राचे संचालक डॉ. दिनकर मराठे आणि कुलसचिव डॉ. रामचंद्र जोशी, काणे यांचे नातेवाईक किरण काणे, तसेच सत्कारमूर्ती उपस्थित होते.
मंत्री सामंत म्हणाले, सध्या जेथे उपकेंद्र आहे, तेथे १८६३ मध्ये स्थापन झालेली शासकीय इंग्रजी माध्यमाची शाळा होती. तेथे डॉ. काणे १९०४ च्या सुमारास काही काळ अध्यापक होते. संस्कृतसाठी त्यांचे भरीव योगदान होते. त्याबाबतची कृतज्ञता म्हणून त्यांचे नाव उपकेंद्राला दिले आहे. या माध्यमातून महाराष्ट्राची संस्कृती जपण्याचे काम महाविकास आघाडी सरकार करत आहे. उपकेंद्रात कर्मचारी भरती करताना ९९ टक्के स्थानिकांना संधी देण्याची सूचना त्यांनी केली.
कुलगुरू डॉ. पेन्ना यांनी हे उपकेंद्र भारत आणि भारताबाहेरही आपला ठसा उमटवेल, अशी ग्वाही दिली. तसेच मोठ्या प्रमाणात संस्कृत आणि अन्य अभ्यासक्रमांकरिता शासनाने दहा एकर जमीन उपलब्ध करून दिल्यास संस्कृत भवन उभारण्याकरिता प्रयत्न करू, असे सांगितले. रामटेक येथील संस्कृत विश्वविद्यालयामध्ये डेटा सेंटर उभारण्यासाठीही निधी देण्याची मागणी त्यांनी केली. केंद्रासाठी आर्थिक तरतूद करताना काही अटी शिथिल केल्यास आणखी चांगल्या पद्धतीने काम करता येईल, असेही त्यांनी सांगितले.
याप्रसंगी काव्यतीर्थ विनायक पोखरणकर गुरुजी (ज्येष्ठ संस्कृत विद्वान), कीर्तनभास्कर हभप महेशबुवा काणे (संस्कृती संवर्धन), प्रियव्रत पाटील (युवा संस्कृत विद्वान), तन्मय हर्डीकर (युवा संस्कृत विद्वान), माधव आमशेकर (बाल संस्कृत विद्वान) आणि डॉ. विवेक भिडे (सामाजिक क्षेत्र) यांचा सन्मान केला. देवरूखच्या श्री गणेश वेदपाठशाळा (संस्था, वेदरक्षण) यांच्या वतीने रवींद्र साठे यांनी सन्मान स्वीकारला. मराठी राजभाषा दिनानिमित्त ज्येष्ठ पत्रकार राजाभाऊ लिमये, अरविंद कोकजे, राजेंद्रप्रसाद मसुरकर यांना सन्मानित करण्यात आले. सत्कारमूर्तींच्या वतीने कीर्तनकार महेशबुवा काणे यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आशीष आठवले यांनी केले. केंद्रसंचालक डॉ. मराठे यांनी आभार मानले.









कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड