कोकणातील फिनोलेक्स अ‍ॅकॅडमी एकमेव

रत्नागिरी : टाइम्स ऑफ इंडियामार्फत घेण्यात आलेल्या “टाइम्स इंजिनिअरिंग रॅकिंग २०२२” सर्वेक्षणात रत्नागिरीतील फिनोलेक्स अ‍ॅकॅडमी ऑफ मॅनेजमेंट अँड टेक्नॉलॉजी या अभियांत्रिकी महाविद्यालयाने संपूर्ण भारतामधील १७० उत्कृष्ट अभियांत्रिकी महाविद्यालयांच्या क्रमवारीत राष्ट्रीय पातळीवर १०९ वे स्थान पटकावले आहे. हे महाविद्यालय या क्रमवारीत कोकणातील एकमेव महाविद्यालय ठरले आहे.

भारतामधील उत्कृष्ट खासगी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या क्रमवारीत १०१ वे स्थान पटकावले आहे. महाराष्ट्रात २६ वे, तर मुंबई विद्यापीठात महाविद्यालयाने तेरावे स्थान पटकावले आहे.

टाइम्स ऑफ इंडिया ग्रुप दरवर्षी देशभरातील अभियांत्रिकी महाविद्यालयांचे मूल्यांकन करण्यासाठी सर्वेक्षण करते. या सर्वेक्षणाच्या आधारावर अभियांत्रिकी महाविद्यालयाचा दर्जा ठरवला जातो. त्यासाठी यावर्षी देशभरातील विविध अभियांत्रिकी महाविद्यालयांतून निवडक महाविद्यालयांचे सर्वेक्षण करण्यात आले. या सर्वेक्षणात मुख्यत्वे महाविद्यालयाची मूलभूत माहिती, पायाभूत सुविधा, प्रशिक्षित शिक्षकवर्ग, शैक्षणिक गुणवत्ता आणि प्रशासन, नोकरीतील संधी, विद्यार्थ्यांचा व्यक्तिमत्त्व आणि नेतृत्व विकास घडवण्यासाठी महाविद्यालयाकडून प्रयत्न, विद्यार्थ्यांना प्रदान केलेले शैक्षणिक वातावरण आणि शिक्षणातील स्रोत, ग्लोबल एक्सपोजर, महाविद्यालयाची माफक फी आणि औद्योगिक क्षेत्राशी महाविद्यालयाचा संपर्क या गोष्टींचा विचार करण्यात आला.

यापूर्वी या महाविद्यालयाला “नॅशनल एज्युकेशनल एक्सलन्स अवॉर्ड अँड कॉन्फरेन्स २०२१” मध्ये महाराष्ट्रासाठीचा “मोस्ट इनोव्हेटिव्ह अँड लीडिंग इंजिनीअरिंग कॉलेज” हा पुरस्कार मिळाला आहे. आहे. तसेच “द वीक – हंसा रिसर्च बेस्ट कॉलेज सर्वे २०२१” च्या सर्वेक्षणात खासगी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या क्रमवारीत राष्ट्रीय पातळीवर १४२ वे स्थान, खासगी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या क्रमवारीत भारताच्या पश्चिम विभागात राष्ट्रीय पातळीवर २३ वे स्थान आणि मुंबई विद्यापीठामध्ये पाचवे स्थान पटकावले होते. “आऊटलुक-आय केअर प्रोफेशनल कॉलेज सर्व्हे २०२१” च्या सर्वेक्षणात मुंबई विद्यापीठात द्वितीय स्थान मिळवले होते, तर भारतातील १०० उत्कृष्ट खासगी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या क्रमवारीत ७७ वे स्थान, महाराष्ट्रामधील उत्कृष्ट खासगी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या क्रमवारीत १३ वे स्थान पटकावले होते. “इंडिया टुडे उत्कृष्ट अभियांत्रिकी महाविद्यालय २०२१” या सर्वेक्षणात संपूर्ण भारतामध्ये १६० वे स्थान, तसेच महाराष्ट्रामध्ये २३ स्थान व मुंबई विद्यापीठात ६ वे स्थान पटकावले होते. झी न्यूज डॉट कॉम आणि इंडिया डॉट कॉम यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या सर्वेक्षणात “उत्कृष्ट अभियांत्रिकी महाविद्यालय (पश्चिम विभाग) २०२१” हा पुरस्कार प्राप्त झाला होता. तसेच या महाविद्यालयाला सीएएमआय असोसिएशन ऑल इंडिया आणि डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन ऑफ एज्युकेशन समिट यांच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आलेल्या १६ व्या इंटरनॅशनल कॉन्फरन्स आणि नॅशनल एज्युकेशन अवॉर्ड २०२१ मध्ये “एक्सलन्ट इंडस्ट्री इंटरफेस अवॉर्ड २०२१” हा पुरस्कार प्राप्त झाला होता.

या यशाबद्दल फिनोलेक्स अॅकॅडमीच्या अध्यक्षा श्रीमती अरुणा कटारा व प्राचार्य डॉ. कौशल प्रसाद यांनी सर्व प्राध्यापक आणि कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले.

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply