सर्वच शाळांमध्ये पहिल्या दिवशीच्या प्रवेशाचा जल्लोष

रत्नागिरी : रत्नागिरीसह जिल्ह्यातील बहुतेक सर्वच शाळांमध्ये ढोल-ताशांच्या गजरात आज शाळेच्या पहिल्या दिवशी प्रवेशोत्सव साजरा करण्यात आला.

परशुरामपंत अभ्यंकर प्राथमिक विद्यालयात नवागतांना गुलाबाची फुले देऊन स्वागत करण्यात आले. यानिमित्त शाळेच्या प्रवेशद्वारावर फुग्यांची आकर्षक सजावट करण्यात आली होती. दि न्यू एज्युकेशन सोसायटीच्या कार्याध्यक्ष अॅड. सौ. सुमिता भावे, मुख्याध्यापक विनोद नारकर, सहशिक्षक, पालक संघ प्रतिनिधींनी विद्यार्थ्यांचे स्वागत केले. ढोल-ताशांच्या गजरात विद्यार्थ्यांची मिरवणूक काढण्यात आली. ही मिरवणूक शाळेशेजारील अध्यात्म मंदिरात नेण्यात आली आणि पुन्हा दोन वर्षांनंतर शैक्षणिक वर्षाची सुरवात झाली. त्यामुळे आज विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांचा उत्साह द्विगुणित झालेला पाहायला मिळाला. (व्हिडिओ पाहा बातमीच्या शेवटी)

दि न्यू एज्युकेशन सोसायटीच्या आनंदीबाई प. अभ्यंकर बालकमंदिरामध्ये बच्चेकंपनीचे स्वागत जल्लोषात करण्यात आले. या वेळी प्रवेशद्वार फुगे, कार्टून्स लावून सजवण्यात आले होते. सनई-चौघड्याच्या रेकॉर्डवर मुलांचा शाळेत मंगलमय प्रवेश झाला. या वेळी शिक्षिका, सेविकांनी प्रवेश करणाऱ्या मुलांवर फुलांचा वर्षाव केला. प्रथमच बालवाडीत येत असल्याने काही मुले आपल्या आई-वडिलांना सोडायला तयार नव्हती. काही जण रडत होती. परंतु अनेक मुले आनंदाने व उत्साहाने वर्गात बसली. त्यांनी उड्या मारल्या, टाळ्या वाजवल्या. बाईंनी सांगितल्याप्रमाणे प्रार्थनासुद्धा सुरेख म्हटली. शाळेचा पहिलाच दिवस असल्याने आई-वडील आणि काहींचे आजी-आजोबासुद्धा मुलांना शाळेत सोडायला आले होते.

भारत शिक्षण मंडळाच्या कृष्णाजी चिंतामण आगाशे प्राथमिक विद्यामंदिरात आज शाळेच्या पहिल्याच दिवशी सर्व विद्यार्थ्यांचे जल्लोषी स्वागत करून पुस्तकांचे वितरणही करण्यात आले. पहिलीत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांची क्रीडांगणावरून ढोल-ताशांच्या गजरात मोठी मिरवणूक काढण्यात आली. फुलांची उधळण करण्यात आली. दोन वर्षांनंतर शाळा सुरू होत असल्यामुळे आणि मित्र-मैत्रिणी भेटल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये कमालाचे आनंदाचे वातावरण पाहायला मिळाले.

कार्यक्रमाला शाळा समिती अध्यक्ष डॉ. चंद्रशेखर केळकर, शाळा प्रबंधक विनायक हातखंबकर, कार्यकारिणी सदस्य अनंत आगाशे, चंद्रकांत घवाळी, चंद्रशेखर करंदीकर, धनेश रायकर, श्रीकृष्ण दळी, मुख्याध्यापिका सौ. प्राजक्ता कदम आणि सहशिक्षक, पालक प्रतिनिधी उपस्थित होते. पहिलीच्या वर्गांच्या शिक्षिका सौ. भारती खेडेकर, सौ. ईशा रायंगणकर आणि सोमनाथ दुकले यांनाही गुलाबपुष्प देऊन स्वागत केले. या वेळी शिक्षक सुधीर शिंदे यांनी पहिल्याच्या विद्यार्थ्यांना साभिनय गाणे शिकवले. मुख्याध्यापिका सौ. प्राजक्ता कदम यांनी विद्यार्थ्यांना सूचना सांगितल्या. तसेच शाळेच्या परंपरेविषयी माहिती दिली. संस्थेच्या गुरुकुलमधील मुलांनी उत्तम ढोल-ताशे वाजवून विद्यार्थ्यांचे स्वागत केले.

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply