सावरकरांनी सांगितलेला सांस्कृतिक राष्ट्रवाद जगवला पाहिजे : डॉ. अशोकराव मोडक

रत्नागिरी : कम्युनिस्ट, डाव्यांच्या रशियाला अजूनही युक्रेनवर निर्णायक विजय मिळवता आलेला नाही. दोन्ही देशांचे मूळ एकच आहे. परंतु परकीय निष्ठा सांगणाऱ्या कम्युनिस्ट राष्ट्रवादाचा पराभव होत आहे. त्याच वेळी वीर सावरकरांनी सांगितलेला सांस्कृतिक राष्ट्रवाद आजच्या काळात महत्त्वाचा आहे. तो आपण साऱ्यांनी जगवला पाहिजे, असे प्रतिपादन माजी आमदार डॉ. अशोक मोडक यांनी केले.

भाजपाचे प्रवक्ते माधव भांडारी यांनी लिहिलेल्या ‘डाव्यांचा खरा चेहरा’ या पुस्तकाचे प्रकाशन केल्यावर ते बोलत होते. रत्नागिरी जिल्हा नगर वाचनालयात झालेल्या १३ जून रोजी झालेल्या या कार्यक्रमाला श्री. भांडारी यांच्यासमवेत वाचनालयाचे अध्यक्ष अ‍ॅड. दीपक पटवर्धन, उपाध्यक्ष संतोष प्रभू, आनंद पाटणकर व्यासपीठावर उपस्थित होते.

डॉ. मोडक म्हणाले की, कम्युनिस्ट, डाव्यांनी भारतात गेली १०० वर्षे देशविघातक उद्योग केले. त्यावर सप्रमाण लिहिण्याची गरज होती. ती महत्त्वपूर्ण गरज श्री. भांडारी यांनी पुस्तकातून पूर्ण केली आहे. डाव्यांचे राजकारण घातक आहे. डाव्यांना भारताची १८ देशांत विभागणी करायची आहे. परंतु वीर सावरकरांवर वाट्टेल ते आरोप करण्याचे काम डाव्यांनी केले आहे. आज सावरकरांचाच सांस्कृतिक राष्ट्रवाद महत्त्वाचा आहे.

लेखक माधव भांडारी म्हणाले की, ‘देशाशी विश्वासघात, हिंसाचार, भ्रष्टाचार आणि परकीयांशी निष्ठा या चार गोष्टी डाव्यांनी आजपर्यंत केल्या आहेत. त्यांचे विचार ज्याला मान्य नाहीत, त्याला कुठेच जगण्याचा अधिकार नाही, अशी त्यांची विचारसरणी असते. डाव्यांनी इंग्रजांशी हातमिळवणी केल्याचे अनेक पुरावे पुस्तकात दिले आहेत. सावरकर रत्नागिरीत किंवा अंदमानात असताना कम्युनिस्टांनी मात्र इंग्रजांकडून आर्थिक फायदे घेऊन स्वातंत्र्य चळवळीला दगाफटकाकेला आहे. कॉम्रेड गंगाधर अधिकारी यांनी १९४० मध्ये भारत देश १८ राष्ट्रे असल्याचे आणि त्यांना स्वातंत्र्य देणे हे आमचे उद्दिष्ट असल्याचे प्रबंधात लिहिले होते. ते विधान अजून डाव्यांनी मागे घेतलेले नाही. तोच डाव्यांचा खरा चेहरा आहे. कम्युनिस्टांनी ब्रिटिशांकडून अनेकदा पैसे घेतले आहेत. त्याचे अनेक पुरावे उपलब्ध आहेत. हीच मंडळी वीर सावरकरांवर टीका करतात. अगदी अलीकडे काँग्रेसचे नेते राहुल गांधीही सावरकरांवर टीका करतात. त्यामागे डाव्यांची शक्ती आहे. ईडीच्या चौकशीला जाताना आपण सावरकर असल्याचे राहुल गांधी यांनी म्हटले आहे; पण सावरकरांना दोन रुपयांसाठीही चौकशीकरिता न्यायालयासमोर हजर राहावे लागले नव्हते; पण राहुल गांधींची ईडीने दोन हजार कोटींच्या फसवणुकीविषयी चौकशी लावली आहे. त्यामुळे त्यांनी सावरकरांवर बोलू नये.’

‘गांधी वेडेपणाने बडबड करतात. त्यामुळेच ते सोंग पांघरून बोलत आहेत. गांधी हे खानदान आहे, तर रा. स्व. संघ परिवार आहे. यांची तुलनाच होऊ शकत नाही. त्यांच्या वेडेपणाच्या मागे सुसूत्रपणा असल्याने ते सोंग पांघरून बोलतात. त्यांचे डावे सल्लागर सुचवतात तसे गांधी बोलतात. वीर सावरकरांना बदनाम करण्याचे षड्यंत्र डावे करत आहेत,’ अशी टीकाही श्री. भांडारी यांनी केली.
(कार्यक्रमाचे व्हिडिओज सोबत देत आहोत.)

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply