लांजा : एक आदर्श ग्रामसेवक ग्रामविकासाचा रथ किती उत्तम प्रकारे वाहू शकतो, याचा आदर्श जनसेवक सुधाभाऊ पेडणेकर यांनी सरकारी अधिकाऱ्यांसमोर ठेवला आहे, असे कौतुकोद्गार पद्मश्री परशुराम गंगावणे यांनी काढले.
लांजा शहरातील नवोदित लेखक, पर्यटन अभ्यासक विजय हटकर यांनी लिहिलेल्या “जनसेवक सुधाभाऊ” या पुस्तकाचे श्री. गंगावणे आणि महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियनचे राज्याध्यक्ष एकनाथ ढाकणे यांच्या हस्ते प्रकाशन झाले. त्यावेळी ते बोलत होते. ग्रामीण भागातील जनतेकडून ‘भाऊ’ या जवळीक साधणाऱ्या नावाने ओळखले जाणारे ग्रामसेवक गावोगावी कार्यरत असतात. केंद्र आणि राज्य सरकारच्या लोकहिताच्या अनेक योजना अडीअडचणीतील खेडेगावात आणि सामान्य ग्रामीण जनतेपर्यंत नेणारा तो महत्त्वाचा दुवा असतो. या पदाचे सामर्थ्य ओळखत ३१ वर्षाच्या सेवेत लोकहिताला सर्वोच्च प्राधान्य देतानाच सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या सुधाभाऊ जयराम पेडणेकर यांच्या सेवापूर्तीनिमित्त आयोजित केलेला सन्मान सोहळा आणि ग्रामसेवक स्नेहमेळाव्याचे औचित्य साधून या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले.

या वेळी व्यासपीठावर राजापूर लांजा तालुका नागरिक संघाचे अध्यक्ष सुभाष लाड, उल्काताई विश्वासराव, गटविकास अधिकारी संतोष म्हेत्रे, ग्रामसेवक युनियनचे जिल्हाध्यक्ष अनिल शिंदे, उपाध्यक्ष नाथा पाटील, रत्नागिरी जिल्हा ग्रामसेवक सहकारी पतसंस्थे संचालक अर्जुन नागरगोजे, डॉ. मंगेश हांदे, शिवाजी पेडणेकर, कोकणी माणूसचे संपादक राजेंद्रप्रसाद मसुरकर, माजी राज्य सचिव विजय खवळे, संदीप हांदे, संजय लोखंडे, गणपत शिर्के, महेंद्र साळवी, चेतन दाभोळकर, अरुण आपटे, लेखक विजय हटकर, किरण बेर्डे, प्रकाश हर्चेकर आदी उपस्थित होते.
लांज्यातील न्यू इंग्लिश स्कूल व तु. पुं. शेट्ये कनिष्ठ महाविद्यालयातकार्यरत असलेले विजय हटकर शैक्षणिक क्षेत्रासोबतच पर्यटन, इतिहास, पर्यावरण क्षेत्रात कार्यरत असून ‘मोडीदर्पण’ या दिवाळी अंकाचे कार्यकारी संपादक आहेत. नाटककार ला. कृ. आयरे, गुरुवर्य या दोन यशस्वी पुस्तकांनंतर विजय हटकर यांचे मुंबईतील ग्रंथमित्र प्रकाशन संस्थेद्वारे निर्मिलेले ‘जनसेवक सुधाभाऊ’ हे तिसरे पुस्तक आहे.
श्री. पेडणेकर यांच्या जीवनाचा आलेख मांडणाऱ्या या पुस्तकाचे महाराष्ट्रभर वितरण करून ग्रामसेवक ग्रामोद्धाराचे कार्य कशा पद्धतीने करत असतात, हे लोकांपर्यंत पोहोचवावे आणि ग्रामसेवकांना प्रतिष्ठा मिळवून देण्यासाठी लेखक विजय हटकर आणि प्रकाशक सुभाष लाड यांनी पुढाकार घ्यावा, असे ग्रामसेवक युनियनचे राज्याध्यक्ष एकनाथराव ढाकणे यांनी यावेळी सांगितले. जनसेवक सुधाभाऊंच्या ३१ वर्षांच्या निरपेक्ष वाटचालीचा गौरव करून नव्या पिढीतील ग्रामसेवकांनी सुधाभाऊंच्या पायवाटेवर चालत विकासाचा महामार्ग करावा, असे आवाहन त्यांनी केले.
कार्यक्रमाचे औचित्य साधून ग्रामसेवक स्नेहमेळाव्यात माजी सेवानिवृत्त ग्रामसेवक बंधू-भगिनी व ग्रामसेवकांच्या कर्तृत्ववान मुलांचा सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे निवेदन श्री. हटकर यांनी केले, तर आभार संजय लोखंडे यांनी मानले.
कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड