संगीत नाटकाची नव्याने नांदी!

अनेक दिग्गज कलाकारांनी अजरामर करून ठेवलेल्या संगीत सौभद्र नाटकाचं शिवधनुष्य पेलायला देवगडमधले १६ ते ३० या वयोगटातले कलाकार सज्ज झाले आहेत. त्यांचा पहिला प्रयोग शनिवार, ११ जून २०२२ रोजी होणार आहे.

मराठी माणसाचं पहिलं प्रेम संगीत नाटक! वसंतरावांच्या मुलाखतीत व. पु. म्हणाले ते अगदी खरं आहे. नाटक सुरू झाल्यावर प्रेयसीची जरी हाक आली तरी जाणार नाही तो मराठी माणूस.

फूटलाइट्सच्या प्रकाशात हुळहुळणारा मखमली पडदा पाहत प्रतीक्षा करणं हे त्याच्या प्रतीक्षेचं सार्थकच! नांदी सुरू झाल्यावर वधूवरांना अंतरपाट असह्य व्हावा, तसाच तो पडदा असह्य होतो अशी रसिकांची अवस्था असते!

व्यावसायिक संघांचे दौरे आर्थिक व्यवहार्यतेपोटी कमी झाले वा थांबले आणि शहरांबाहेरच्या मराठी माणसाची संगीत नाटकांसंदर्भात सांस्कृतिक उपासमार झाली आणि होतेही आहे. करोना काळात आवश्यक गरजांचा निकष लावत नाट्यगृह फक्त इमारती झाल्या आणि नटराजाचा हुंदका रंगपटातच गुदमरला.

बदलल्या काळानुसार काही अनुकूल गोष्टीही घडल्या. हौशी कलावंत आणि तंत्रज्ञानामध्ये व्यावसायिक दृष्टिकोन आला. अचूकपणा, वक्तशीरपणा यातील दर्जा वाढला आणि हौशी आणि व्यावसायिकातलं अंतर कमी होत संपलंही. गावोगावी असलेल्या मंचावरच्या आणि मंचामागच्या कलावंतांनी आपला दर्जा एवढा उंचावर नेला की रसिकांची व्यावसायिक दर्जाची अपेक्षा स्थानिक पातळीवरही पूर्ण झाली.

या पार्श्वभूमीवर देवगडचा विचार करता समृद्ध प्रेक्षागृह होतं, पण त्यांची भूक भागवणारा मंच नव्हता. पूर्वी देवगडमध्ये अनेक संगीत नाटकं व्हायची. २०१४ झाली संत गोरा कुंभार ही कलाकृती आर्ट्स सर्कल (देवगड) या संस्थेनं सादर केली. परंतु या अलीकडच्या काळात देवगडमधील रसिक अशा कलाकृतींची आतुरतेने वाट पाहत होते.

मिठबाव (देवगड) येथील स्वरसुधा क्रिएशन्स प्रस्तुत संगीत सौभद्र या नाटकाचा शुभारंभाचा प्रयोग ११ जून २०२२ रोजी वाडा (देवगड) येथील अ. कृ. केळकर हायस्कूलमध्ये पार पडतोय. सगळी तिशीच्या जवळपासची प्रतिभावान मुलंमुली दशक्रोशीनं मंचाला आणि नव्या संचाला या शहराने दिली. या संगीत सौभद्रच्या निमित्ताने देवगडमध्ये पुन्हा एकदा सांगीतिक विचार सुरू झाले. गंभीर रिहर्सल्स सुरू झाल्या. गाणी आणि संवादांच्या ऊनपावसानं श्रावणाची चाहूल लागली आणि रंगमंच पडदा लपवील एवढी तयारी झाली. वाद्यं ट्यून होऊ साथीला तयार आहेत. गळा आणि वाद्यं यातली एकतानता रियाजानं अद्वैत झालीत.

या संगीत नाटकाचं दिग्दर्शन श्रीराम कुलकर्णी (मुंबई) हे करीत आहेत. श्रीराम कुलकर्णी यांनी आजतागायत अनेक संगीत नाटकं आणि चित्रपटांचं दिग्दर्शन केलं आहे. अशा अनुभवी दिग्दर्शकाचा सहवास आणि मार्गदर्शन या मुलांना लाभणं ही केवळ दैवी देणगी..! या कलाकृतीसाठी संगीत मार्गदर्शन स्वप्नील गोरे आणि प्रसाद शेवडे यांनी केलं आहे. तसंच पार्श्वसंगीत आजच्या घडीचा उत्तम म्युझिक अॅरेंजर अमित पाध्ये करीत आहे. सर्व कलाकार १६ ते ३० या वयोगटातील असल्यानं ही अजरामर नाट्यसंपदा यांच्याकडून करून घेणं हे शिवधनुष्य पेलण्यासारखं होतं. परंतु या मुलांनी हे खूप छान पद्धतीने साकार करण्याचा प्रयत्न केला आहे. याचा अनुभव रसिकांना शुभारंभाच्या प्रयोगाच्या वेळी येईल. साथसंगतीला तबल्यावर अभिनव जोशी आणि ऑर्गनवर प्रसाद शेवडे आहेत. प्रकाशयोजना- अभिषेक कोयंडे, पार्श्वसंगीत संयोजन – आज्ञा कोयंडे, वेशभूषा- प्राची वाघ, स्मिता शेवडे आणि स्वरूपा सोमण अशी इतर महत्त्वाच्या कलाकारांची ओळख आहे.

आम्ही सर्वजण या शुभ प्रयोगासाठी अत्यंत आतुर आहोत आणि सर्व रसिकांना या संगीत नाटकाचा आस्वाद घेण्याचं आवाहन करतो.

  • प्रमोद जोशी, मयूर कुलकर्णी

संगीत सौभद्र हे नाटक आजपर्यंत अनेक प्रथितयश कलाकारांनी सादर केलं, परंतु युवा कलाकारांनी एकत्र येऊन हे शिवधनुष्य पेलणं प्रथमच रंगभूमीवर घडतंय, असं मला वाटतं. आम्ही देवगडचे रसिक हे पाहण्यासाठी अत्यंत उत्सुक आहोत. सर्वांना शुभेच्छा.. !

  • विलास पाध्ये, तबलावादक, देवगड

देवगडसारख्या ग्रामीण भागात संगीत सौभद्रसारखी अजरामर कलाकृती सादर होणं आणि तीही शाळा-कॉलेजमधल्या मुलांकडून, हे फारच कौतुकास्पद आहे. या सर्व टीमला भरपूर शुभेच्छा. याचे शतकोत्तर प्रयोग व्हावेत ही सदिच्छा..!

  • अॅड. सुमेधा देसाई, तळेबाजार

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply