धीरज वाटेकर यांची पर्यावरण जनजागृती कौतुकास्पद : शेखर निकम

चिपळूण : कोकणातील पर्यावरण चांगले असेल तर पर्यटक वाढणार आहेत. त्यामुळे सर्वांनी पर्यावरणाकडे जाणीवपूर्वक लक्ष देण्याची आवश्यकता आहे. धीरज वाटेकर यांच्याकडून त्यासाठी होणारी जनजागृती कौतुकास्पद आहे, असे प्रतिपादन चिपळूणचे आमदार शेखर निकम यांनी केले.

येथील लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिराने गेली पंचवीस वर्षे कोकणातील पर्यटन आणि पर्यावरण विषयात काम करणारे कार्यकर्ते आणि लेखक धीरज वाटेकर यांचा राज्यभरातील संस्थांनी केलेल्या सत्कारांच्या पार्श्वभूमीवर आमदार शेखर निकम यांच्या हस्ते चिपळूणकरांतर्फे सत्कार करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. श्री. निकम म्हणाले, समाजात चांगले काम करणाऱ्या व्यक्तींचा सत्कार करण्याची संधी लोकमान्य टिळक स्मारक वाचनालयामुळे मिळते. धीरज वाटेकर यांचा सत्कार हा आगळावेगळा आहे. त्यांचे पर्यटन-पर्यावरण विषयातील जन-जागृतीचे काम चांगले आहे. ते एकमेकांशी पूरक आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना पर्यटन-पर्यावरण विषयाकडे वळवण्याचे सुरू असलेले हे काम अधिक गतीने पुढे न्यावे. राज्यातील राजकीय वातावरण ढवळून निघालेले असतानाही वेळ दिलेली असल्याने या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहिल्याचे श्री. निकम यांनी सांगितले.

कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान चिपळूण पालिकेचे मुख्याधिकारी प्रसाद शिंगटे यांनी भूषविले. व्यासपीठावर ज्येष्ठ कवी आणि समीक्षक अरुण इंगवले, वाचनालयाचे कार्याध्यक्ष धनंजय चितळे, कार्यवाह विनायक ओक उपस्थित होते.

सत्काराला उत्तर देताना श्री. वाटेकर यांनी स्वतःला निसर्गशक्तीने ठरवून दिलेल्या कर्तव्याची पूजा बांधलेला मनुष्य म्हटले. भारतीय स्वातंत्र्याच्या सुवर्णमहोत्सवी वर्षात २५ वर्षांपूर्वी रत्नागिरीत ‘प्रतिभा संगम’ हे अभाविप आयोजित दुसरे युवा साहित्य संमेलन आयोजित केले होते. त्यानिमित्ताने सामाजिक जाणिवा जिवंत झाल्या. शिक्षण, करिअर आणि नोकरी या तीन भिन्न आघाड्या नसाव्यात, तर त्या एकमेकांना पूरक, आपल्या आंतरिक इच्छेला, सामाजिक प्रेरणेला, संवेदनेला सतत जागृत ठेवणाऱ्या असाव्यात, या भावनेतून आपण कार्यरत असल्याचे त्यांनी सांगितले. अभाविपनंतर लोकमान्य टिळक वाचनालय ही आपल्या जीवनातील दुसरी प्रयोगशाळा असल्याचे वाटेकर यांनी नमूद केले. ज्या कारणासाठी सत्कार झाला ते काम कोकणात असंख्य कार्यकर्ते-बंधू-भगिनी करत असल्याने अशा सर्वांना मी सत्कार समर्पित करतो, असे त्यांनी सांगितले. ‘विकसित व्हावे, अर्पित होऊनि जावे’ या विचाराने आपण कार्यरत होऊ या, अशी विनंती त्यांनी केली.

यावेळी प्रकाश देशपांडे यांना अमृतमहोत्सवी कारकिर्दीनिमित्त वाचनालयाकडून टॅब मोबाइल भेट देण्यात आला. कार्यक्रमाचे स्वागत आणि प्रास्ताविक धनंजय चितळे यांनी केले. या कार्यक्रमाच्या निमित्ताने वाचनालयाच्या कार्यकारिणीतील सदस्याचा जाहीर सत्कार करण्याचा योग आल्याचे चितळे यांनी नमूद केले. धीरज वाटेकर लेखन, संपादन, पत्रकारिता, वैशिष्ट्यपूर्ण निवेदनशैली आदी अष्टपैलू कामाचे त्यांनी कौतुक केले. पक्षी आणि पर्यावरणाविषयी असलेली संवेदनशीलता, हळुवारपणा लेखनातून सोशल मीडियावरील पोस्टमधून डोकावत असल्याचे चितळे यांनी सांगितले.

कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रसाद शिंगटे म्हणाले, ही अपरिचित कोकणची सफर अधिकाधिक लोकांना घडवून आणण्याची गरज आहे. कोकणातील वास्तूंमागील इतिहास उलगडण्याची आवश्यकता आहे. आपल्या आजूबाजूला असलेल्या ‘बारव’ उजेडात येणे गरजचे आहे. पर्यटन-पर्यावरण क्षेत्रात धीरज वाटेकर हे काम करत असून ते कौतुकास्पद असल्याचे शिंगटे यांनी नमूद केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. अंजली बर्वे यांनी केले. आभार कार्यवाह विनायक ओक यांनी मानले. यावेळी ग्लोबल चिपळूण पर्यटन संस्थेचे चेअरमन श्रीराम रेडीज, कृषीतज्ज्ञ संजीव अणेराव, ‘जलदूत’ शाहनवाज शाह, वसंतराव चौगुले पतसंस्थेचे मॅनेजर विश्वास पाटील, निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळाचे राज्य कार्याध्यक्ष विलास महाडिक, वन्यजीव अभ्यासक मल्हार इंदुलकर, सर्पमित्र अनिकेत चोपडे, लेखक रवींद्र गुरव, कथाकार संतोष गोनबरे, लेखिका संध्या साठे-जोशी, सरोज नेने, भाषाशास्त्राचे अभ्यासक मच्छिंद्रनाथ वाटेकर, अलोरे हायस्कूलचे मुख्याध्यापक विभाकर वाचासिद्ध, माजी मुख्याध्यापक अरुण माने, शशिकांत वहाळकर, आरोग्यम लबोरेटरीचे डॉ. तेजानंद गणपत्ये, डॉ. शामकांत गजमल, महंमद झारे, न्यू कोकण दीपचे संपादक सज्जाद काद्री, सायकलदूत कैसर देसाई, हॉटेल व्यावसायिक प्रसाद काणे, संजय सुर्वे, सुधाकर घोटगे, शाहीर राष्ट्रपाल सावंत, डॉ. रेखा देशपांडे, सुनील टेरवकर, वाटेकर यांचे कुटुंबीय आणि वाचनालयाचे संचालक उपस्थित होते.

अपरिचित कोकणची दृक्श्राव्य सफर

धीरज वाटेकर यांनी यावेळी दृक्श्राव्य माध्यमातून ‘अपरिचित कोकणची सफर’ घडविली. कोकणातील अप्रतिम शिल्पे, गडकोट, मंदिरे हा सारा ठेवा गतकाळातील पूर्वजांच्या कर्तृत्वाने मन मोहरून यावे, असा असल्याने आपण कोकणच्या गतवैभवाचा, इतिहासाचा अभिमान बाळगू या आणि काम करू या, असे ते म्हणाले. ८२ पॉवरपॉइंट स्लाइड्सद्वारे त्यांनी श्रावण कृष्ण त्रयोदशी या कोकण क्षेत्रनिर्मिती दिनापासून कोकणातील निसर्गस्थाने, वाशिष्ठी उगम ते संगम उपक्रम, तिलारी-दोडामार्ग-खडपडे-कुंभवडे-चौकुळ-आंबोलीचे जैवविविधतेने परिपूर्ण निसर्ग वैभव, ३६५ दिवस आंबोली संकल्पना, रौद्रभीषण निसर्गनवल ८०० फूट उंचीचा भीमाची काठी सुळका, तिवरे ते मालदेव व्हाया बैलमारव घाट, कुंभे निजामपूर बोगदा परिसर निसर्ग, कोकणातील सागरकिनारे, हेदवीची समुद्रघळ, मालवण आणि रत्नागिरी येथील स्कुबा डायव्हिंग, त्सुनामी आयलंड (मालवण), कोकणातील खाडी किनाऱ्यावर असलेले वैशिष्ट्यपूर्ण किनारी आणि सागरी दुर्ग, १६६१ ला छत्रपती शिवाजी महाराजांनी घनदाट अरण्यात गनिमी कावा तंत्राचा अवलंब करून कारतलबखानाच्या नेतृत्वाखालील मुघल सैन्याचा पराभव केलेली उंबरखिंड, कोकणात ६४ नद्यांच्या खोऱ्यात असलेल्या ४२ रमणीय खाड्या, कोकण आणि देश यांना जोडणारे घाट रस्ते, धबधबे, पाऊस, सडा : कोकणातील एक वैशिष्ट्यपूर्ण परिसंस्था, कमळतळी, तळकोकणातील धरणे, कोकणातील संग्रहालये, प्राचीन विहिरी, मानवी संस्कृतीचे मूळ शोधण्याचा प्रयत्न करणारी कातळशिल्पे, कोकणातील जलमंदिरे, गुहा मंदिरे, देवराया, दगडी पार, पोर्तुगीज घंटा, वारूळ देवता, किमान हजार वर्षेपूर्व मूर्तिकला, लाकडावरील कोरीव काम, जलसंचयन पद्धती, कोकणी श्रद्धा, कोकणातील अष्टविनायक, बारव, दर्गे-मशीद, पारंपरिक मासेमारी, सागरी महामार्गाचे सौंदर्य, अश्मयुगकालीन गुहा, जंगलातील दुभंगलेल्या मूर्ती, मिठागरे, हेरिटेज होम, कोकणातील उत्सव, कोकणातील माणसे, वाचनालये आणि माध्यमांची परंपरा आदी कोकणातील अपरिचित मुद्द्यांचा ऊहापोह वाटेकर यांनी आपल्या सादरीकरणात केला.

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply