हाती केवळ एक शून्य!

महाराष्ट्रातील सध्याच्या राजकारणाच्या पार्श्वभूमीवर कवी विंदा करंदीकर यांची तेच ते आणि तेच ते ही कविता नेहमीच आठवते. रोज नवे काही घडत असल्याचे भासत असले तरी त्यात फारसे काही वेगळे नसते. खरोखरीच रोज तेच दळण दळले जात असते. त्यातून बाहेर पडणारे पीठ म्हणजे एक मोठे शून्य असते. सर्वसामान्यांच्या हाती तेच फक्त लागते. लोकशाहीचे उत्सव म्हणून निवडणुका होतात. लोक आपले प्रतिनिधी निवडून देतात. त्यांनी चांगला राज्यकारभार करावा, अशी अपेक्षा असते. पण तसे होत नाही. सत्तेच्या खुर्च्यांवर जाऊन पोहोचण्यासाठी एक शिडी म्हणून लोकशाहीमधील निवडणुकांचा उपयोग केला जातो. सर्वसामान्य जनता हा त्यातला एक महत्त्वाचा भाग असतो. पण त्यांची किंमत एका मतापुरती असते. अशी अनेक मते मिळवून त्यांच्यासाठीच राज्यकारभार करत असल्याचे पालुपद आळवून शेवटी स्वतः, स्वतःचा पक्ष, त्यातील नेते, त्यांचे हित, आपले हित जपले जाते. त्यापलीकडे लोकशाहीला काहीच किंमत उरत नाही. लोकशाही क्षणाक्षणाला पायदळी तुडवली जात असते. तरीही त्याला लोकहिताचा मुलामा दिला जातो. महाराष्ट्राच्या राजकारणात आजच्या घडीला हेच होत आहे.

स्थापनेच्या पहिल्या दिवसापासूनच स्वतःला सतत स्थिर आणि चिरंतन समजणारे महाराष्ट्रातील महाविकास आघाडीचे सरकार अस्थिर आहे. निवडून आलेल्या प्रत्येकाला सत्तास्थान भूषविण्याचा अधिकार लोकशाहीने दिलेला आहे. पण त्यातही लोकशाहीत आकड्यांना महत्त्व असते. त्यावरच राज्यकर्ते ठरत असतात. त्या न्यायाने महाविकास आघाडी अस्तित्वात आली. राज्य करू लागली. पण पायाच अस्थिर असल्यामुळे त्यातील प्रत्येक घटक अस्वस्थ होता. त्यातूनच निष्ठा आणि गद्दारी हे शब्द सातत्याने घोकले जाऊ लागले. अर्थातच तेही सापेक्ष होते. निष्ठावान आणि गद्दार एकमेकांच्या बाबतीत हाच शब्दप्रयोग करत होते. शक्य असेल तेथे कुरघोड्या करण्यात आल्या, पण असा एक निर्णायक क्षण आला की त्यावरही मात झाली. गटबाजीला थारा नाही, थारा देऊ नये, असे म्हणत म्हणत शेवटी एक स्वतंत्र गट निर्माण झाला. अस्थिर महाराष्ट्रात स्थिर राहण्याची शक्यता वाटत नसल्यामुळे तो गुजरातमध्ये गेला, तेथून आसामपर्यंत पोहोचला. इकडे मग भावनिक आवाहन केले गेले. ते करतानाही आणि मिनतवारीचा आव आणतानाही त्यांनी माझ्याकडे यावे, माझ्यासमोर झुकावे ही मग्रुरी कायम राहिली. ती मनात ठेवून वर्षावरचे गडकरी मातोश्रीवर परतले. क्षणाक्षणाला या खेळाची दृश्ये माध्यमांवरून घरोघरी पोहोचत आहेत. त्यातून नक्की काय निष्पन्न होईल, गद्दारी शमेल का, तथाकथित बंड मिटेल का, बंडखोर माघारी परततील का, की नवा स्वामी नक्की होईल, नवी स्वामीनिष्ठा जन्माला येईल, हे काहीच आताच्या क्षणाला सांगता येणार नाही. कारण हा कधीही न संपणारा खेळ आहे.

या साऱ्यांना आपण, सर्वसामान्य नागरिकांनी निवडून दिले आहे. आपण नेमके काय केले आहे? काय करतो? इलेक्ट्रॉनिक मतपेटीच्या गोल बटणावर म्हणजे शून्यावर बोट दाबून आपणच आपल्याला अंगठा दाखवत असतो. त्यातून फारसे काही निष्पन्न झालेले नाही, हे आपल्याला फार उशिरा समजते. आपण हतबल होतो. राजकारण्यांच्या खेळामध्ये पाच वर्षांनी एकदाच खेळल्यानंतर फेकून देण्याच्या लायकीची प्यादी म्हणूनच आपला उपयोग झाला आहे, हे आपल्याला समजत असते. खेळ त्यांचा होतो. आपला जीव जातो. ते पाहायला त्यांच्याकडे वेळ नसतो. अशा स्थितीत आपण काहीही करू शकत नाही. विंदा करंदीकरांची कविता आपण जगत असतो, सकाळपासून रात्रीपर्यंत तेच ते!! तेच ते!! आपल्या हाती केवळ एक शून्य असते!

  • प्रमोद कोनकर
    (संपादकीय, साप्ताहिक कोकण मीडिया, २४ जून २०२२)

    (साप्ताहिक कोकण मीडियाचे अंक डाउनलोड करण्यासाठी, तसेच मागील संग्राह्य अंक वाचण्यासाठी ई-मॅगझिन विभागाला भेट द्या. त्यासाठी येथे क्लिक करा.)
Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply