लोकमान्य टिळक स्मारक, चिपळूण पालिकेतर्फे स्फूर्तिगीत स्पर्धा

चिपळूण : येथील लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिर आणि चिपळूण नगरपालिकेच्या वतीने भारतीय स्वातंत्र्याला पंच्याहत्तर वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने स्फूर्तिगीत स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.

स्वातंत्र्यसमरातील स्फूर्तिगीते पुन्हा एकदा गर्जावीत म्हणून ही विशेष स्पर्धा करण्यात आली आहे. भारताच्या स्वातंत्र्यचळवळीत अनेक शाहिरांनी, कवींनी स्फूर्तिगीते लिहिली होती. क्रांतिकारक हीच स्फूर्तिगीते गात आंदोलनात सहभागी होत असत. बंकिमचंद्र चटर्जींनी लिहिलेले ‘वंदे मातरम्’ हे स्फूर्तिगीत राष्ट्राला प्रेरणा देणारे गीत ठरले होते. साने गुरुजी, स्वातंत्र्यवीर सावरकर, तुकडोजी महाराज, कुसुमाग्रज, कवी गोविंद इत्यादींच्या मराठी भाषेतील कविता आणि प्रेमधवन, महंमद इक्बाल, प्रदीप, भरत व्यास यांच्या हिन्दी कवितांनी त्याकाळी जनमन जागृत केले होते. अशा स्फूर्तिगीतांची ही चिपळूण शहर मर्यादित ही स्पर्धा खुल्या गटासाठी असणार आहे.

स्पर्धकांना आवश्यक संगीत साथीदार संयोजक संस्था उपलब्ध करून देणार आहेत. स्पर्धेत स्वरचित गीते गाता येणार नाहीत. या स्फूर्तिगीत स्पर्धेतील विजेत्यांना अनुक्रमे एक हजार, ७५०, ५०० रुपयांची पारितोषिके देण्यात येतील. परीक्षकांचा निर्णय अंतिम राहील.

स्पर्धकांनी आपली नावे शुक्रवार, १२ ऑगस्ट रोजी सायंकाळी ५ वाजेपर्यंत लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिर येथे नोंदवावीत. स्पर्धक स्फूर्तिगीतांसाठी लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिराशी संपर्क साधू शकतात.

स्फूर्तिगीत स्पर्धेत अधिकाधिक स्पर्धकांनी आपला सहभाग घ्यावा, असे आवाहन वाचनालयाचे कार्यवाह विनायक ओक यांनी केले आहे.

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply