हुतात्मा केशव महादेव जोशी यांच्या तैलचित्राचे रविवारी चिपळूणला अनावरण

हुतात्मा केशव महादेव जोशी

चिपळूण : खानू (ता. रत्नागिरी) येथील क्रांतीवीर केशव महादेव जोशी यांच्या तैलचित्राचे अनावरण येथील लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिराच्या कलादालनात येत्या रविवारी उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या हस्ते होणार आहे. रत्नागिरीच्या गोगटे-जोगळेकर महाविद्यालयाचे इतिहासाचे प्राध्यापक आणि अभ्यासक पंकज घाटे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असतील.

केशवराव जोशी शिक्षण पूर्ण होताच रत्नागिरीत कलेक्टर कचेरीत नोकरीला लागले होते. पहिल्या महायुद्धात कार्यालयीन कामात तत्परता दाखवल्यामुळे त्यांना बढती मिळून ते राजापूर येथे मामलेदार झाले होते. नंतर १९३० साली त्यांची बदली पनवेलला झाली होती. त्यावेळी स्वातंत्र्य आंदोलनाला धार आली होती. पनवेल तालुक्यात कल्हे आणि चिरनेर येथे ८ सप्टेंबर १९३० रोजी देशभर गाजलेला जंगल सत्याग्रह झाला. पोलिसांनी मामलेदार केशवराव जोशी यांच्याकडे गोळीबार करण्याची परवानगी मागितली. केशवरावांनी ठामपणे नकार दिला. २५ सप्टेंबरला चिरनेरलाच दुसरा सत्याग्रह ठरला. दोन-तीन हजार सत्याग्रहींनी प्रतीकात्मक सत्याग्रहाची सुरवात केली. पोलिस इन्स्पेक्टर पाटील फौजफाटा घेऊन धावले. सत्याग्रहींवर अमानुष लाठीहल्ला केला. मामलेदार जोशी सत्याग्रहाच्या स्थानी आले. त्यांनी लाठीमार बंद करून बेड्या काढायचा आदेश दिला. सत्याग्रही मामलेदाराच्या आदेशानुसार तोडलेल्या झाडासह आणि कोयते घेऊन अटक करून घ्यायला अक्कादेवीच्या देवळाजवळ येऊ लागले. मामलेदार जोशी पाणी पिण्यासाठी जवळच्या विहिरीकडे गेले आणि ती वेळ साधून पोलीस इन्स्पेक्टरने अचानक सत्याग्रहींवर गोळीबार करण्याचा आदेश दिला. गोळ्यांनी अनेकांचे प्राण घेतले. अनेकजण जखमी झाले. मामलेदार जोशी पोलिसांना आवरण्यासाठी पुढे धावले. मात्र इन्स्पेक्टर पाटील याने झाडाआडून मामलेदारांवरच गोळी चालवली. गोळी पाठीत घुसून छातीतून बाहेर आली. त्यांच्याजवळ उभा असलेल्या शेवडे नावाच्या राऊंडगार्डही ठार मारण्यात आले. स्वातंत्र्य आंदोलनाला सहकार्य करणाऱ्या केशवराव जोशी यांची हत्या करण्यात आली. चिरनेरला असलेल्या हुतात्मा स्मृतिस्तंभावर त्यांचे नाव आहे.

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त कोकणातील ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिकांची तैलचित्रे चिपळूणचे लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिर लावणार आहे. यापूर्वी दिनकरशास्त्री कानडे यांचे तैलचित्र वाचनालयात लावण्यात आले आहे. आता जोशी यांचे तैलचित्र लावण्यात येणार आहे. केशव महादेव जोशी यांचे खानू हे गाव उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या मतदारसंघात येते. ते औचित्य साधून त्यांच्या हस्ते जोशी यांच्या तैलचित्राचे अनावरण वाचनालयाच्या बाळशास्त्री जांभेकर सभागृहात सायंकाळी साडेपाच वाजता होईल. हुतात्मा केशव महादेव जोशी यांना मानवंदना देण्यासाठी या कार्यक्रमाला बहुसंख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन वाचनालयाचे अध्यक्ष डॉ. यतीन जाधव, कार्याध्यक्ष धनंजय चितळे, कार्यवाह विनायक ओक यांनी केले आहे.

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply