डॉ. अलका देव-मारुलकर यांची रत्नागिरीत शास्त्रीय संगीत कार्यशाळा

डॉ. अलका देव-मारुलकर

रत्नागिरी : विदुषी डॉ. अलका देव-मारुलकर यांची शास्त्रीय संगीत कार्यशाळा येथील स्वराभिषेक संस्थेतर्फे येत्या २ ऑक्टोबर रोजी आयोजित करण्यात आली आहे. सिंधुदुर्ग, कोल्हापूर, गोवा, रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्यापुरती ही कार्यशाळा मर्यादित आहे.

ज्येष्ठ शास्त्रीय गायिका विदुषी डॉ. अलका देव-मारुलकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपांत्य आणि विशारद अभ्यासक्रमातील काही रागांच्या बंदिशी व वेगवेगळ्या तालानुसार त्यांची मांडणी या विषयावर या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. येथील ‘स्वराभिषेक-रत्नागिरी’ संगीतवर्गातर्फे येत्या २ ऑक्टोबरला शास्त्रीय संगीतातील उपांत्य विशारद आणि त्यापुढील शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी तसेच संगीत शिक्षकांसाठी ही कार्यशाळा असेल. रत्नागिरी, सिंधुदुर्ग, गोवा, कोल्हापूर आणि रायगड आदी ठिकाणचे विद्यार्थी, शिक्षक यामध्ये सहभाग घेऊ शकतात.

विदुषी डॉ. मारुलकर यांना संगीत शिरोमणी, डॉ. प्रभा अत्रे, संगीत कौमुदी आदी पुरस्कारांनी गौरवण्यात आले आहे. त्यांनी जयपूर, ग्वाल्हेर आणि किराणा घराण्याच्या मिलाफातून समग्र गायकी प्रस्थापित केली आहे. आपल्या वैशिष्ट्यपूर्ण गायनाने देश-विदेशातील रसिकांची मने जिंकली आहेत. शास्त्रीय गायनाबरोबरच उपशास्त्रीय गायनातही त्यांचा हातखंडा आहे. अशा या ज्येष्ठ संगीततज्ञांचे मार्गदर्शन ही विद्यार्थ्यांकरिता एक पर्वणीच आहे. रत्नागिरी येथील थिबा पॅलेसजवळील श्री गगनगिरी महाराज आश्रमाच्या सभागृहात २ ऑक्टोबरला सकाळी साडेनऊ ते सायंकाळी साडेपाच या वेळेत कार्यशाळा होईल. सहभागी विद्यार्थ्यांना चहा-नाश्ता, दुपारचे जेवण याची व्यवस्था करण्यात येणार आहे.

इच्छुकांनी अधिक माहितीसाठी २६ सप्टेंबरपर्यंत 8888298439 या मोबाइल क्रमांकावर संपर्क साधावा. तसेच नावनोंदणी करावी आणि शुल्क भरून आपला सहभाग निश्चित करावा, असे आवाहन ‘स्वराभिषेक’तर्फे करण्यात आले आहे.

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply