आरएचपी फाउंडेशनकडून दिव्यांगाला व्हीलचेअर

रत्नागिरी : दिव्यांगांच्या मदतीसाठी रत्नागिरी हॅंडीकॅप पॅराप्लेजिक फाउंडेशनने लाईक इब्राहीम बुरोंडकर (बुरोंडी, ता. दापोली) यांना व्हीलचेअरची उपलब्ध करून दिली.

आरएचपी फाउंडेशन विविध कार्यक्रम, उपक्रम राबवीत असते. जिल्ह्यात अजूनही अनेक दिव्यांगांना सहकार्याची आवश्यकता आहे. जसजशी माहिती मिळते त्याप्रमाणे फाउंडेशन समाजातील देणगीदारांच्या मदतीने, प्रसंगी पदरच्या निधीतून योगदान देत असते. अशाच प्रकारची एक मदत बुरोंडीचे बुरोंडकर यांना करण्यात आली.

बुरोंडकर यांना वयाच्या चौथ्या वर्षी भरपूर ताप आला होता. त्यानंतर त्यांच्या उजव्या पायाला पोलिओ झाला. त्यामुळे ते गुडघ्यावर हात ठेवून चालायचे. ते दिव्यांग असूनही चांगल्या प्रकारे आयुष्य जगत होते. ते स्वतः दिव्यांग असले तरीही तालुक्यातील इतर दिव्यांगांना दिव्यांग प्रमाणपत्र काढण्याचा अर्ज भरून द्यायचे. त्यांच्यासोबत रत्नागिरीत जिल्हा शासकीय रुग्णालयामध्ये यायचे. तेथे हे प्रमाणपत्र काढून देण्यास मदत करत होते. त्यांची पत्नी सुरैय्या बुरोंडकर मिळेल ते घरकाम करून संसाराला हातभार लावतात. त्यांना दोन मुले आहेत. मोठी मुलगी सबा बारावीत असून मुलगा मुद्दशीर आठवीत आहे.

पाच वर्षांपूर्वी बुरोंडकर यांना मधुमेहाचा त्रास सुरू झाला. त्यामुळे त्यांच्या डाव्या पायाला जखम झाली, शासकीय रुग्णालयात त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. परंतु जखम लवकर बरी न झाल्याने गॅंगरीन होऊन पुन्हा खासगी रुग्णालयात फेब्रुवारी २०२१ मध्ये डावा पाय गुडघ्याच्या वरपासून काढावा लागला. त्यासाठी सुमारे ८० हजार रुपये खर्च झाला. नातेवाईक, मित्रपरिवाराकडून आणि रमजान ईदमध्ये मिळणारी मदतीतून त्यांनी तो खर्च भागवला. परंतु मोठे कर्जही काढावे लागले. डावा पाय काढल्यामुळे त्यांचे चालणे पूर्णपणे बंद झाले. घरामध्येच बिछान्यावर आयुष्य घालवायची वेळ आली.

आरएचपी फाउंडेशन संस्थेला ही माहिती मिळाली. फाउंडेशनने आसपास लोकांकडूनही माहिती मिळवली आणि बुरोंडकर यांना व्हीलचेअर देण्याचे ठरवले. बुरोंडकर यांना व्हीलचेअर मिळाल्याने त्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला. आता त्यांना व्हीलचेअरवरून बाहेर फिरता येऊ लागल्याने त्यांच्या आयुष्याला नवीन उभारी आली आहे. त्यामुळे ते पुढील आयुष्य खूप आनंदाने, समाधानाने व्यतीत करू शकतील. पूर्ण कुटुंबसुद्धा आनंदी झाले आहे.

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply