मामलेदार केशव जोशींच्या देशप्रेमामुळेच वाचले चिरनेरचे सत्याग्रही

चिपळूण : ब्रिटिशांच्या नोकरीत असतानाही सत्याग्रहींवर गोळीबार करायचा नाही, असे आदेश देऊनही चिरनेर (जि. रायगड) येथे जंगल सत्याग्रहावेळी तेव्हाचा पोलिस इन्स्पेक्टर पाटील याने गोळीबार केला. त्याला अडवताना मामलेदार केशव जोशी त्याच्या गोळीला बळी पडले, पण त्यामुळे शेकडो सत्याग्रहींचे प्राण वाचले, असे प्रतिपादन संध्या साठे-जोशी यांनी केले.

येथील लोकमान्य टिळक स्मारक वाचनालयात हुतात्मा केशव जोशी हुतात्मा झाले त्या दिवसाचे औचित्य साधून त्यांच्या तैलचित्राचे अनावरण करण्यात आले. जोशी हे मूळचे खानू (ता. रत्नागिरी) येथील रहिवासी. उद्योजक सुरेश बेहेरे यांच्या हस्ते आणि जोशी कुटुंबीयांच्या उपस्थितीत त्यांच्या प्रतिमेचे अनावरण झाले. याप्रसंगी बोलताना त्यांच्या नातसून संध्या साठे-जोशी म्हणाल्या की, जोशी यांचे त्यांचे हौतात्म्य, देशप्रेमाचा हा आविष्कार एकाएकी आलेला नव्हता. ब्रिटिश चाकरीत असूनही त्यांचा पोशाख देशीच होता, ते मामलेदार असताना त्यांच्या दोन्ही मुली सरकारविरोधी निदर्शनात सामील होत. त्या दोन्ही कन्या वेळोवेळी होणाऱ्या पिकेटिंग, प्रभात फेऱ्या यामध्ये सामील असायच्या. वडील मामलेदार असताना मुलींनी सत्याग्रहात उतरणे हे त्यांच्या पाठिंब्याशिवाय शक्य नव्हते. मातृभूमीच्या प्रेमाचा जिवंत झरा त्यांच्या अंतःकरणात सतत वाहत होता. त्यामुळे देशभक्ती अंतःस्थ होतीच. ते गेले तेव्हा माझे सासरे चार वर्षांचे होते. त्यांनाही वडील फारसे आठवत नव्हते. पण त्यांना मोठ्या बंधूंकडून आणि त्यांच्याकडून आम्हाला हा वारसा कळला. आजोबा ब्रिटिश सरकारच्या नोकरीतही धोतर, सदरा कोट आणि डोक्याला रुमाल असा पारंपरिकच पोशाख परिधान करत असत.

त्या म्हणाल्या, २५ सप्टेंबर १९३० रोजी चिरनेर येथे जो जंगल सत्याग्रह झाला, त्यादिवशी मामलेदार म्हणून त्यांचे तालुक्याच्या ठिकाणी ट्रेझरी व्हेरिफिकेशनचे काम होते. ते पनवेललाही जाऊ शकले असते. तिकडे काय व्हायचे ते होऊ दे. आपण ट्रेझरी व्हेरिफिकेशनला जाऊ, असा विचार त्यांनी केला असता किंवा सत्याग्रहींना आवरण्यासाठी गोळीबाराची ऑर्डर दिली असती, तर आठ ऐवजी ऐंशी किंवा आठशे हुतात्मे झाले असते. चिरनेरच्या लोकांना आजही या गोष्टीची जाणीव आहे.

जे आदिवासी आणि कातकरी हुतात्मे झाले, त्यांचे पुतळे तेथे उभारले आहेत. आजोबा सरकारी नोकर होते म्हणून काही लोकांनी त्यांचा पुतळा बसवायला विरोध केला, याची खंत वाटते. त्यांनी जेथे देह ठेवला, तेथे त्यांचा पुतळा असावा, अशी आमची इच्छा भविष्यकाळात पूर्ण होईल, अशी अपेक्षा आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील एकमेव कला दालनात त्यांचे तैलचित्र लावले. त्याबद्दल लोकमान्य टिळक स्मारक वाचनमंदिर आणि देशपांडे सरांचे जोशी कुटुंबीयांच्या वतीने मी आभार मानते.

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply