उद्योजकांनी उलगडला यशापयशाचा प्रवास

रत्नागिरी : आपल्याला अनेक उद्योजक नेहमी भेटतात, त्यांना आपण मोठे झालेले पाहतो. पण त्यांना नेमके कोणते कष्ट घ्यावे लागले, याची माहिती नसते. अशा उद्योजकांचा खडतर प्रवास उलगडणारा आणि शासन व्यवस्थेकडून नेमक्या कोणत्या अपेक्षा आहेत, हे सांगणारा यू टॉक कार्यक्रम रत्नागिरीत रंगला.

महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सने रत्नागिरीत प्रथमच अशा उपक्रमाचे आयोजन केले. यात दापोलीतील पर्यटन उद्योजक सागर मोरे, फणसकिंग मिथिलेश देसाई, मैत्री ग्रुपचे कौस्तुभ सावंत, सुहास ठाकुरदेसाई, क्वालिटी प्रिंटर्सचे जितेंद्र जोशी यांच्या मुलाखती रंगत गेल्या. महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सने आयोजित केलेल्या कोकण उद्योग मंथन कार्यक्रमात या गप्पा झाल्या. मुंबई दूरदर्शनचे माजी सहायक संचालक जयू भाटकर यांनी उद्योजकांच्या मुलाखती घेतल्या.

अंबर हॉलमध्ये झालेल्या या कार्यक्रमात पर्यटन उद्योजक सागर मंगेश मोरे म्हणाले, आजोबांनी लॉजिंग, हॉटेलिंगचा व्यवसाय सुरू केला. आज तिसऱ्या पिढीत मी तो करतो आहे. हा व्यवसाय १२० ते १५० दिवसांचा आहे. तो वाढवण्याकरिता डेस्टिनेशन वेडिंगची थीम आणली. पत्नीनेही या व्यवसायात साथ दिली. अपेक्षा मांडताना मोरे म्हणाले की, कोकणात सीआरझेडची पुरेशी माहिती नाही. त्यामुळे प्रत्येक गावात जाऊन सरपंच, ग्रामस्थांना योग्य माहिती दिली पाहिजे. त्यामुळे किनारपट्टीवर व्यवसाय वाढत नाहीत. याबाबत चेंबर ऑफ कॉमर्समार्फत समस्या मांडून ती सोडवण्यासाठी प्रयत्न करू या. केंद्राचा सागरमाला प्रकल्प व्हायला हवा. त्यामुळे पर्यटन वाढेल.

लांज्यातील फणसकिंग मिथिलेश देसाई यांनी त्यांचा फणस उद्योजक म्हणून प्रवास उलगडून दाखवला. त्यांनी सांगितले की, राहुरीमध्ये मी सिव्हिल सर्व्हिसेस, नंतर दिल्लीत यूपीएससीच्या मेन्सपर्यंत जाऊन आलो. पण एकदा घरी आलो तेव्हा नोकरी करायची नाही, असे मी आणि वडिलांनी एकत्रितपणे चर्चा करून ठरवले. त्यामुळे माहिती घेत घेत फणस लागवड, नर्सरी उद्योगाकडे वळलो. आंबा, काजूपेक्षा फणस हे शून्य देखभाल खर्चामध्ये जास्त उत्पन्न देणारे पीक आहे. आम्ही आता मॉरिशसमध्ये ३०० रोपे निर्यात करणार आहोत. यापूर्वी १ टन पानेसुद्धा जर्मनीला पाठवले आहेत. अपेक्षा व्यक्त करताना ते म्हणाले की, शासनाच्या योजना बऱ्याच आहेत. पण त्यांची अंमलबजावणी होत नाही. याकरिता महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सच्या माध्यमातून योजना पोहोचवण्याचे काम करू. पत्नीला लग्नानंतर ग्रामीण जीवन जुळवून घेताना अडचणी आल्या, परंतु आता ती रुळली असून या व्यवसायात मदत करत असल्याचे मिथिलेश यांनी सांगितले.

मैत्री ग्रुपचे कौस्तुभ सावंत म्हणाले की, सुरवातीला नोकऱ्या केल्या. परंतु नंतर ६ मित्रांनी मिळून मैत्री ग्रुप स्थापन केला. त्यामार्फत केटरिंग सांभाळले, नंतर हॉटेल व्यवसाय, हॉल अशा व्यवसायात स्थिरावलो. आता मी व मित्र सुहास ठाकुरदेसाई हे सारे सांभाळत आहोत. डेस्टिनेशन रत्नागिरी होण्याकरिता आम्ही प्रयत्न करत आहोत. पर्यटक येथे राहण्याकरिता स्कुबा डायव्हिंग सुरू केले. हर्षा हॉलिडेजच्या माध्यमातून सहलींचे नियोजन करतो. आम्ही आमच्या व्यवसायापेक्षा रत्नागिरीचे मार्केटिंग जास्त करतो. सध्या १२० कर्मचारी काम करतात.

त्यालाच जोडून सुहास ठाकुरदेसाई म्हणाले, मी आधी गद्रे मरिन्समध्ये नोकरी करत होतो. परंतु गरजा वाढत असल्यामुळे व्यवसायात पडण्याचे ठरवले. मालक दीपकशेठ गद्रे यांना चहा पावडरच्या व्यवसायात पडत असल्याची कल्पना दिली. त्यावेळी त्यांनी चहाचे मार्केट, उधारी वगैरे सर्व माहिती विचारली आणि समजा काही जमले नाही तर पुन्हा कंपनीत येऊ शकतोस, असे सांगून आत्मविश्वास दिला. पण नंतर तिथून मागे वळून पाहिले नाही व मैत्री ग्रुपची सर्व जबाबदारी सांभाळत आहे. आज ते समोर बसले आहेत, त्यांच्याबद्दल खूपच कृतज्ञता वाटते. कौस्तुभ हा परफेक्शनिस्ट आहे व मी परफॉर्मर आहे. त्यामुळे नवनवीन व्यवसायात यशस्वी होत आहोत. पर्यटनासंबंधी व्यवसायांच्या परवानग्या कोणाकडे घ्याव्यात याची माहिती मिळावी आणि त्या एक खिडकीच्या माध्यमातून उपलब्ध व्हाव्यात, अशी मागणी त्यांनी केली.

जितेंद्र जोशी म्हणाले की, वडिलांचा रबर स्टॅंप बनवण्याचा व्यवसाय होता. त्यानंतर मीसुद्धा हळुहळू व्यवसाय छपाई, खोके बनवून उद्योग वाढवत नेला. नवीन संधी उपलब्ध होऊ लागल्या. दीड कोटी रुपयांचे कर्ज घेतले तेव्हा ७ वर्षांची मुदत होती आणि मी ते कर्ज ५ वर्षांत फेडले. माझ्या व्यवसायात १०० टक्के स्थानिक कर्मचारी आहेत. कौशल्य व बिगरकौशल्याचे आहेत. ते कामावर आल्यानंतर तिथली कार्यालयीन संस्कृती पाहूनच ते खूष होतात. त्यामुळे ते अधिक काम करतात. अपेक्षा व्यक्त करताना त्यांनी सांगितले की, रत्नागिरी जिल्ह्यात स्मॉल बिझनेस सेंटर सुरू करावे, शासनाच्या कर्ज योजना बॅंकेच्या शाखाधिकाऱ्यांना माहिती नसतात, त्याची माहिती वरिष्ठांनी दिली पाहिजे आणि जिल्हा उद्योग केंद्रातून नवउद्योजकांपर्यंत पोहोचवल्या पाहिजेत.

या कार्यक्रमाची संकल्पना आर्किटेक्ट संतोष तावडे यांनी मांडल्याचे आर्किटेक्ट मकरंद केसरकर यांनी सांगितले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली यू टॉक कार्यक्रमाची निर्मिती करण्यात आली. तसेच यापुढे उद्योग योग फोरमच्या माध्यमातून असे कार्यक्रम वारंवार आयोजित करण्यात येणार आहेत. तसेच युवकांसमोर उद्योजक कसे व्हावे, याची उदाहरणे आहेत. परंतु त्यांच्या मुलाखतीमधून जास्तीत जास्त नवउद्योजकांना माहिती मिळाली पाहिजे, हा यू टॉकचा हेतू आहे. याकरिता पर्यटन समिती सदस्य मिलिंद चाळके, सर्वजित संतोष तावडे आणि चेंबरच्या जिल्हा कार्यालयाच्या सर्वांचे सहकार्य लाभल्याचे केसरकर यांनी सांगितले.

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply