गोगटे-जोगळेकर महाविद्यालयात दिवाळी अंकांचे प्रदर्शन

रत्नागिरी : येथील गोगटे-जोगळेकर महाविद्यालयाच्या कै. बाबूराव जोशी ग्रंथालयात प्राचार्य डॉ. पी. पी. कुलकर्णी यांच्या हस्ते आज दिवाळी अंकांच्या प्रदर्शनाचे उद्घाटन झाले.

ग्रंथपाल किरण धांडोरे यांनी स्वागत केले, तर कार्यक्रमाचे प्रास्ताविक सहायक ग्रंथपाल उत्पल वाकडे यांनी केले. प्राचार्य डॉ. कुलकर्णी म्हणाले, दिवाळी अंक हा दिवाळी सणाचा आनंद द्विगुणित करणारा एक महत्त्वाचा घटक आहे. फराळासोबत दिवाळी अंक हाती असणे एक साहित्यिक पर्वणीच असते. कथा, कविता, वैचारिक लेख, ऐतिहासिक माहिती, गड-किल्ले, आरोग्य, अर्थ, सामान्य ज्ञान इत्यादी साहित्यप्रकार समोर ठेवून या अंकांची केलेली निर्मिती हा एक महत्त्वाचा वार्षिक दस्तऐवज आहे. यावर्षीचे दिवाळी अंक यादृष्टीने विविधांगी असून महाविद्यालयीन प्राध्यापक आणि विद्यार्थी यांना निश्चितच वाचनीय ठरतील, असा आशावाद त्यांनी व्यक्त केला.

कार्यक्रमाचे आभारप्रदर्शन वाचक गटाचा विद्यार्थी ओंकार आठवले याने केले. कार्यक्रमाला प्रशासकीय उपप्राचार्य डॉ. मकरंद साखळकर, विज्ञान शाखेच्या उपप्राचार्या डॉ. अपर्णा कुलकर्णी, कला शाखेच्या उपप्राचार्या डॉ. चित्रा गोस्वामी, ग्रंथालय समिती समन्वयक आणि संस्कृत विभागप्रमुख डॉ. कल्पना आठल्ये, महाविद्यालयीन प्राध्यापक, वाचक गटाचे विद्यार्थी, कनिष्ठ आणि वरिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते.


Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply