रत्नागिरी : चाळीसपेक्षा जास्त वर्षे एकांकिका, नाटक, मालिका, चित्रपट इत्यादींमध्ये अभिनय, निर्माता, लेखक, दिग्दर्शक, तंत्रज्ञ इत्यादी अनेक बाबतीत योगदान करणारे आणि १२८ पारितोषिके मिळविणारे रत्नागिरीतील ज्येष्ठ रंगकर्मी सुहास भोळे यांनी आपला जीवनप्रवास उलगडला.

गोळप कट्टाच्या छत्तिसाव्या कार्यक्रमात मान्यवर म्हणून ते बोलत होते. त्यांनी वयाच्या दुसऱ्या वर्षांपासूनच्या गोष्टी उलगडून सांगितल्या. ते म्हणाले, दुसऱ्या वर्षी घरी लपंडाव खेळताना खिडकीचा पडदा सरकून टाळ्या वाजल्या आणि तिथे पडद्याशी ऋणानुबंध कायमचे जुळले. गजातून हात-पाय दुसरीकडे टाकून मागे पडदा असा लपलो होतो. मारुती मंदिरजवळ राहत असताना शिवाजी क्रीडांगणाजवळील बालवाडीतून पहिल्या दिवशी पळून घरी आलो. मग शोधाशोध होऊन मला घराच्या पायरीवर झोपलेले पाहिले, ते माझ्या आयुष्यातील पहिले नाटक! आई शिक्षिका! त्यामुळे आईच्या शाळेत जावे लागले. पहिलीच्या वर्गात आई मुलांना शिकवत असे, ते टेबलवर बसलेल्या मलापण यायला लागले. पहिलीचा अभ्यास येतो म्हणून साडेचार वर्षाचा असताना एकदम पहिलीची परीक्षा दिली. हुशार होतो, दुसरीत गेलो. नंतर सहावीला पटवर्धन हायस्कूलला गेलो. तिथे इंग्रजी कळत नव्हते. कमी वयात शाळेत गेलो असल्याने बौद्धिक वयाची थोडी अडचण होऊ लागली होती.
श्री. भोळे म्हणाले, आठवीपासून अकरावी मॅट्रिकपर्यंत शिर्के हायस्कूलला आलो. एनसीसी नेव्ही घेतले होते. नेव्हीच आकर्षण होते. ड्रॉइंगवरून शाळेत झालेल्या अपमानामुळे कष्टाने, प्रयत्नाने ड्रॉइंग शिकलो. शाळेत अकरावीच्या मुलांना स्टेजवर जाऊन सुविचार आणि त्याचे स्पष्टीकरण सांगावे लागायचे. मनात भीती असल्याने माझी पाळी असेल तेव्हा मी दांडी मारायचो. एके दिवशी भा. भा. ठाकुरदेसाई सरांनी पकडले. स्टेजवर बोलवून सुविचार सांगायला पुढे ढकलले. नेहमी खरे बोलावे हे साळवी सरांनी सांगितलेले सुविचाराचे तीन शब्द बोलून धूम ठोकली. मॅट्रिकनंतर भाऊ सायन्सला होता, म्हणून मीही सायन्स घेतले. तिथे पहिल्या परीक्षेत फक्त गणित सोडून सगळ्या विषयात नापास झालो. गणित चांगले असल्याने मित्राच्या सांगण्यावरून पॉलिटेक्निकला यंत्रअभियंता ट्रेडसाठी प्रवेश घेतला.
ड्रॉइंग चांगले बनल्याने शिक्षणात रस निर्माण झाला, असे सांगून श्री. भोळे म्हणाले, तेथे एका एकांकिकेत मला घेतले. प्रत्यक्ष प्रयोगाला घाबरून विंगेत लपून बसलो होतो. मरीनर दिलीप भाटकर सरांनी मला स्टेजवर ढकलले. समोर प्रेक्षक बघून स्तिमित झालो होतो. पण सहकारी कलावंतांमुळे धीर आला. मला अभिनयाचे बक्षीस मिळाले. तिथे खेळात तसेच नेव्हीमध्ये भाग घेत होतो. नेव्हीच्या अखिल भारतीय समुद्री प्रशिक्षण शिबिराला देशातील बत्तीस जणांची निवड झाली होती त्यात आम्ही रत्नागिरीचे दोघे होतो. शिबिरातील पहिले आठ दिवस आयएनएस त्राता युद्धनौकेवर, मग आयएनएस कुठार युद्धनौकेवर, तर पुढचे आठ दिवस आयएनएस विक्रांत या विमानवाहू युद्धनौकेवर राहायला मिळाले. एक दिवस खान्देरी या पाणबुडीमध्ये राहायला मिळाले. हा आयुष्यातील अविस्मरणीय प्रसंग आहे. डिप्लोमा झाल्यावर नेव्हीमध्ये नोकरीसाठी निवड झाली होती. मात्र त्यांची पोहणे आले पाहिजे ही अट पूर्ण करू शकलो नाही. त्यामुळे नोकरी मिळाली नाही.
यानंतर जेके फाइल्स कंपनीत नोकरी लागली. तेथे शाम वेलणकर याने एका दिवसात पोहायला शिकवले. परंतु संधी निघून गेली होती. जेकेमध्ये विनयराज उपरकर, शेखर जोशी, राजू विलणकर, अजित पाटील यांच्यासारखे हौशी रंगकर्मी भेटले. एकांकिका करू लागलो. मग नाटक करू लागलो. लेखन, दिग्दर्शन, तंत्रज्ञ, निर्माता गरज भासेल तसे सगळे करत गेलो. अनेक एकांकिका, नाटके लिहून सादर केली. जिज्ञासा संस्था स्थापन केली. दहा वर्षे ‘जिज्ञासा करंडक’ स्पर्धा घेतल्या. त्यानिमित्ताने अनेक नामवंत कलाकारांचा सहवास मिळाला. विशेष क्षमतेच्या मुलांचे राष्ट्रीय पातळीवर सांस्कृतिक महोत्सव घेतले. बालनाट्य, राज्यनाट्य, कामगार स्पर्धासाठी परीक्षक म्हणून काम केले. एकदा कोल्हापूर सेंटरला ३७ नाटके होती. कंपनीत सुटी मिळत नव्हती. पहिली शिफ्ट मागून घेतली. रोज चारच्या मिरज गाडीने कोल्हापूरला जाऊन रात्री नऊ ते बारा नाटक पाहायचे. मग रात्री एकच्या गाडीने रत्नागिरीत. सकाळी पुन्हा कामावर हजर, असे केले. कारण परीक्षक म्हणून येतो हा शब्द दिला होता. एकूण कारकिर्दीत १२८ पारितोषिके, पुरस्कार मिळाले. हबीब तन्वीर राष्ट्रीय तसेच नुकताच मधुकर तोरडमल स्मृती ‘चतुरस्र कलावन्त’ पुरस्कार मिळाला, असे श्री. भोळे यांनी सांगितले.
यशाचा कानमंत्र देताना श्री. भोळे म्हणाले, जिद्दीने आयुष्यात काहीही शिकता येते. कष्टाने काहीही मिळवता येते. मनावर ताबा महत्त्वाचा. आयुष्यात मरीनर दिलीप भाटकर यांच्यासारखी असंख्य माणसे, आई-वडील यांच्यामुळे मी घडलो. पत्नी आणि दोन्ही मुली यांचा पाठिंबा यामुळे काहीतरी करू शकलो, असे श्री. भोळे यांनी सांगितले.
- अविनाश काळे
(संपर्क : ९४२२३७२२१२)

