दापोली : कोकणातील प्रथितयश साहित्यिक आणि दापोलीतील उपक्रमशील शिक्षक बाबू घाडीगावकर यांना काव्यप्रेमी शिक्षक मंचाचा काव्यप्रेमी प्रेरणा पुरस्कार सोलापूर येथे प्रदान करण्यात आला.
सोलापूर येथील इंडियन मॉडेल स्कूलच्या ए. डी. जोशी सभागृहात काव्यप्रेमी शिक्षक मंचाचा बारावा राज्यस्तरीय काव्योत्सव सोहळा मोठ्या दिमाखात पार पडला. त्यामध्ये राज्यभरातील दोनशेहून अधिक कवींनी सहभाग घेतला. या समारोहात साहित्य क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल बाबू घाडीगावकर यांचा काव्यप्रेमी प्रेरणा पुरस्कार देण्यात आला. सोलापूर आकाशवाणी केंद्राचे प्रमुख राजेंद्र दासरी यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
यावेळी काव्यप्रेमी शिक्षक मंचाचे राज्याध्यक्ष आनंद घोडके, राज्यसचिव कालिदास चवडेकर, ज्येष्ठ कवी, गीतकार राष्ट्रपाल सावंत, काव्यगुरू विजय जोशी, विद्यालयाचे माजी प्राचार्य ए. डी. जोशी, संदीप वाघोले, जया नेरे, पत्रकार भरतकुमार मोरे, काव्यप्रेमीचे कोषाध्यक्ष कृष्णा शिंदे, सोलापूर शहराध्यक्ष महेश रायखेलकर, सोलापूर जिल्हाध्यक्ष युवराज जगताप, पुणे विभागीय अध्यक्ष नवनाथ खरात आदी मान्यवर उपस्थित होते.
बाबू घाडीगावकर कोकणातील प्रथितयश साहित्यिक असून ते अनेक नवोदित साहित्यिकांना पुढे येण्यासाठी, लिहिते होण्यासाठी वैविध्यपूर्ण उपक्रमांचे आयोजन करीत असतात. त्यांच्या मार्गदर्शनाखाली कोकणातील अनेक नवोदित लेखक, कवी आणि शालेय विद्यार्थी कविता, कथा, लेखनाकडे वळले आहेत. कोकणातील विविध दैनिके, नियतकालिके आणि दिवाळी अंकांमधून श्री. घाडीगावकर यांचे साहित्य सातत्याने प्रसिद्ध होत असते. त्यांचा ‘बाबा’ हा कवितासंग्रह तर ‘वणवा’ हा कथासंग्रह प्रकाशित झाला असून त्यांना साहित्य क्षेत्रातील विविध संस्थांचे अनेक पुरस्कार मिळाले आहेत.


