रत्नागिरी : कार्तिकी एकादशी महोत्सव यंदा रत्नागिरीत जल्लोषात साजरा होणार आहे. एकादशीला ४ नोव्हेंबरपासून उत्सव चालू होणार असून १० नोव्हेंबरला सांगता होणार आहे. बाजारपेठ परिसरातील प्राचीन विठ्ठल मंदिरात उत्सवानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
एकादशीला ३ नोव्हेंबरच्या मध्यरात्रीनंतर १.३० वाजता विठ्ठल-रुक्मिणीची पंचसूक्त पवमानयुक्त महापूजा होणार आहे. यंदा या महापूजेचा मान संकेत मयेकर यांना मिळाला आहे. पूजेनंतर आरती होईल. सकाळी ६ वाजता काकडा आरती होईल. सकाळी ७ वाजल्यापासून दिवसभर विविध भजन मंडळे भजनाचा कार्यक्रम सादर करतील. कार्तिकीनिमित्त प्रतिवर्षाप्रमाणे ज्या भजन मंडळांना भजनसेवा करायची आहे, त्यांनी राजन फाळके यांच्याकडे २ नोव्हेंबरपर्यंत नावे नोंदवावीत, असे आवाहन विठ्ठल मंदिर देवस्थानने केले आहे. त्यानुसार वेळापत्रक बनवण्यात येणार आहे. एकादशीला सकाळी ११ च्या दरम्यान कै. दाजिबा नाचणकर यांनी सुरू केलेली पायी दिंडी भार्गवराम मंदिर ते विठ्ठल मंदिरापर्यंत काढण्यात येणार आहे. या दिंडीला अनेक वर्षांची परंपरा असून पारंपरिक वेशभूषेमध्ये टाळ-मृदंगांच्या गजरात, विठुरायाचे भजन म्हणत शेकडो वारकरी यात सहभागी होणार आहेत.
विठ्ठल मंदिरातून रात्री ११.३० वाजता विठुरायाचा रथोत्सव सुरू होईल. रथोत्सवाची पारंपरिक सवाद्य मिरवणूक चालू होईल. शुक्रवारी (दि. ५ नोव्हेंबर) पहाटे ५ वाजता श्री हरिहरेश्वर भेट (खालच्या आळीतील श्री तृणबिंदुकेश्वर मंदिरात) होईल. त्यानंतर सकाळी ६ वाजता काकडा आरती, कापूर आरती होईल. ८ नोव्हेंबरला विठ्ठल मंदिरात कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी सायंकाळी ६ वाजल्यापासून त्रिपूर पाजळले जातील. कार्तिक वद्य २ म्हणजे १० नोव्हेंबरला पहाटे ६ वाजता काकडा आरती, कापूर आरती होईल. सकाळी ९ वाजता मंदिरात भोवत्या, दिंडी होऊन कार्तिकोत्सवाची सांगता होणार आहे.
विठुरायाची नगरप्रदक्षिणा कार्तिक शुद्ध त्रयोदशीला रविवारी (दि. ६ नोव्हेंबर) दुपारी १ वाजता नगर प्रदक्षिणा काढण्यात येईल. ही प्रदक्षिणा रात्री १० वाजता मंदिरात परतेल. गोखले नाका, राधाकृष्ण नाका मार्गे धनजी नाका, गवळीवाडा, काशिविश्वेश्वर मंदिर, खडपे वठार, चवंडे वठार, मांडवी नाका, नाईक फॅक्टरीच्या लगतच्या रस्त्याने समुद्रावर नेण्यात येते. नंतर पालखीतील विठुरायाला समुद्रस्नान घडवले जाते. पेठकिल्ला, मुरुगवाडा, पांढऱा समुद्र, परटवणे नाका, भार्गवराम मंदिर, सावंतनगर, खालचा फगरवठार, परटवणे, वरचा फगरवठार, डीएसपी बंगला, चावडीवरून धनजी नाका, ,राधाकृष्ण नाका मार्गे विठ्ठल मंदिरात येणार आहे.
Follow Kokan Media on Social Media Follow Kokan Media on Social Media
