नवी मुंबई : नागपूर-विदर्भ, खान्देश ते कोकण प्रांत जोडणाऱ्या नागपूर जंक्शन ते मडगाव (गोवा) दरम्यान कोकण रेल्वेमार्गाने धावणाऱ्या विशेष रेल्वे गाडीला पुन्हा एकदा मुदतवाढ देण्यात आली असून आता ही गाडी ८ जूनपर्यंत धावणार आहे. विविध रेल्वे प्रवासी संघटनांच्या पाठपुराव्याला यश आले आहे.
विदर्भातून थेट कोकण रेल्वे मार्गावर येण्यासाठी रेल्वे गाडी नसल्यामुळे अशा गाडीची वारंवार मागणी होत होती. गर्दीचा हंगाम लक्षात घेऊन या मार्गावर विशेष गाड्यांचे नियोजन रेल्वेकडून करण्यात येते. दीपावली आणि नाताळच्या पार्श्वभूमीवर नागपूर ते मडगाव (गोवा) (०११३९/०११४०) ही आठवड्यातून दोनदा धावणारी गाडी आधी जानेवारी २०२३ पर्यंत, नंतर २६ फेब्रुवारी २०२३ पर्यंत विस्तारित करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. आता पुन्हा एकदा गाडीला ८ जूनपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.
ही गाडी १ मार्च ते ७ जून या कालावधीत दर बुधवार व परतीच्या प्रवासात २ मार्च ते ८ जूनपर्यंत दर गुरुवार आणि रविवारी ही गाडी धावेल. एकूण २२ डब्यांच्या या गाडीला वर्धा, पुलगाव, धामणगाव, वडनेरा, अकोला, शेगाव, मलकापूर, भुसावळ, नाशिक, इगतपुरी, कल्याण, पनवेल, रोहा, खेड, चिपळूण, संगमेश्वर, रत्नागिरी, राजापूर, कणकवली, कुडाळ, थिवी आणि करमळी या स्थानकांवर थांबे आहेत.
Follow Kokan Media on Social Media



