नवी मुंबई : नागपूर ते मडगाव मार्गावर धावणाऱ्या विशेष रेल्वे गाडीला ऑक्टोबर अखेरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. विदर्भ ते कोकण जोडणारी ही गाडी आता ३० ऑक्टोबरपर्यंत धावणार आहे, असे कोकण रेल्वेच्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.
विदर्भातून थेट कोकणात येण्यासाठी रेल्वे गाडी नसल्यामुळे अशा गाडीची वारंवार मागणी होत होती. गर्दीचा हंगाम लक्षात घेऊन या मार्गावर विशेष गाड्यांचे नियोजन रेल्वेकडून करण्यात येते. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर नागपूर ते मडगाव (01139/01140) ही आठवड्यातून दोनदा धावणारी गाडी सप्टेंबरअखेरपर्यंत धावणार असल्याचे जाहीर करण्यात आले होते. मात्र या गाडीची मागणी लक्षात घेऊन रेल्वेने आता ही गाडी ३० ऑक्टोबरपर्यंत विस्तारित करण्याचा निर्णय घेतला आहे.
सुधारित वेळापत्रकानुसार ही गाडी नागपूर ते मडगावपर्यंत चालवली जाणार आहे. त्यानुसार ही गाडी नागपूर येथून बुधवारी तसेच शनिवारी दुपारी तीन वाजून पाच मिनिटांनी सुटून दुसऱ्या दिवशी गुरुवार तसेच रविवारी सायंकाळी पाच वाजता ती मडगावला पोहोचेल. परतीच्या प्रवासात मडगाव ते नागपूर दरम्यान धावताना ही गाडी (01140) गुरुवार तसेच रविवारी मडगाव येथून रात्री आठ वाजता सुटून दुसऱ्या दिवशी रात्री साडेनऊ वाजता नागपूरला पोहोचेल.
नागपूर ते मडगाव या प्रवासात गाडी वर्धा, पुलगाव, धामणगाव, बडनेरा, अकोला, मलकापूर, भुसावळ, नाशिक, इगतपुरी, कल्याण, पनवेल, रोहा, खेड, चिपळूण, रत्नागिरी, राजापूर, कणकवली, कुडाळ, थिवी तसेच करमळी या स्थानकांवर थांबणार आहे.
एक महिन्याच्या कालावधीत या विशेष गाडीच्या दोन्ही बाजूच्या मिळून अठरा फेऱ्या होणार आहेत.
कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड