जन शिक्षण संस्थानच्या कौशल्य विकास प्रशिक्षण वर्गांचे उद्घाटन

रत्नागिरी : रत्नागिरीच्या जन शिक्षण संस्थानमार्फत राबवण्यात येणाऱ्या व्यावसायिक कौशल्य विकास प्रशिक्षण वर्गांचे उद्घाटन संगमेश्वर तालुक्यात माभळे, संगमेश्वर आणि साखरपा येथे झाले.

माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांनी स्थापन केलेल्या आणि सौ. उमा प्रभू यांच्या अध्यक्षतेखाली सुरू असलेल्या मानव साधन विकास संस्थेच्या माध्यमातून जन शिक्षण संस्थान ही योजना भारत सरकारच्या कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्रालयातर्फे रत्नागिरी जिल्ह्यात राबविण्यात येत आहे. औपचारिक शिक्षण पूर्ण न करू शकलेल्या तरुणांना तसेच महिलांना आवश्यक व्यावसायिक कौशल्य विकास प्रशिक्षणाचे आयोजन या योजनेच्या माध्यमातून गाव स्तरावर केले जाते. दक्षता, स्वावलंबन आणि सन्मान या त्रिसूत्रीचा अवलंब करून ग्रामीण जनतेच्या उपजीविकेला आणि पर्यायाने ग्रामीण विकासाला चालना देण्याचे काम योजनेतून होत आहे. साक्षरता, पर्यावरण, आरोग्य, महिला प्रबोधन अशा विषयांवरही जनजागृती केली जाते. योजनेअंतर्गत दहा प्रकारचे प्रशिक्षण दिले जाते. त्यामध्ये टेलरिंग, ब्युटी पार्लर, ज्यूट हस्तकला उत्पादन निर्मिती, फळ आणि भाज्या प्रक्रिया आणि साठवणूक, भरतकाम, टू अँड थ्री व्हीलर मेकॅनिक, इलेक्ट्रिकल टेक्निकल हेल्पर, असिस्टंट प्लंबर, असिस्टंट वेल्डर आणि फॅब्रिकेटर आणि सहाय्यक संगणक ऑपरेटर असे कोर्सेस तीन ते चार महिन्यांच्या कालावधीकरिता घेतले जातात. प्रशिक्षण वर्गाचे शुल्क ४५० रुपये आणि प्रवेश शुल्क १० रुपये आहे. एससी, एसटी, दिव्यांग जन तसेच दारिद्र्यरेषेखालील लाभार्थ्यांना केवळ प्रवेश शुल्कावर प्रवेश दिला जातो. यशस्वीपणे कोर्स पूर्ण करणाऱ्या प्रशिक्षणार्थींना केंद्र शासनाचे कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्रालयाकडून प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. त्याचा उपयोग बँक कर्ज तसेच उद्योग-व्यवसाय आणि नोकरीसाठी करता येणार आहे.

या उपक्रमांतर्गत असिस्टंट ड्रेस मेकर या कोर्सच्या तीन अभ्यासवर्गांचे उद्घाटन संस्थेचे अध्यक्ष डॉ. विनय नातू यांच्या हस्ते माभळे, संगमेश्वर बाजारपेठ आणि साखरपा येथे करण्यात आले. माभळे येथे वर्षा जोशी प्रशिक्षक म्हणून काम पाहणार आहेत. संगमेश्वर बाजारपेठेत योगिनी डोंगरे यांच्या लावण्य टेलरिंग इन्स्टिट्यूटच्या संयुक्त विद्यमाने तर साखरपा येथे दीपाली खरात यांच्या श्रेया टेलरिंग इन्स्टिट्यूटच्या सहकार्यारातून हे कोर्सेस राबवण्यात येत आहेत.

कौशल्य आत्मसात करून उद्योगशील व्हा, असा सल्ला देतानाच मानव साधन विकास संस्था आणि जन शिक्षण संस्थानच्या माध्यमातून उपलब्ध कौशल्य विकास संधींचा आढावा डॉ. नातू यांनी यावेळी घेतला. कार्यक्रमाला जन शिक्षण संस्थानच्या संचालिका सौ. सीमा यादव, कार्यकारिणी सदस्य प्रमोद अधटराव, दीपिका जोशी, उद्योजक हरीभाई पटेल उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी कार्यक्रम अधिकारी निधी सावंत, कार्यक्रम समन्वयक संतोष घडशी, स्वप्नील साखरकर आणि आशीष बामणे यांनी विशेष परिश्रम घेतले.

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply