Site icon साप्ताहिक कोकण मीडिया

कोमसापला नवी मुंबईत जागा देणार : मुख्यमंत्री

Advertisements

मुंबई : कोकण मराठी साहित्य परिषदेच्या कार्यालयीन कामकाजासाठी नवी मुंबईतील सिडकोच्या अखत्यारीतील जागा देण्यात येईल, असे आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले.

कोकण मराठी साहित्य परिषदेचे संस्थापक, साहित्यिक मधू मंगेश कर्णिक आणि कोमसापचे कार्याध्यक्ष प्रा. डॉ. प्रदीप ढवळ यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सदिच्छा भेट घेऊन त्यांना एक निवेदन दिले. त्यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जागेबाबतचे आश्वासन दिले.

श्री. कर्णिक यांनी मुख्यमंत्र्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, मराठी भाषा आणि साहित्य यांची गेली ६५ वर्षे केलेल्या सेवेतून माझ्या निरीक्षणानुसार, मराठी भाषा आणि साहित्य यांच्या भल्यासाठी मुख्यमंत्री म्हणून आपण मराठी भाषा मंत्री आणि संबंधित अधिकाऱ्यांची बैठक बोलावावी. यात मराठी भाषा विभागाचे कार्य, कर्नाटक सीमा भागासाठी महाराष्ट्र परिचय केंद्र सुरू करणे, ‘पुस्तकांचे गाव’ या योजनेमध्ये मालगुंड येथील केशवसुत स्मारकाचा समावेश करणे, केशवसुत स्मारकाच्या मालगुंड या गावाला पर्यटनाचा दर्जा देणे, मुंबईत घसरता मराठी टक्का, मुंबई विद्यापीठात केशवसुत अध्यासन सुरू करणे, मराठी भाषा धोरण, मराठीसाठी प्राधिकरण, मराठी विद्यापीठाची स्थापना, प्रादेशिक साहित्य संस्थांना साहित्य संमेलनासाठी निधी आदी मुद्द्यांवर सविस्तर चर्चा व्हावी.

मुख्यमंत्र्यांनी श्री. कर्णिक यांच्या या मुद्द्यांवर मराठी भाषा मंत्री आणि संबंधित अधिकाऱ्यांची तत्काळ बैठक बोलविण्याचे आदेश दिले. तसेच कोकण मराठी साहित्य परिषदेच्या कार्यालयीन कामकाजासाठी नवी मुंबई येथील सिडकोच्या अखत्यारीतील जागा देण्याचेही आदेश दिले.

कोमसापच्या अंतर्गत मराठीच्या भल्यासाठी व्यासपीठ या बॅनरखाली महाराष्ट्रातील २४ संस्थांनी एकत्र येत, मराठी भाषा, संस्कृती आणि साहित्य यासाठी शासनाकडे पाठपुरावा करण्याच्या हेतू बाळगला आहे. या संस्थांनी आझाद मैदानावर केलेल्या आंदोलनाची दखल घेऊन मुंबईत मराठी भाषा भवनाच्या शासनाने घेतलेल्या निर्णयाबद्दल महाराष्ट्र शासनाचे अभिनंदनही श्री. कर्णिक यांनी यावेळी केले.

गेले दिवस कोमसापचे संस्थापक पद्मश्री कर्णिक यांच्या मार्गदर्शनाखाली विश्वस्त रमेश कीर, केंद्रीय अध्यक्षा नमिता कीर, केंद्रीय कार्याध्यक्ष डॉ. प्रदीप ढवळ विविध मागण्यांसाठी सरकार दरबारी प्रयत्नशील होते. मुख्यमंत्री शिंदे यांनी त्यांना भेटीची वेळ देत विविध मागण्यांवर सकारात्मक प्रतिसाद दिल्याने कोकण मराठी साहित्य परिषदेने समाधान व्यक्त केले.

या भेटीप्रसंगी उत्पादन शुल्क मंत्री शंभूराजे देसाई, पर्यटन मंत्री मंगलप्रभात लोढा, आमदार बच्चू कडू, आमदार नीतेश राणे, आमदार रवींद्र फाटक, शिवसेना प्रतोद भरतशेठ गोगावले उपस्थित होते.

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media
Exit mobile version